Monday, November 3, 2014

मध्य रेल्वे ‘झिंदाबाद’

दहा-पंधरा वर्षे उलटून गेली असतील, तेव्हाची गोष्ट. सेंट्रल रेल्वेचा प्रवासी म्हटल्यावर पश्चिम रेल्वेवाले त्या प्रवाशाकडे अतिव कणवेने पहायचे. हा प्रवासी दादरला उतरून पश्चिम रेल्वेच्या विरार गाडीत जरी शिरला तरी अगदी दयाद्र्र दृष्टीने त्याला न्याहाळून जमेल तशी जागाही करून द्यायचे.
central railwayत्याचवेळी कर्जत-कसारा इथून दिव्य करून रोजचे मस्टर गाठणा-या कर्मचा-याचा तर सत्कारच व्हायचा बाकी असायचा अनेक कार्यालयांमध्ये. त्याचीही छाती दररोज अभिमानाने फुलून यायची मध्य रेल्वेचा प्रवासी म्हणून. दररोज जिवाची बाजी लावून, तुडुंब गर्दीने भरलेल्या डब्यात दरवाजा राखणा-या ‘आतल्या’ प्रवाशांशी झुंजून डब्यात मुसंडी मारायची म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे. मध्य रेल्वेच्या कृपाशीर्वादाने ही सिद्धी सेंट्रलच्या प्रवाशांनी संयम, सहनशक्ती पणाला लावून प्राप्त केली होती. पण गेल्या चार-पाच वर्षात कुणाची दृष्ट लागल्यागत झाले. मध्य रेल्वे चक्क वेळेवर चालू लागली, गाडय़ा वक्तशीर फलाटात शिरू लागल्या, उद्घोषणा ऐकण्याचे भाग्य ‘याची देही याची काना’ रोजच अनुभवास येऊ लागले. नवीन गाडय़ा आल्या. त्यांचेही पंखे सुरू, खिडक्या व्यवस्थित उघडमीट होणा-या. पंख्यात कंगवा-पेन घालण्याची गरज नाही की खिडक्यांशी डब्यातील कुणा मिस्टर युनिव्हर्सने पंजा लढवायची गरज नाही. कुठे गाडी बंद पडेना की कुठे रूळ तुटेना. पावसाचे पाणी भरून रेल्वे बंद होईल तर तेही नाही. सिग्नल फेल्युअर नाही. पावसामुळे रखडपट्टी नाही की कुठल्यातरी गोंधळामुळे लोकलकल्लोळ नाही. ठाण्यापुढच्या लोकांना, कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांना तर चुकल्या-चुकल्यासारखे वाटायला लागले होते. संपूर्ण महिन्यात कामावर एकदाही लेटमार्क नाही, खाडा नाही, लोकल बंद नाहीत की दीडदोन तास उशिराने नाहीत. वैतागायला, मध्य रेल्वेच्या नावाने खडे फोडायला काही कारणच नाही. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तर या गेल्या काही वर्षात ‘सेंट्रलवरच घर घ्यावे, नको ती विरार लोकल’ असे विचारही मनात बळावू लागले होते. वक्तशीरपणाबद्दल थेट स्पर्धा सुरू झाल्यामुळे पश्चिम रेल्वे उपनगरी विभागालाही थोडीशी असूयाही वाटायला लागली असावी. कुणातरी द्वाडाने वर दिल्लीकडे मध्य रेल्वेचा परफॉर्मन्स रिपोर्ट पाठवून चहाडी केली असावी. मध्य रेल्वे एवढी सुधारली असेल तर प्रवाशांना ‘जीवन म्हणजे एक संघर्ष’ याची प्रचिती देण्याचे महत्तम कार्य कोण पेलणार? मध्य रेल्वेने दाखवलेले सुखाचे दिवस कुणाला सहन झाले नाहीत म्हणजे, कुणाला अत्यानंदाने झटका वगैरे आला तर? असे प्रश्नही बहुदा उपस्थित झाले असावेत. ब-याच खलाअंती मध्य रेल्वेची गाडी पुन्हा रुळांवरून घसरवण्याचा निर्णय दिल्ली दरबारी झाला आणि मध्य रेल्वे गेले वर्षभर पुन्हा तिच्या जुन्या ‘वळणावर’ आली आहे. गाडय़ा घसरणे, बंद पडणे, सिग्नल यंत्रणेतील बिघाड, प्रवाशांना रेल्वेच्या निसर्गरम्य लोहमार्गावरून दुपारच्या उन्हात रपेट, तासनतास रखडपट्टी सारे काही आदेश मिळाल्यानुसार सुरू झाले आहे. उद्घोषकांनी मौन धारण केले आहे. ऐन गर्दीच्या वेळी गाडय़ा रद्द, लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द वा अन्य मार्गाने वळवणे, अध्र्यावरूनच खंडित करून मागे वळवणे असे प्रकार आता जोरात आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावरील दादर पॅसेंजर तर महिन्यातून २५ दिवस दादरऐवजी दिव्याहून सोडण्यात येते. बोजीबोचकी घेऊन प्रवाशांना दादरहून दिवा गाठण्याचे दिव्य करावे लागते. नव्या पिढीला आधीच्या पिढीने