Monday, November 3, 2014

साहित्यातील ‘प्रांत’वाद


यंदाच्या साहित्यासाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक फ्रेंच लेखक पॅट्रिक मोदीआनो यांना प्रदान करण्यात आलं. नोबेलच्या ‘नोबेलप्राइझ.ऑर्ग’ या वेबसाइटवर गेलात तर एक मजेशीर गोष्ट पाहाता येते.
Modiaanoयंदाच्या साहित्यासाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक फ्रेंच लेखक पॅट्रिक मोदीआनो यांना प्रदान करण्यात आलं. या पारितोषिकासाठी केनियन लेखक गुगी वा थिओंग आणि जपानी लेखक हारुकी मुराकामी यांची नावं आघाडीवर म्हणून चर्चेत होती. प्रत्यक्षात ते दिलं गेलं पॅट्रिक मोदीआनो यांना. नोबेलच्या ‘नोबेलप्राइझ.ऑर्ग’ या वेबसाइटवर गेलात तर एक मजेशीर गोष्ट पाहाता येते. मोदीआनो यांच्या नावाची घोषणा करणा-या पेजवर एका बाजूला एक प्रश्न विचारलाय. ‘आजचा कौल’ वा वाचक काय म्हणतात या टाइपचा. प्रश्न आहे की, मोदीआनो यांचे काहीतरी साहित्य तुम्ही वाचलं आहे का? होय वा नाही असे दोन पर्याय आहेत. आणि सुमारे ११ हजार वाचकांनी तिथे प्रतिसाद दिलाय. त्यापैकी ९१ टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं आहे.
याचा अर्थ मोदीआनो हे फारसं कुणालाही माहिती नसलेले लेखक आहेत, असाही घेता येऊ शकतो. किंवा ज्या वाचकांनी तिथे नकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे त्यांना वाचक म्हणून वरच्या यत्तेत प्रवेश मिळायला अजून अवकाश आहे, त्यांना बरंच वाचन करायचं आहे (मोदीआनो यांच्या पुस्तकांचेही) असाही घेता येईल. आपल्याकडेही मोदीआनो कितीजणांना माहिती आहेत असं विचारल्यावर प्रतिसाद उत्साहवर्धक असेल, याची खात्री देता येणार नाही.
मोदीआनो यांचं नाव जाहीर झाल्यावर विदेशातही अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्याच. त्यांचं नाव जाहीर करण्याआधी पारितोषिक निवडसमितीचे सदस्य होरेस इंगडाल यांनी तर बॉम्बच टाकला. ‘पाश्चिमात्य साहित्याची पुरती वाट लागलीय. विद्यापीठं, संस्था यांच्याकडून मिळणारं अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती आणि लेखनकला ‘शिकवणारे’अभ्यासक्रम यामुळे ख-या साहित्याचा कसच नाहिसा झालाय. लेखकाला हे जे काही पैसे मिळतात, वित्तीय पाठबळ मिळतं त्यामुळे फोफावलेल्या व्यावसायिक लेखनवृत्तीचा साहित्यनिर्मितीवर नकारात्मक परिणाम होतोय. काही प्रमाणात मी हे समजू शकतो, पण यामुळे लेखकांची समाजाशी नाळ तुटते आणि त्याला आधार देणा-या संस्थांशी तो जखडला जातो.’ असं काय काय इंगडाल यांनी ‘ल क्रॉइक्स’या फ्रेंच दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल्यावर भरपूर गदारोळ उठला. पारितोषिक जाहीर व्हायच्या आधी इंगडाल यांनी ही मुलाखत दिली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी मोदीआनो यांचे नाव जाहीर झाल्यावर तर, इंगडाल आणि स्वीडिश अकादमी समितीच अमेरिकन साहित्याच्या विरोधात आहे, म्हणूनच तिथल्या लेखकांचा पारितोषिकासाठी विचार होत नाही, अशी टीकाही झाली.
‘द गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात या मुलाखतीचा गोषवारा वाचायला मिळाला. इंगडाल यांच्या म्हणण्यानुसार, लेखकाला आर्थिकदृष्टय़ा स्थिर करणा-या अनुदानांमुळे त्याच्यातला लेखक मारला जातोय. पूर्वीच्या दिग्गजांना असा आश्रय मिळत नव्हता. कुणी टॅक्सी चालवायचे, कुणी कारकूनी करायचे, कुणी वेटर तर कुणी आणखी कुठली तरी कामं करायचे. सॅम्युएल बेकेट आणि कितीतरी जण असेच झुंजले. तो विषम संघर्ष होता पण, साहित्यिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या संघर्षानेच त्यांच्यातील लेखकाचं पोषण केलं. आपल्या पाश्चिमात्य साहित्य जगातच ही समस्या जाणवते. आशियाई आणि आफ्रिकन लेखकांचं साहित्य वाचताना त्यात काही प्रमाणात तरी कस जाणवतो, ही त्याची शेरेबाजी अनेकांना झोंबली.
