Sunday, May 8, 2011

पनवेलची बुभुक्षित `श्वापदे'


पनवेलच्या कल्याणी आश्रमात निराधार, भिन्नमती मुलींच्या आयुष्याशी जे काही अकल्याण चालले होते ते एसीपी रश्मी करंदीकर यांच्या पथकाने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर उघडकीस आणले, दहाजणांना अटक झाली, संभवित विकृतांनी चालवलेले पशूपेक्षाही हीन वर्तन एेकून वाचून मनात संतापाचा लाव्हा खदखदत होता. तेव्हा उमटलेले हे शब्द... 
पनवेलच्या कल्याणी महिला आणि बालक सेवा संस्थेत भिन्नमती, अपंग, असहाय्य मुलींचा जो लैंगिक छळ सुरू होता तो पाहता या मुलींशी असे घृणास्पद दुर्वर्तन करणा-या संस्थाचालकांची आणि अशा कथित संभवितांची संभावना मानवी कातडे पांघरलेली बुभुक्षित श्वापदे म्हणूनच करावी लागेल. नीटसे बोलूही न शकणा-या, वाढते वय, वासनांध नजरा या कशाचीही जाण नसणा-या 19 अश्राप मुलींबरोबर गेली अनेक वर्षे या वासनासक्त मंडळींनी चालवलेल्या विकृत चाळ्यांचे पाढे एसीपी रश्मी करंदीकर यांच्या पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाचण्यात आले आहेत. लैंगिक छळाला विरोध करणा-या मुलींच्या हाता-पायांवर, नाजूक भागाजवळ सिगारेटचे चटके, तापत्या पळीचे, सळईचे डाग, शय्यासोबतीस नकार देणा-या मुलींना मारहाण, गळा दाबून मारण्याचे प्रयत्न, दोर रुतून जखमा होतील इतके घट्ट बांधून ठेवणे अशा भयानक यातना या मुली सहन करत होत्या. संस्थेत यायचे, पाहिजे ती मुलगी निवडून गच्चीवर न्यायची आणि तिचा उपभोग घ्यायचा, विरोध करणा-या मुलींना चटके द्यायचे, मारहाण करायची, बेल्टने झोडपून काढायचे, त्यांचा दुबळा प्रतिकार मोडून काढण्यासाठी त्यांना जबरदस्तीने दारू पाजायची, असे उन्मादी थैमान संस्थेत सुरू होते आणि संस्थाचालक रामचंद्र करंजुले याचीही त्यांना साथ होती. रामचंद्र, त्याची पत्नी सुरेखा, मुलगी कल्याणी, स्थानिक वार्ताहर असलेला त्याचा पुतण्या नानाभाऊ करंजुले, संस्थेतील दोन आया यांच्यासह एकूण दहाजणांवर हे आरोपपत्र दाखल केले गेले आहे. समाजातील जागल्या म्हणून ज्याने खरे तर अशा गुन्हेगारांचे बुरखे ‘लोकमता’समोर टराटर फाडायला हवे होते अशा या नानाचाही या अत्याचारांमध्ये सहभाग होता. राज्याच्या अनेक भागांतील आश्रमशाळा, महिला आश्रम येथील निराधार मुले-मुली याच प्रकारच्या शोषणाला सामोरे जात असतात. शहापूर तालुक्यातील कवडास येथील आश्रमशाळेतील मुलामुलींवर असेच अत्याचार झाल्याचे यापूर्वी उजेडात आले होते. आश्रमशाळा, बालकल्याण व महिला संस्थांमधील या गैरप्रकारांकडे काणाडोळा करणा-या संबंधित यंत्रणांच्या धृतराष्ट्रीय पवित्र्यामुळे अशा मुखंडांचे आजवर फावत आले आहे. यापैकी अनेक प्रकरणांमधील आरोपी उजळ माथ्याने फिरत असताना या शोषितांच्या बाजूने लढण्यासाठी कुणीही नाही ही शोकांतिका आहे. बलात्कारी व्यक्तींचे खच्चीकरण करण्याची सूचना मध्यंतरी दिल्लीतील एका महिला न्यायाधीशांनी केली होती. असहाय्य मुलामुलींवर लैंगिक अत्याचार करून उजळ माथ्याने फिरू धजावणा-या अशा मानवी श्वापदांसाठी खरे तर यापेक्षाही कठोर शिक्षेची गरज आहे!

Tuesday, May 3, 2011

ओसामा संपला, आपल्यातील दहशतवादी कधी संपणार?