ऐकवलेल्या सेंट्रलवरील प्रवासाच्या थरारक अनुभवांची प्रचिती येऊ लागली आहे. गेली काही वर्षे सुरळीत चाललेले मध्य रेल्वेचे गाडे असे ‘मार्गावर’ आले असताना प्रवाशांची थोडीशी गैरसोय होणारच. प्रवाशांनी अशा गोष्टी फार मनाला लावून घेऊ नयेत, पूर्वीही घडायचाच की लोकलकल्लोळ. तेव्हा कुठे प्रवासी इतके वैतागायचे, असे मध्य रेल्वेच्या अधिका-यांचे म्हणणे असावे. यामुळेच गुरुवारी पहाटे कल्याणजवळ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस घसरल्यावर प्रवाशांची पायपीट सुरू होती, ऐन गर्दीच्या वेळी सारे काही ठप्प झाले असताना हे वरिष्ठ अधिकारी स्थितप्रज्ञता अंगी कशी बाणवावी, याचा अभ्यास करत केबिनमध्ये नाश्ता करण्यात मग्न होते. कल्याण रेल्वे स्थानकात शिरताशिरता अमरावती एक्स्प्रेसचे इंजिन आणि तीन डबे रुळांवरून घसरले होते. रूळ तुटल्याने आणि डबे उतरल्यामुळे मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक बंद पडली. उपनगरी वाहतुकीचा बो-या वाजला. सकाळी कामावर जायला निघालेल्या चाकरमान्यांचा लेटमार्कच नव्हे अर्धा दिवसही कल्याणपासून ठाण्यापर्यंतच्या स्थानकांवर ताटकळून, रखडून वाया गेला. वाहतूक कशीबशी काही तासांनी सुरू झाली तेव्हाही गाडय़ा तासभर लेट होत्या. सर्वच वेळापत्रक कोलमडल्याने दिवसभरात एकूण ६३ फे-या रद्द करण्यात आल्या. सकाळी तर कल्याण ते ठाणे दरम्यान लोकल गाडय़ांची रांग लागली होती. अडलेल्या प्रवाशांना नाडण्याचे कर्तव्य रिक्षाचालकांनीही इमानइतबारे पार पाडले. प्रवाशांचे खिसा-पाकीट मोकळे केले. एवढे सगळे घडत असतानाही या अधिका-यांचे उदरभरण सुरू होते. मध्य रेल्वेवर पूर्वीसारखेच सारे घडू लागले आहे, त्याची फार फिकीर कशासाठी करायची, असाच त्यांचा आविर्भाव होता. प्रवाशांच्या खोळंब्याकडे लक्ष देण्यापेक्षा नाश्त्याच्या प्लेटमधील वडा-इडलीकडे लक्ष देणा-या या अधिका-यांनी चूक काहीच केली नाही. त्यांचे सुपरबॉस सेंट्रल रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक मुकेश निगम या सा-या खेळखंडोब्याचे कारण ‘दुर्दैव’ असे सांगत असतील तर या अधिका-यांनी खुर्चीवरून उठायचे कष्ट तरी का घ्यावेत? गेले काही महिने मध्य रेल्वेची घसरगाडी सुरू आहे. महिनाभरात तर तीन वेळा याच प्रकारे मध्य रेल्वेने प्रवाशांची वाट अडवली आहे. दोन दिवसांपूर्वी कळवा कारशेडमधील ओव्हरहेड वायर तुटून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी याच प्रकारे गाडय़ा अडकून पडल्या होत्या. लोहमार्गाची, वाहतूक यंत्रणेची, उपकरणांची एकूणच देखभाल, दुरुस्ती आणि निगा या बाबी योग्य प्रकारे होत नसल्यामुळे असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची गरज नाही. लोहमार्गाच्या दर्जामुळे असे प्रकार घडत असतील तर त्याचीही जबाबदारी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांवर आणि देखभाल-दुरुस्ती विभागावरच येते. लोहमार्गासाठी वापरले जाणारे धातू वा अन्य सामग्री योग्य दर्जाची असेल, याची दक्षता घेण्याची जबाबदारी याच वरिष्ठांची आहे. तिकीट असो वा मासिक पास या सगळ्यासाठी लाखो प्रवाशांकडून भरमसाट प्रवास भाडे उकळणा-या मध्य रेल्वेला तांत्रिक खुलाशांची ढाल करून या हलगर्जीबद्दल स्वत:चा बचाव करता येणार नाही. याच देखभालीसाठी, दुरुस्ती कामांसाठी मध्य रेल्वे गेली अनेक वर्षे नित्यनियमाने रविवारी मेगा ब्लॉक घेत असते. रविवारच्या या दिवशीही प्रवाशांना लोकलकळा सहन कराव्या लागतात. देखभालीसाठी मेगाब्लॉक घेऊनही मध्य रेल्वेची अशी घसरण सुरू असेल तर केवळ ‘दुर्दैव’ म्हणून हात झटकून निगम वा इतर वरिष्ठ अधिका-यांना त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही.