इंगडाल या मुलाखतीत आजच्या कथित वेगळ्या, बंडखोर धाटणीच्या साहित्यावरही घसरले आहेत, ‘चौकट मोडण्याचा आव आणणा-या कादंब-या हल्ली खूप लिहिल्या जातात, पण प्रत्यक्षात त्या तशा नसतातच. चोखंदळ वाचकाला लगेच समजतं की यात काही दम नाही. यातलं चौकट मोडणं वगैरे निखालास बनवेगिरी, पूर्वनियोजित आहे हे जाणवतंच. यापैकी बहुतेक लेखक युरोपियन किंवा अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिकलेले असतात. ते कुठलाही उंबरठा ओलांडत नाहीत वा मापदंड मोडत काढत नाहीत, कारण ज्या काही मर्यादा, चौकटी ओलांडायला हव्यात असं त्यांनी ठरवलेलं असतं तशा काहीही मर्यादा, चौकटी नसतातच.’
इंगडाल यांनी यापूर्वीही लेखनविषयक अभ्यासक्रम, विद्यापीठांचं अनुदान यावर टीका केली होती, पण या मुलाखतीतील थेट वार अमेरिकन साहित्यक्षेत्राच्या जास्तीच जिव्हारी लागले. आणखी एक दुखरी नस त्याला कारणीभूत आहे. ती म्हणजे १९९३ मध्ये टोनी मॉरिसन या अमेरिकन लेखिकेनं साहित्याचं नोबेल मिळवलं होतं. त्यानंतर आजतागायत अमेरिकन लेखकाला नोबेल मिळालेला नाही. त्यात इंगडाल यांनी आता थेट अमेरिकेतील साहित्यनिर्मितीला लक्ष्य केल्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली. आताचं साहित्य म्हणजे एखादी खरेदीविक्रीची वस्तू असते तसं झालं आहे. त्याची समीक्षा करण्याइतकं काहीच नाही. जे काही दर्जेदार साहित्य आहे त्यातही त्यामुळे बदल झाला आहे, असं इंगडाल बोलल्यावर तर हलकल्लोळ झाला. ‘ऑब्झव्‍‌र्हर’साठी लिहिणारे समीक्षक रॉबर्ट मक्रम यांनी तर इंगडाल यांना अमेरिकाविरोधी आणि ढुढ्ढाचार्य ठरवून टाकलं.
यापूर्वीही इंगडाल यांनी अमेरिकेतील साहित्यनिर्मितीवर, दर्जावर टीका केली होती. त्यांच्या टीकेवर जोरदार प्रतिहल्ला झाल्यावर इंगडाल यांनी त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास झाल्याची भूमिका घेतली. ‘महत्त्वाच्या अमेरिकन लेखकांना नोबेल जिंकण्याची संधी अजिबातच नाही असंच जणू मी म्हटल्यासारखे सारेजण माझ्यावर तुटून पडले असले तरी मी तशा अर्थाने काहीही म्हणालेलो नाही. नोबेलसाठी पात्र असे अमेरिकन लेखक नाहीत असं मी कधीही म्हणालो नाही. माझं म्हणणं एवढंच की, जागतिक साहित्याचे प्रवाह, अनुवाद यांची अमेरिकेतील उपलब्धता अत्यंत सीमीत असल्यामुळे अमेरिकन साहित्यक्षेत्राला, समीक्षेला मर्यादा आल्या आहेत. जे काही घडतंय, लिहिलं जातंय ते अमेरिकाकेंद्रीत. जणू एखाद्या आरसेगृहात अमेरिकेचीच प्रतिमा सगळीकडून प्रतिबिंबित होत आहे.’ इतर घडामोडींचा अमेरिकन साहित्यात अजिबात पडसाद उमटत नाहीत असंच काहीसं इंगडाल यांना सुचवायचं होतं. ते अर्थातच अमेरिकन लेखक आणि समीक्षकांच्या पचनी पडलेलं नाही.
इंगडाल असं परखड बोलल्यामुळे यंदाचं नोबेल आशियाई वा आफ्रिकन लेखकाला मिळणार अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. काही नावांवर सट्टाही लागला होता. पण ते मिळालं मोदीआनो यांना, तरीही इंगडाल यांच्या या मुलाखतीमुळे काही प्रश्न मात्र छळू लागले आहेत.
उदाहरणार्थ, लेखकाला मग कुटुंबकबिला सांभाळण्यासाठी आर्थिक आधार मिळूच नये का, असा आधार मिळाला तर त्याच्या लेखनाचा कस कमी होतो का, त्याने त्याच्या लिखाणातून संघर्ष मांडला तरच ते लिखाण कसदार, दर्जेदार, पारितोषिकासाठी विचार व्हावा अशा दर्जाचं ठरतं का, बाकीच्यांचे साहित्य मग या निकषांनुसार फुटकळ, सुमार ठरवावं का, या प्रश्नांची उत्तर शोधायला हवीत.
आणि लेखक लिहिता कधी होतो. वास्तवाचे चटके बसल्यावर, परिस्थितीच्या गर्तेत गरगर फिरल्यावर, आत्मा काजळून टाकेल असे दाहक अनुभव घेतल्यावर की तुम्ही फक्त लिहा, बाकी काही करू नका. तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था, कुटुंबाचा उदरनिर्वाह याची जबाबदारी आमची. असं त्याला आश्वस्त केल्यावर प्रतिभेचा झरा त्याच्यातून उमळतो. या प्रश्नांचीही उत्तरं मिळवायला हवीत. प्रयत्न करूया!

No comments:

Post a Comment