Thursday, January 6, 2011

ख-या 'श्रमिक पत्रकारांना' पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!


'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाच्या माझ्या सर्व पत्रकार मित्रांना शुभेच्छा !
आज सकाळपासून एसएमएसची रांग लागली आहे. 'पत्रकार दिनाच्या शुभेच्छा, सर्व श्रमिक पत्रकारांना शुभेच्छा' इ. प्रमोद चुंचुवार, संजय जाधव, संदीप प्रधान, शामसुंदर सोन्नर, जयंत धुळप अशा माझ्या कितीतरी मित्रांचा, सहका-यां
चा आज पत्रकारतेतील कामगिरीबद्दल पुरस्कारांनी गौरव होणार आहे.
आय अ‍ॅम व्हेरी हॅपी फॉर देम, त्यांचे पुन्हा एकदा जाहीर अभिनंदन.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने
दिल्या जाणा-या पुरस्कारांना आणि आजच्या पत्रकार दिन सोहळ्याला पत्रकार विश्वात एक खास मानाचे स्थान आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माझा सहकारी मित्र प्रसाद मोकाशी आणि कार्यकारिणीने त्याचे भान ठेऊनच कार्यक्रमांची आखणी केली आहे. प्रसादच्याच पाठपुराव्याने पत्रकार संघासमोरील महापालिका चौकात आज दर्पणकारांच्या नावाची पाटी महापौरांच्या उपस्थितीत संध्याकाळी लावण्यात येणार आहे. त्याबद्दलही धन्यवाद!
पण मला सांगायचे आहे ते जरा वेगळे आहे. ती माझ्या मनात उमटलेली, अजूनही अनुत्तरीत अशी भिरभिरणारी वावटळ आहे...
 या सगळ्या गोंधळगुंत्याला सुरूवात झाली ती गेल्या आठवड्यात. मुंबईनजीकच्या एका शहरातील पत्रकार संघाच्या अध्यक्षांचा मला फोन आला होता. यंदा पत्रकार दिनाला अध्यक्ष म्हणून या अशी त्यांची विनंती होती. आपल्याच मनाचा तळ ढवळून काढणारी एखादी घटना अनेक दिवस आपल्याला अस्वस्थ करून सोडते. तसं या फोनमुळे झालं.
त्या फोनपासून या सगळ्याची सुरुवात झाली... दर्पणकारांच्या परंपरेची, वारशाची पालखी खांद्यावर घेण्याइतके, समोर अपेक्षेने जमलेल्या पत्रकारांना पत्रकारितेच्या रितीभाती, नितीमूल्ये, तत्त्वे अशा हक्कानं सांगण्याचं धैर्य मला दाखवता येईल का, पत्रकार म्हणून मी तितका 'स्वच्छ' आहे का, उपदेशाच्या चार गोष्टींचे डोस पाजण्याइतके आपण निर्ढावलेलो आहोत का अशा प्रश्नांचा कल्लोळ सुरू झाला आणि मी अस्वस्थ झालो.
माझे दोन-तीन-चार फ्लॅट नाहीत, मी कुणा आमदार-मंत्री यांच्या मेहरबानी लिस्टमध्ये नाही किंवा बदल्यांसाठी वा फायली सरकवण्यासाठी शब्द खर्ची घालून केले
ली वरकमाईही माझ्याकडे जमा झालेली नाही. पुस्तकांना पुरस्कार वा सरकारी समित्यांवर वर्णी यापैकी कशासाठीही मी धडपडलेलो नाही, असं काहीही मी पदरात पाडून घेतलेलं नाही, एस्‌इओ च्या यादीतील लाभार्थीही नाही, मला दिवाळीला वा सणासुदिला महागड्या भेटवस्तू येत नाहीत की माझ्यासाठी कुणी विमानांची तिकिटे आजवर पाठवलेली नाहीत...
तरीही मी 'स्वच्छ पत्रकार' या व्याख्येत बसणार नाही. कारण, पत्रकार असण्याचा कळत-नकळत मला लाभ झालेलाच आहे. रेशन, गॅस, टेलिफोन, आरटीओ अशा अऩेक ठिकाणी मी माझं पत्रकारपण वापरलं आहेच की.
अ‍ॅक्रिडीटेशन असताना मिळणा-या  रेल्वे, बस सवलतींचा उपयोग केला नसला तरी रेल्वे रीझर्व्हेशन हमखास मिळण्यासाठी पीआरओला पत्र मी देतोच, अवतीभवती घडणा-या  गोष्टींवर कितीही निर्भिडपणे लिहायचं म्हटलं तरी मनात कुठेतरी डाव-उजवं होतंच असतं, समीकरणं मांडली जातातच...
पैशांची पाकिटं नाकारली असली तरी पत्रकार परिषदांना मिळणारी गिफ्ट्स कधीकाळी खुणावत होतीच. मी विकला गेलो नाही असं कितीही म्हटलं तरी मोहाचे क्षण आले होतेच...
मनात असं काय काय उमटत होतं, मन एकाचवेळी खरवडून निघत होतं, स्वच्छ होत होतं...
असं सगळं मनात भिरभिरल्यावर आपली ती योग्यता नव्हे हे मनाच्या आरशात स्वच्छपणे दिसल्यावर मी, त्या फोनवरील आग्रहाला नकार देणे मला क्रमप्राप्त होते, तो दिला.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने मला आज हे आत्मपरिक्षण करावसं वाटलं. 