हवेहवेसे काही शब्दांतून निसटले होते



आभासांचे अभ्र
आठवणींचे कवडसे

त्या संध्याकाळी


कळेना कोण कुणाला छळत होते
हवेहवेसे काही शब्दांतून निसटले होते
- @‪#‎शैलेंद्रशिर्के‬

साहित्यातील ‘प्रांत’वाद


यंदाच्या साहित्यासाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक फ्रेंच लेखक पॅट्रिक मोदीआनो यांना प्रदान करण्यात आलं. नोबेलच्या ‘नोबेलप्राइझ.ऑर्ग’ या वेबसाइटवर गेलात तर एक मजेशीर गोष्ट पाहाता येते.
Modiaanoयंदाच्या साहित्यासाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक फ्रेंच लेखक पॅट्रिक मोदीआनो यांना प्रदान करण्यात आलं. या पारितोषिकासाठी केनियन लेखक गुगी वा थिओंग आणि जपानी लेखक हारुकी मुराकामी यांची नावं आघाडीवर म्हणून चर्चेत होती. प्रत्यक्षात ते दिलं गेलं पॅट्रिक मोदीआनो यांना. नोबेलच्या ‘नोबेलप्राइझ.ऑर्ग’ या वेबसाइटवर गेलात तर एक मजेशीर गोष्ट पाहाता येते. मोदीआनो यांच्या नावाची घोषणा करणा-या पेजवर एका बाजूला एक प्रश्न विचारलाय. ‘आजचा कौल’ वा वाचक काय म्हणतात या टाइपचा. प्रश्न आहे की, मोदीआनो यांचे काहीतरी साहित्य तुम्ही वाचलं आहे का? होय वा नाही असे दोन पर्याय आहेत. आणि सुमारे ११ हजार वाचकांनी तिथे प्रतिसाद दिलाय. त्यापैकी ९१ टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं आहे.
याचा अर्थ मोदीआनो हे फारसं कुणालाही माहिती नसलेले लेखक आहेत, असाही घेता येऊ शकतो. किंवा ज्या वाचकांनी तिथे नकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे त्यांना वाचक म्हणून वरच्या यत्तेत प्रवेश मिळायला अजून अवकाश आहे, त्यांना बरंच वाचन करायचं आहे (मोदीआनो यांच्या पुस्तकांचेही) असाही घेता येईल. आपल्याकडेही मोदीआनो कितीजणांना माहिती आहेत असं विचारल्यावर प्रतिसाद उत्साहवर्धक असेल, याची खात्री देता येणार नाही.
मोदीआनो यांचं नाव जाहीर झाल्यावर विदेशातही अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्याच. त्यांचं नाव जाहीर करण्याआधी पारितोषिक निवडसमितीचे सदस्य होरेस इंगडाल यांनी तर बॉम्बच टाकला. ‘पाश्चिमात्य साहित्याची पुरती वाट लागलीय. विद्यापीठं, संस्था यांच्याकडून मिळणारं अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती आणि लेखनकला ‘शिकवणारे’अभ्यासक्रम यामुळे ख-या साहित्याचा कसच नाहिसा झालाय. लेखकाला हे जे काही पैसे मिळतात, वित्तीय पाठबळ मिळतं त्यामुळे फोफावलेल्या व्यावसायिक लेखनवृत्तीचा साहित्यनिर्मितीवर नकारात्मक परिणाम होतोय. काही प्रमाणात मी हे समजू शकतो, पण यामुळे लेखकांची समाजाशी नाळ तुटते आणि त्याला आधार देणा-या संस्थांशी तो जखडला जातो.’ असं काय काय इंगडाल यांनी ‘ल क्रॉइक्स’या फ्रेंच दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल्यावर भरपूर गदारोळ उठला. पारितोषिक जाहीर व्हायच्या आधी इंगडाल यांनी ही मुलाखत दिली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी मोदीआनो यांचे नाव जाहीर झाल्यावर तर, इंगडाल आणि स्वीडिश अकादमी समितीच अमेरिकन साहित्याच्या विरोधात आहे, म्हणूनच तिथल्या लेखकांचा पारितोषिकासाठी विचार होत नाही, अशी टीकाही झाली.
‘द गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात या मुलाखतीचा गोषवारा वाचायला मिळाला. इंगडाल यांच्या म्हणण्यानुसार, लेखकाला आर्थिकदृष्टय़ा स्थिर करणा-या अनुदानांमुळे त्याच्यातला लेखक मारला जातोय. पूर्वीच्या दिग्गजांना असा आश्रय मिळत नव्हता. कुणी टॅक्सी चालवायचे, कुणी कारकूनी करायचे, कुणी वेटर तर कुणी आणखी कुठली तरी कामं करायचे. सॅम्युएल बेकेट आणि कितीतरी जण असेच झुंजले. तो विषम संघर्ष होता पण, साहित्यिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या संघर्षानेच त्यांच्यातील लेखकाचं पोषण केलं. आपल्या पाश्चिमात्य साहित्य जगातच ही समस्या जाणवते. आशियाई आणि आफ्रिकन लेखकांचं साहित्य वाचताना त्यात काही प्रमाणात तरी कस जाणवतो, ही त्याची शेरेबाजी अनेकांना झोंबली.
इंगडाल या मुलाखतीत आजच्या कथित वेगळ्या, बंडखोर धाटणीच्या साहित्यावरही घसरले आहेत, ‘चौकट मोडण्याचा आव आणणा-या कादंब-या हल्ली खूप लिहिल्या जातात, पण प्रत्यक्षात त्या तशा नसतातच. चोखंदळ वाचकाला लगेच समजतं की यात काही दम नाही. यातलं चौकट मोडणं वगैरे निखालास बनवेगिरी, पूर्वनियोजित आहे हे जाणवतंच. यापैकी बहुतेक लेखक युरोपियन किंवा अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिकलेले असतात. ते कुठलाही उंबरठा ओलांडत नाहीत वा मापदंड मोडत काढत नाहीत, कारण ज्या काही मर्यादा, चौकटी ओलांडायला हव्यात असं त्यांनी ठरवलेलं असतं तशा काहीही मर्यादा, चौकटी नसतातच.’
इंगडाल यांनी यापूर्वीही लेखनविषयक अभ्यासक्रम, विद्यापीठांचं अनुदान यावर टीका केली होती, पण या मुलाखतीतील थेट वार अमेरिकन साहित्यक्षेत्राच्या जास्तीच जिव्हारी लागले. आणखी एक दुखरी नस त्याला कारणीभूत आहे. ती म्हणजे १९९३ मध्ये टोनी मॉरिसन या अमेरिकन लेखिकेनं साहित्याचं नोबेल मिळवलं होतं. त्यानंतर आजतागायत अमेरिकन लेखकाला नोबेल मिळालेला नाही. त्यात इंगडाल यांनी आता थेट अमेरिकेतील साहित्यनिर्मितीला लक्ष्य केल्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली. आताचं साहित्य म्हणजे एखादी खरेदीविक्रीची वस्तू असते तसं झालं आहे. त्याची समीक्षा करण्याइतकं काहीच नाही. जे काही दर्जेदार साहित्य आहे त्यातही त्यामुळे बदल झाला आहे, असं इंगडाल बोलल्यावर तर हलकल्लोळ झाला. ‘ऑब्झव्‍‌र्हर’साठी लिहिणारे समीक्षक रॉबर्ट मक्रम यांनी तर इंगडाल यांना अमेरिकाविरोधी आणि ढुढ्ढाचार्य ठरवून टाकलं.
