‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’
चित्रपटमालिकेतील चित्रपट तुम्ही किती वेळा पाहिले आहेत? जॉनी डेपने या
चित्रपटांसाठी घेतलेला सागरी चाच्याचा अफलातून अतरंगी अवतार कॅप्टन जॅक
स्पॅरो आणि त्याच्या करामती कारवायांच्या मनोरंजक कथा प्रेक्षकांसमोर
आणणा-या या चित्रपटांबद्दल केवळ हाच प्रश्न विचारता येईल. कारण उघड आहे.
महाइब्लिस, महाअतरंगी असा कॅप्टन जॅक
स्पॅरो, त्याला साजेसे असे त्याचे बदमाश साथीदार, त्यांचे जहाज ब्लॅक पर्ल,
जॅकशी खुन्नस असणारा जेफ्री रशचा कॅप्टन बाबरेसा, खवळलेल्या समुद्राला
भेदून वर येणारे भुताळी जहाज ‘द फ्लाइंग डचमन’, या जहाजावरील अर्धमृत
खलाशी, भरसमुद्रात या चाच्यांच्या आणि ब्रिटिश आरमाराच्या ताफ्याशी होणा-या
चकमकी, चाच्यांनी दडवलेल्या खजिन्याच्या प्रचंड राशी.. वाढत्या वयातही
मनाच्या कुठल्या तरी कोप-यात खोडकर मुलासारखं दडून राहिलेल्या शैशवाला
भुलवणारं, साहसी, स्वप्नाळू भाववृत्तीला उत्तेजित करणारं, गुंगवून टाकणारं
असे हे कथानक. जॅक स्पॅरोच्या करामती मग डेड मॅन्स चेस्ट, अॅट वर्ल्डस्
एन्ड, ऑन स्ट्रेंजर टाइड्स या पुढच्या भागांमधून प्रेक्षकांसमोर आल्या आणि
हे सर्व चित्रपटही तितकेच चालले, गाजले. अपवाद म्हणावा तो चौथ्या भागाचा.
तो रॉब मार्शलने दिग्दर्शित केला होता. अनेकांना या संपूर्ण मालिकेतील हा
चित्रपट बराचसा बोअर, कंटाळवाणा वाटला आणि तो आलाही ब-याच उशिरा.
या चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी
ताटकळलेल्या चाहत्यांसाठी खूशखबर अशी की या चित्रपटमालिकेतील पुढचा म्हणजेच
पाचवा भाग ‘डेड मेन टेल नो टेल्स’च्या निर्मितीचे काम सुरू आहे.
‘कोन-टीकी’ चित्रपट बनवणा-या जोकीम रॉनिंग, एस्पेन सँडबर्ग या
दिग्दर्शकद्वयीकडे पाचव्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून ‘नाही-नाही’
म्हणणारा जॉनी डेप, ‘आता हा भाग शेवटचाच’ म्हणत पुन्हा जॅक स्पॅरोची
पायरेट हॅट डोक्यावर चढवून त्याचा इरसालपणा दाखवणार आहे. जॅक स्पॅरोच्या
अतरंगीपणासह इतर व्यक्तिरेखांचेही अंतरंग खुलवणारा पटकथाकार टेड एलियट या
नव्या कथानकासाठीही व्यक्तिरेखांना आकार-उकार देणार आहे. येथे जॅक आहे,
बाबरेसा आहे, चेटकिणी, भुतेखेते आहेत, जॅकसाठी नवी नायिका आहे आणि एक नवी
जोडीही आहे. बम्र्युडा त्रिकोणाच्या रहस्याचा पायरेट्स स्टाइल पर्दाफाशही
या नव्या कथानकातून होईल, अशी खबर आहे.एवढया सगळ्यासाठी २०१६ उजाडायची वाट
बघावी लागणार आहे. एवढेच काय ते पायरेट्स आणि जॉनी डेपच्या चाहत्यांचा
अपेक्षाभंग करणारे आहे.