ओसामा बिन लादेन मारला गेल्यामुळे दहशतवाद आणि दहाशतवादी कमकुवत झाले असतील, असे समजणारे भोळेभाबडे काही बिचारे भ्रमात आहेत असे म्हणावे लागेल. ओसामा ही अमेरिकसाठी पर्सनल स्कोर सेटलमेंट होती. अमेरिकेला दणका देणार्या दहशतवादी संघटनेचा तो म्होरक्या होता, त्याला मारून अमेरिकेने हिशेब चुकता केलाय. त्यामुळे दहशतवाद संपलेला नाही आणि संपणारही नाही. ओसामाला अमेरिकेने संपवले असले तरी दहशतवाद त्याच्यापुरता मर्यादीत नाही. आपल्या मनामध्ये दडलेल्या अतिरेकी विकारांचे काय? एखाद्या दहशतवादी घटनेनंतर उफाळून येणार्या विखारी भावनांचे प्रदर्शन होते तेव्हा नेमके काय घडत असते? आपल्यातील दहशतवादी कधी संपणार? अशा अनेक प्रश्नांची वावटळ माझ्या मनात भिरभिरत आहे. मला तर वाटतं, जोपर्यंत आपल्या अवतीभवती धर्मांधतेच्या भिंती आहेत, जातीयतेच्या घुसमटवणार्या विषवल्ली घुसमट करत आहेत, मनामनांवर याच द्वेषमूलक विचारांचा पगडा आहे, वेगळ्या जातीच्या, वेगळ्या धर्माच्या, वेगळ्या आर्थिक-सामाजिक स्तरांवरील लोकांविषयी काहीही कारण नसताना द्वेषभावना आहे तोपर्यंत आपल्यातही एक दहशतवादी दडलेला आहे.
तुम्ही लक्षात घ्या - एखादी घटना घडली की आपल्यापैकी बहुतेकजण कळत-नकळत आरोपी व्यक्तीची जात, धर्म विचारात घेतात आणि त्यानुसार, ज्याच्या-त्याच्या मनातील पूर्वग्रहानुसार मग त्यापुढील प्रतिक्रिया उमटते... अन्यधर्मीय व्यक्ती असेल तर मनात उगाचच त्या धर्माच्या सर्वांविषयी अनुदार, खरं तर तिरस्करणीय अशी खुन्नस दाटून येते. आपल्याच धर्माचा, कुंपणातील कुणी असेल तर है शाब्बाश, चांगला धडा मिळेल आता *त्यांना* असंही वाटून जातं. पुढे हीच भावना वेळोवेळी डोकं वर काढते, आपल्यातला दहशतवादी मातू लागतो. स्वानुभव सांगतो, दंगलींच्या नंतर, बॉम्बस्फोटांनंतर रात्री उशिरा गाडी पकडायचो तेव्हाचा अनुभव सांगतो.  डब्यात अवतीभवती असलेल्या सगळ्यांवर परस्परांची संशयाची  नजर फिरायची. एखाद्याला दाढी असेल , पेहरावावरून धर्म अळखता येत असेल तर पाहणार्याच्या नजरेत विखार, खुन्नस दाटून यायची. माझीही भावना फार वेगळी नसायची, पण मी त्यातून बाहेर पडलो. आजही माझा रात्री उशिरानेच प्रवास सुरू असतो. अन्य धर्मीय सोबतीला असतात, मी आजही सगळ्यांकडे निरखून पाहतो. माझ्या लक्षात येतं की कुणाचा जप सुरू आहे, कुणी लॅपटॉपवर काम करतोय तर, कुणी मोबाइल संभाषणात मग्न आहे. सगळी आपल्यासारखीच माणसं आहेत, त्यांना त्यांचे रागलोभ-विकार आहेत. मग आपल्या मनात द्वेष कशासाठी? थोडा अधिक विचार केल्यावर लक्षात आलं - आपण द्वेष दाखवला, खुन्नस दाखवली की मनातला दहशतवादी जागा होतो, आपल्या बुद्धीचा, भावनांचा, विवेकाचा ताबा घेतो. धर्मांधता वा दहशतवादी प्रवृत्ती याच खतपाण्यावर तर वाढते. ती सुरूवात आपल्यापासून होऊ नये, इतरांनाही त्याची बाधा होऊ नये म्हणून आपापल्या परीने, वकुबानुसार जागं रहायला हवं, प्रयत्न करायला हवेत. हे असं होऊ नये म्हणून जमेल तितके सौहार्दाने वागायला काय हरकत आहे? ओसामा मारला गेल्यावर मनात कालपासून भिरभिरणारे हे विचारांचे भोवरे तुमच्याशी शेअर करावेसे वाटले म्हणून लिहिलं...
मी फारच वेगळ सांगतोय असं नाही, मनात कालपासून जे उमटत होतं तेच इथे प्रकट केलंय. मी विचार केलाय, तूम्ही पण करा इतकेच!