यापूर्वीही इंगडाल यांनी अमेरिकेतील साहित्यनिर्मितीवर, दर्जावर टीका केली होती. त्यांच्या टीकेवर जोरदार प्रतिहल्ला झाल्यावर इंगडाल यांनी त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास झाल्याची भूमिका घेतली. ‘महत्त्वाच्या अमेरिकन लेखकांना नोबेल जिंकण्याची संधी अजिबातच नाही असंच जणू मी म्हटल्यासारखे सारेजण माझ्यावर तुटून पडले असले तरी मी तशा अर्थाने काहीही म्हणालेलो नाही. नोबेलसाठी पात्र असे अमेरिकन लेखक नाहीत असं मी कधीही म्हणालो नाही. माझं म्हणणं एवढंच की, जागतिक साहित्याचे प्रवाह, अनुवाद यांची अमेरिकेतील उपलब्धता अत्यंत सीमीत असल्यामुळे अमेरिकन साहित्यक्षेत्राला, समीक्षेला मर्यादा आल्या आहेत. जे काही घडतंय, लिहिलं जातंय ते अमेरिकाकेंद्रीत. जणू एखाद्या आरसेगृहात अमेरिकेचीच प्रतिमा सगळीकडून प्रतिबिंबित होत आहे.’ इतर घडामोडींचा अमेरिकन साहित्यात अजिबात पडसाद उमटत नाहीत असंच काहीसं इंगडाल यांना सुचवायचं होतं. ते अर्थातच अमेरिकन लेखक आणि समीक्षकांच्या पचनी पडलेलं नाही.
इंगडाल असं परखड बोलल्यामुळे यंदाचं नोबेल आशियाई वा आफ्रिकन लेखकाला मिळणार अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. काही नावांवर सट्टाही लागला होता. पण ते मिळालं मोदीआनो यांना, तरीही इंगडाल यांच्या या मुलाखतीमुळे काही प्रश्न मात्र छळू लागले आहेत.
उदाहरणार्थ, लेखकाला मग कुटुंबकबिला सांभाळण्यासाठी आर्थिक आधार मिळूच नये का, असा आधार मिळाला तर त्याच्या लेखनाचा कस कमी होतो का, त्याने त्याच्या लिखाणातून संघर्ष मांडला तरच ते लिखाण कसदार, दर्जेदार, पारितोषिकासाठी विचार व्हावा अशा दर्जाचं ठरतं का, बाकीच्यांचे साहित्य मग या निकषांनुसार फुटकळ, सुमार ठरवावं का, या प्रश्नांची उत्तर शोधायला हवीत.
आणि लेखक लिहिता कधी होतो. वास्तवाचे चटके बसल्यावर, परिस्थितीच्या गर्तेत गरगर फिरल्यावर, आत्मा काजळून टाकेल असे दाहक अनुभव घेतल्यावर की तुम्ही फक्त लिहा, बाकी काही करू नका. तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था, कुटुंबाचा उदरनिर्वाह याची जबाबदारी आमची. असं त्याला आश्वस्त केल्यावर प्रतिभेचा झरा त्याच्यातून उमळतो. या प्रश्नांचीही उत्तरं मिळवायला हवीत. प्रयत्न करूया!