आज सगळं बदललं आहे. दोन-तीन फ्लॅट घेणारे पत्रकार, राजकीय नेतेमंडळी, विरोधी पक्ष यांच्यात उत्तम संतुलन आहे. भ्रष्टाचार 'आदर्श' झालाय, त्याचवेळी पत्रकारितेच्या सुरूवातीच्या पायरीवर असलेले माझे काही तरुण पत्रकार मित्र भाड्याचं घर, डिपॉझिट परवडत नाही म्हणून पत्नीला गावाकडे ठेवून या महानगरीत विकले न जाण्याची पराकाष्ठा करतहेत. त्यांचया डोक्यावर हक्काचं छप्पर नाही. ज्यांना कष्टांची चाड आहे, ज्यांचे हक्क डावलले जाताहेत, आवाज दाबले जाताहेत त्यांच्याबद्दल कणव आहे, अशी ही पत्रकार मंडळी आहेत. पत्रकारितेची ज्योत त्यांनी सांभाळून धरली आहे. अवतीभवतीचा बाजार पाहूनही स्वतची बोली न लावणा-या  त्या ख-या  'श्रमिक पत्रकारांना'  पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!
तर, हेच मला सांगावसं वाटलं आज...

2 comments:

  1. पत्रकार दिनानिमित्त तुम्ही मांडलेलं हे वास्तव आहे. आदर्श समजल्या जाणार्या पत्रकारांना चिंता, जाणीव असती तर बरखा दत्त आणि वीर संघवी यांनी छातीठोकपणे 'टू जी स्पेक्ट्रम' घोटाळ्याचं समर्थन केलं नसतं. त्यापाठोपाठ राजदीप सरदेसाईचाही पाठींबा मिळाला नसता. राजकारण, पोलिस प्रशासनच काय प्रत्येक ठिकाणी 'की मेकर'ची भूमिका पत्रकार बजावताहेत. आपणच थोडी सजगता दाखवली असती तर, माहिती अधिकार क्षेत्रातील अमित जेठवा, सतीश शेट्टी यांची हत्या झाली नसती. बोरूडेचा बळी गेला नसता, राज ठाकरेचं ऍवढं फावलं नसतं, चव्हाणांनी 'आदर्श' घडवला नसता. तरीही, काट्यातून मार्ग काढत अविरत कार्य करणार्या व मोहाला बळी न पडणार्या पत्रकारांना..सलाम. पत्रकार दिनानिमित्त तुम्ही मस्त लिहलंय. विचार करायला भाग पाडलंय. यामुळे ऍखाद्या तरी पत्रकाराच्या डोक्यात 'केमिकल लोच्या' होईल, ही अपेक्षा.

    ReplyDelete
  2. शॅल शिर्को! ब्लॉग सुरू केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! पूर्वी तुम्ही या नावानं परदेशी चित्रपटांची सुंदर रसग्रहणं लिहित होता ही आठवण अजुनही ताजी आहे.शुभेच्छा!

    ReplyDelete