दहा-पंधरा वर्षे उलटून गेली असतील, तेव्हाची गोष्ट. सेंट्रल रेल्वेचा प्रवासी म्हटल्यावर पश्चिम रेल्वेवाले त्या प्रवाशाकडे अतिव कणवेने पहायचे. हा प्रवासी दादरला उतरून पश्चिम रेल्वेच्या विरार गाडीत जरी शिरला तरी अगदी दयाद्र्र दृष्टीने त्याला न्याहाळून जमेल तशी जागाही करून द्यायचे.
त्याचवेळी कर्जत-कसारा इथून दिव्य करून रोजचे मस्टर गाठणा-या कर्मचा-याचा तर सत्कारच व्हायचा बाकी असायचा अनेक कार्यालयांमध्ये. त्याचीही छाती दररोज अभिमानाने फुलून यायची मध्य रेल्वेचा प्रवासी म्हणून. दररोज जिवाची बाजी लावून, तुडुंब गर्दीने भरलेल्या डब्यात दरवाजा राखणा-या ‘आतल्या’ प्रवाशांशी झुंजून डब्यात मुसंडी मारायची म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे. मध्य रेल्वेच्या कृपाशीर्वादाने ही सिद्धी सेंट्रलच्या प्रवाशांनी संयम, सहनशक्ती पणाला लावून प्राप्त केली होती. पण गेल्या चार-पाच वर्षात कुणाची दृष्ट लागल्यागत झाले. मध्य रेल्वे चक्क वेळेवर चालू लागली, गाडय़ा वक्तशीर फलाटात शिरू लागल्या, उद्घोषणा ऐकण्याचे भाग्य ‘याची देही याची काना’ रोजच अनुभवास येऊ लागले. नवीन गाडय़ा आल्या. त्यांचेही पंखे सुरू, खिडक्या व्यवस्थित उघडमीट होणा-या. पंख्यात कंगवा-पेन घालण्याची गरज नाही की खिडक्यांशी डब्यातील कुणा मिस्टर युनिव्हर्सने पंजा लढवायची गरज नाही. कुठे गाडी बंद पडेना की कुठे रूळ तुटेना. पावसाचे पाणी भरून रेल्वे बंद होईल तर तेही नाही. सिग्नल फेल्युअर नाही. पावसामुळे रखडपट्टी नाही की कुठल्यातरी गोंधळामुळे लोकलकल्लोळ नाही. ठाण्यापुढच्या लोकांना, कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांना तर चुकल्या-चुकल्यासारखे वाटायला लागले होते. संपूर्ण महिन्यात कामावर एकदाही लेटमार्क नाही, खाडा नाही, लोकल बंद नाहीत की दीडदोन तास उशिराने नाहीत. वैतागायला, मध्य रेल्वेच्या नावाने खडे फोडायला काही कारणच नाही. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तर या गेल्या काही वर्षात ‘सेंट्रलवरच घर घ्यावे, नको ती विरार लोकल’ असे विचारही मनात बळावू लागले होते. वक्तशीरपणाबद्दल थेट स्पर्धा सुरू झाल्यामुळे पश्चिम रेल्वे उपनगरी विभागालाही थोडीशी असूयाही वाटायला लागली असावी. कुणातरी द्वाडाने वर दिल्लीकडे मध्य रेल्वेचा परफॉर्मन्स रिपोर्ट पाठवून चहाडी केली असावी. मध्य रेल्वे एवढी सुधारली असेल तर प्रवाशांना ‘जीवन म्हणजे एक संघर्ष’ याची प्रचिती देण्याचे महत्तम कार्य कोण पेलणार? मध्य रेल्वेने दाखवलेले सुखाचे दिवस कुणाला सहन झाले नाहीत म्हणजे, कुणाला अत्यानंदाने झटका वगैरे आला तर? असे प्रश्नही बहुदा उपस्थित झाले असावेत. ब-याच खलाअंती मध्य रेल्वेची गाडी पुन्हा रुळांवरून घसरवण्याचा निर्णय दिल्ली दरबारी झाला आणि मध्य रेल्वे गेले वर्षभर पुन्हा तिच्या जुन्या ‘वळणावर’ आली आहे. गाडय़ा घसरणे, बंद पडणे, सिग्नल यंत्रणेतील बिघाड, प्रवाशांना रेल्वेच्या निसर्गरम्य लोहमार्गावरून दुपारच्या उन्हात रपेट, तासनतास रखडपट्टी सारे काही आदेश मिळाल्यानुसार सुरू झाले आहे. उद्घोषकांनी मौन धारण केले आहे. ऐन गर्दीच्या वेळी गाडय़ा रद्द, लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द वा अन्य मार्गाने वळवणे, अध्र्यावरूनच खंडित करून मागे वळवणे असे प्रकार आता जोरात आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावरील दादर पॅसेंजर तर महिन्यातून २५ दिवस दादरऐवजी दिव्याहून सोडण्यात येते. बोजीबोचकी घेऊन प्रवाशांना दादरहून दिवा गाठण्याचे दिव्य करावे लागते. नव्या पिढीला आधीच्या पिढीने ऐकवलेल्या सेंट्रलवरील प्रवासाच्या थरारक अनुभवांची