हॅप्पी दिवाळी!!



हॅप्पी दिवाळी!!

दिवाळीत धमाल सुरू होती. फटाक्यांचे धडामधूम, मिठाई, फराळ आणि ‘हॅप्पी दिवाळी’ म्हणत शुभेच्छांची लयलूट.

शुभेच्छा संदेशांचा नुसता पाऊस पडतोय. प्रत्यक्ष फोन करण्याची, दोन शब्द बोलण्याची कुणाला फुरसद नसली तरी मेसेज टाइप करण्यासाठी, फॉर्वर्ड करण्यासाठी पाच-सात मिनिटे कामी येत आहेत. जो बघाल तो मोबाइलमध्ये अडकलेला. मान खाली, पाय चालू. समोरचा पण तसाच असेल तर टक्कर अटळ. सुदैवाने फटाके पाहण्यासाठी मान अधूनमधून वर होत असल्याने अनेक अपघात, टकरी होता होता राहिल्या आहेत. नाही तर दिवाळीत वेगळेच फटाके फुटले असते.

मोबाइल कंपन्यांनी भाववाढ करून एसएमएस संदेशवहनाची वाट अडवली असली तरी व्हॉट्स अ‍ॅपने संदेशवहनाचे महाद्वार जणू खुले केले आहे. या महाद्वारातून काहीही पाठवता येते. नुसते संदेश, चित्रं, छायाचित्रं, अ‍ॅनिमेशन, व्हीडिओ जे हवं ते. त्यामुळे या संदेशांमध्ये सुद्धा वैविध्य आलं आहे. एरव्हीही सणासुदीचे दिवस म्हणजे व्हॉट्स अ‍ॅपवर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव. जेवढे वाचाल तेवढे कमी… यातही नव्वद टक्के फॉर्वर्ड केलेले. म्हणजे दुसºया कुणीतरी पाठवलेले कॉपी पेस्ट करून जाने दो आगे टाइपचे. त्यात कधी कधी गोंधळ होतो. मूळ पाठवणाºयाने त्याचे नाव शुभेच्छांखाली लिहिले असले तरी ते खोडण्याचे राहून जाते. मग जी व्यक्ती माहितीतील नाही तिने पाठवलेला संदेश कुणातरी माहितीतील व्यक्तीकडून आपल्याला मिळतो. कधी या ढिसाळपणाचा रागही येतो आणि कधी गम्मतही वाटते.

दसरा-दिवाळीत तर जेवढे शुभेच्छा संदेश पाठवले जातात त्यांच्या आकड्याची विक्रम म्हणून नोंद घ्यायला हरकत नसावी असं कधीकधी वाटतं. भरपूर पुरेपूर अशा प्रकारचं हे संदेशसाहित्य असतं. त्यातला बहुतांशी भाग हा आधी म्हटल्याप्रमाणेच फॉर्वर्डच असतो पण, कधी कधी काही ‘संदेशमौक्तिके’ही हाती लागतात. काही निखळ शुभेच्छा असतात, काहींमध्ये थट्टेचा सूर असतो, काही मजेशीर असतात तर, काही खरोखरीच मार्गदर्शक, काहीतरी उपयुक्त सांगणारे, मांडणारे असे असतात.

यंदाच्या दिवाळीत असे अनेक संदेश व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून पाठवले गेले असतील. त्यापैकी काही उपयुक्त, मार्गदर्शनपर आणि काही मजेशीर असे संदेश पुढे देतोय -

एक संदेश आला होता – ‘‘कुणी शार्पशुटर आहे का, आपल्या ग्रुपवर?

का म्हणजे काय?

टिकल्यांचं पाकीट फोडायचय यार..’’

आणखी एक असाच मजेशीर होता -

‘‘तुम्ही स्वत:ला शेरदील, वाघ समजत असाल तर त्वरित संपर्क करा..

दिवाळीचा किल्ला केलाय… त्या किल्ल्यावरच्या गुहेत बसण्यासाठी तुमची गरज आहे…’’

हे सगळे टाइमपास प्रकारचे संदेश. पण, काही खरोखरीच विचार करायला लावणारे असतात. वेगळी, समाजपयोगी दिशा दाखवणारे असतात. जसा हा संदेश -

धनत्रयोदशीच्या दिवशी आलेला हा संदेश धनवृद्धी कशी कराल, तुमची आर्थिक स्थिती कशी मजबूत ठेवाल याबद्दल काही चांगल्या टीप्स देतो. तुमच्या क्षमतेइतके, पात्रतेइतके वेतन मिळवा आणि खर्च तुमच्या कमाईपेक्षा कमी ठेवा… बजेट हा आजच्या युगाचा एकाक्षरी मूलमंत्र ध्यानात ठेवा… आपली कमाई लक्षात घेऊन प्रत्येकानेच बजेट आखले पाहिजे, खर्चाचीही आवश्यक आणि अनावश्यक अशी विभागणी केली पााहिजे.. याचा काटेकोर अवलंब केलात तर श्रीमंत होणे अशक्य नाही. क्रेडिट कार्डची देयके वेळच्या वेळी चुकती करा… केवळ क्रेडिट कार्डच नव्हे तर वीज बिल, टेलिफोन बील अशी सगळीच बिले मुदतीआधी भरलीत तर तुमची बचत तर होईलच पण थोडा अधिकचा पैसाही तुमच्याजवळ असेल… निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीही तजवीज करून ठेवा. तशा एखाद्या विमा योजनेत पैसे गुंतवा. बचत खात्यात शिल्लक वाढून फार काही फायदा होत नसतो, बँकेतील बचत खात्यातील रकमेवर मिळणाºया व्याजावर कर भरावा लागतो तो वेगळाच. यामुळेच तुमची बचत योग्य प्रकारे, फायदेशीररीत्या गुंतवा. गुंतवणूक मॅच्युअर झाली की लगेच दुसरीकडे फिरवा. तो पैसा जितका काळ तसाच पडून राहील तेवढे तुमचा तोटा अधिक. गुंतवणूक योजनांच्या माहितीसाठी तुम्ही स्वत: अभ्यास करा, फक्त मध्यस्थांवर अवलंबून राहू नका. अडीअडचणीच्या प्रसंगांसाठी पैसा राखून ठेवा वा तात्काळ मोकळा करता येईल अशा योजनांमध्ये गुंतवा. म्हणजेच तुमचा सध्याचा खर्च, बिलं भागवता येतील आणि तीन ते सहा महिने खर्च भागेल अशी बचत म्हणजेच अडीअडचणीसाठीचा पैसा. चांगली विमा योजना घ्या. इच्छापत्र बनवा आणि ते अपडेटही करत राहा. तुमच्या सर्व गुंतवणुकीचं, बचतीचं आणि देणग्या, वैद्यकीय खर्च अशा सगळ्याच्या नोंदी एकत्र ठेवा. तरच प्राप्तीकरातून सवलत, वजावट आदीचा लाभ तुम्हाला घेता येईल आणि ऐनवेळी धावाधाव होणार नाही.

आणखी एक संदेश थोडा भावनिक होता – मोबाइल, टीव्ही बंद करून आईबाबांनी मुलांना दिलेला वेळ हेच मुलांसाठी धन, पतीच्या नजरेत दिसणारं प्रेम हेच पत्नीसाठी धन, वृद्ध मातापित्यांची काळजी घेणारी मुलं हेच त्या ज्येष्ठांचे खरे धन… हाही विचार करायला लावणारा होता.

सामाजिक जबाबदारीचं भान देणारा हा एक संदेशही सर्वत्र फिरत होता – डी फॉर डोनेट. गरजूंना कपडे, अन्नधान्य दान करा. आय फॉर इल्युमनेट. निसर्ग संरक्षणाची जाण तुमच्यात जागवा. डब्लू फॉर विश. जागतिक, राष्ट्रीय आणि स्वत:ची भरभराट व्हावी, शांतता व समाधान लाभावे यासाठी प्रार्थना करा. ए फॉर अव्हॉइड. फटाके, वीज, अन्न यांची नासाडी टाळा. प्रदूषण टाळा. एल फॉर लाइट. आध्यात्मिक तेजाने तुमचे आयुष्य उजळून टाका. आय फॉर इन्स्पायर. सौहार्द, बंधुभाव याची साक्ष म्हणून दिवाळी साजरी करण्यास सर्वांना उद्युक्त करा…

दिवाळीचा एक संदेश फारच सुंदर होता… चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती.

टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती

थेंबभर तेल म्हणे, मी देईन साथ…

हेच तर महत्त्वाचं असतं… ऐक्य, परस्परांना पाठबळ आणि अंधकार दूर करण्याची एकत्रित ताकद… ती तुम्हाला कायमच लाभावी याच शुभेच्छा!!