प्रचिती येऊ लागली आहे. गेली काही वर्षे सुरळीत चाललेले मध्य रेल्वेचे गाडे असे ‘मार्गावर’ आले असताना प्रवाशांची थोडीशी गैरसोय होणारच. प्रवाशांनी अशा गोष्टी फार मनाला लावून घेऊ नयेत, पूर्वीही घडायचाच की लोकलकल्लोळ. तेव्हा कुठे प्रवासी इतके वैतागायचे, असे मध्य रेल्वेच्या अधिका-यांचे म्हणणे असावे. यामुळेच गुरुवारी पहाटे कल्याणजवळ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस घसरल्यावर प्रवाशांची पायपीट सुरू होती, ऐन गर्दीच्या वेळी सारे काही ठप्प झाले असताना हे वरिष्ठ अधिकारी स्थितप्रज्ञता अंगी कशी बाणवावी, याचा अभ्यास करत केबिनमध्ये नाश्ता करण्यात मग्न होते. कल्याण रेल्वे स्थानकात शिरताशिरता अमरावती एक्स्प्रेसचे इंजिन आणि तीन डबे रुळांवरून घसरले होते. रूळ तुटल्याने आणि डबे उतरल्यामुळे मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक बंद पडली. उपनगरी वाहतुकीचा बो-या वाजला. सकाळी कामावर जायला निघालेल्या चाकरमान्यांचा लेटमार्कच नव्हे अर्धा दिवसही कल्याणपासून ठाण्यापर्यंतच्या स्थानकांवर ताटकळून, रखडून वाया गेला. वाहतूक कशीबशी काही तासांनी सुरू झाली तेव्हाही गाडय़ा तासभर लेट होत्या. सर्वच वेळापत्रक कोलमडल्याने दिवसभरात एकूण ६३ फे-या रद्द करण्यात आल्या. सकाळी तर कल्याण ते ठाणे दरम्यान लोकल गाडय़ांची रांग लागली होती. अडलेल्या प्रवाशांना नाडण्याचे कर्तव्य रिक्षाचालकांनीही इमानइतबारे पार पाडले. प्रवाशांचे खिसा-पाकीट मोकळे केले. एवढे सगळे घडत असतानाही या अधिका-यांचे उदरभरण सुरू होते. मध्य रेल्वेवर पूर्वीसारखेच सारे घडू लागले आहे, त्याची फार फिकीर कशासाठी करायची, असाच त्यांचा आविर्भाव होता. प्रवाशांच्या खोळंब्याकडे लक्ष देण्यापेक्षा नाश्त्याच्या प्लेटमधील वडा-इडलीकडे लक्ष देणा-या या अधिका-यांनी चूक काहीच केली नाही. त्यांचे सुपरबॉस सेंट्रल रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक मुकेश निगम या सा-या खेळखंडोब्याचे कारण ‘दुर्दैव’ असे सांगत असतील तर या अधिका-यांनी खुर्चीवरून उठायचे कष्ट तरी का घ्यावेत? गेले काही महिने मध्य रेल्वेची घसरगाडी सुरू आहे. महिनाभरात तर तीन वेळा याच प्रकारे मध्य रेल्वेने प्रवाशांची वाट अडवली आहे. दोन दिवसांपूर्वी कळवा कारशेडमधील ओव्हरहेड वायर तुटून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी याच प्रकारे गाडय़ा अडकून पडल्या होत्या. लोहमार्गाची, वाहतूक यंत्रणेची, उपकरणांची एकूणच देखभाल, दुरुस्ती आणि निगा या बाबी योग्य प्रकारे होत नसल्यामुळे असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची गरज नाही. लोहमार्गाच्या दर्जामुळे असे प्रकार घडत असतील तर त्याचीही जबाबदारी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांवर आणि देखभाल-दुरुस्ती विभागावरच येते. लोहमार्गासाठी वापरले जाणारे धातू वा अन्य सामग्री योग्य दर्जाची असेल, याची दक्षता घेण्याची जबाबदारी याच वरिष्ठांची आहे. तिकीट असो वा मासिक पास या सगळ्यासाठी लाखो प्रवाशांकडून भरमसाट प्रवास भाडे उकळणा-या मध्य रेल्वेला तांत्रिक खुलाशांची ढाल करून या हलगर्जीबद्दल स्वत:चा बचाव करता येणार नाही. याच देखभालीसाठी, दुरुस्ती कामांसाठी मध्य रेल्वे गेली अनेक वर्षे नित्यनियमाने रविवारी मेगा ब्लॉक घेत असते. रविवारच्या या दिवशीही प्रवाशांना लोकलकळा सहन कराव्या लागतात. देखभालीसाठी मेगाब्लॉक घेऊनही मध्य रेल्वेची अशी घसरण सुरू असेल तर केवळ ‘दुर्दैव’ म्हणून हात झटकून निगम वा इतर वरिष्ठ अधिका-यांना त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही.
No comments:
Post a Comment