Thursday, April 28, 2011

वाट लावतोय रिक्षावाला...


`कामावर जायला उशीर झायला, बगतोय रिक्षावाला गं वाट माझी बगतोय रिक्षावाला...' संपूर्ण ठाणे जिल्ह्यात गेले वर्ष-दीड वर्ष धुमाकूळ घालणाऱया या गाण्यात कल्याण-डोंबिवलीतील सहनशील प्रवाशांनी सध्या थोडासा बदल केला आहे. आरटीओ, वाहतूक शाखा आणि क्वचितप्रसंगी हुज्जत घालणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके खमके प्रवासी यांच्यातील कुणालाच न जुमानणाऱया उद्दाम, मुजोर रिक्षावाल्यांसाठी कल्याण-डोंबिवलीतील चाकरमान्यांनी `वाट माझी लावतोय रिक्षावाला' असे नवे गाणे उद्वेगाने म्हणायला सुरुवात केली आहे. भाडे नाकारणे, हुज्जत घालणे, मनाला येईल तेवढे पैसे मागणे अशा स्वरूपातील रिक्षाचालकांची मग्रुरी मुंबई-ठाण्याचे अडले-नडले प्रवासी रोजच अनुभवत असतात. पण, कल्याण-डोंबिवलीतील परिस्थिती त्यापेक्षाही भीषण टोकाला पोहोचली आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा न मानणारी अशी येथील रिक्षाचालकांची जमात आहे. त्यांना मीटर लावण्याचा कायदा ही सक्ती वाटते, मात्र, शेअरभाडय़ाचे दर आरटीओने ठरवून देण्याआधीच परस्पर भाडेवाढ करणे हा त्यांचा `न्याय' आहे. कल्याण, डोंबिवली या शहरांना मराठमोळी नगरे म्हणून सुसंस्कृत चेहरा आहे. अनेक राज्यांतून पोटापाण्यासाठी मुंबई गाठणाऱयांनीही कल्याण-डोंबिवलीला आपलेसे केले आहे. या शहरांच्या सीमेबाहेर वसलेल्या मूळच्या गावा-पाडय़ांमध्ये विस्तारत गेलेल्या सिमेंटच्या जंगलांमध्ये या सगळ्यांचे संसार नांदत आहेत. महापालिकेची सार्वजनिक वाहतूकव्यवस्था पुरेशी सक्षम नसल्यामुळे सकाळच्या धावपळीच्या वेळी कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली यापैकी कोणतेही रेल्वे स्थानक गाठायचे तर रिक्षाशिवाय तरणोपाय नाही. मीटरने भाडे ही संकल्पनाच रिक्षाचालकांना मान्य नसल्यामुळे शेअर रिक्षा म्हणजे हम करे सो कायदा अशी त्यांची मनमानी अनेक वर्षे सुरू आहे. आरटीओच्या `डोळे'वटारणीलाही भीक न घालणाऱया या रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांनांही `पुडी'त गुंडाळून खिशात ठेवले आहे. मनाला येईल तेव्हा शेअरभाडे वाढवून प्रवाशांची लुबाडणूक करणाऱया या रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांची बाजू घेऊन ज्या राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी उभे राहायला हवे, त्याच पक्षांनी आश्रय दिल्यामुळे रिक्षा संघटनांचेही फावले आहे. ही लुबाडणूक आणि प्रवाशांना वाऱयावर सोडणाऱया यंत्रणांबद्दल आम्ही सातत्याने आवाज उठवल्यानंतर आरटीओने शेअररिक्षाचे दरपत्रक जाहीर केले खरे, पण हे दरपत्रक न जुमानता आजही रिक्षाचालकांनी वाटमारी सुरू ठेवली आहे. अनेकांना तर दरपत्रक असल्याचेच माहिती नाही. सरकारी यंत्रणांचा या संघटित लुबाडणुकीला आशीर्वाद आहे, यात शंकाच नाही. आता प्रवाशांनीच बहिष्काराचे अस्त्र उपसून `वाट बगतोय रिक्षावाला' असे म्हणण्याची वेळ रिक्षाचालकांवर आणायला हवी.

Wednesday, April 27, 2011

लिहायचं की वाचायचं...

माझ्या मनात पुन्हा तोच सनातन संघर्ष सुरू झालाय... लिहायचं की वाचायचं... मोठ्या उत्साहात ब्लॉग लिहायचा संकल्प सोडला होता आणि आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ब्लॉग लिहिणचं सोडल्यागत झालंय. आपल्या परिचयातील दोन-पाच लोक कौतुकानं वाचतात ब्लॉग, त्यापुढे काय असाही एक प्रश्न मीच मला विचरात असतो. तीही सबबच लिहायचं नाही म्हणून... लिहायचं नाही म्हणजे कंटाळा येतो किंवा काही सुचत नाही म्हणून थांबलोय असंही नाही. पण वाटतं की कितीजणांनी इतकं उत्कृष्ट लिहून ठेवलंय तेच वाचायला वेळ पुरत नाही तर लिहिण्यात आणखी वेळ घालवणं कसं काय बुवा योग्य आहे.. मग लिहायचं असलं तरी टाळलं जातं. पण मी थांबलोय हे काहींच्या लक्षात आलं आणि त्यांनी आस्थेनं विचारलं म्हणून पुन्हा हे इतकं लिहिलं... आता कदाचित लिहिन वा थांबेनही... पाहू !!

Monday, April 4, 2011

तुह्या गनेश कंचा?
कुणाचं डोकं कशावरून सटकेल सांगता येत नाही. काहीही कारण प्रक्षोभक ठरू शकतं. आता याच मजकूराच्या प्रारंभी दिलेली गणेशचित्रे तुम्ही पाहिली असतीलच! तुम्हा-आम्हाला ती गणेशचित्रे वाटली तरी आणखी कुणाला त्यांत काही वेगळेच दिसू शकते. अगदी `भलतेच आक्षेपार्ह' असेही काही वाटू शकते. या गणेशचित्रांचे चित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी ठाण्यात या चित्रांचे प्रदर्शन भरवले आणि पायावर जणू भला मोठा धोंडाच पाडून घेतला. `ही कसली चित्रे, हा मुळात गणपतीच नाहीये, ही विटंबना आहे गणेशाची...', असं काय-काय बडबडत ठाण्यातील काही जागरूक गणेशप्रेमी मंडळी त्यांच्यावर चालून आली. म्हापसेकरांना चित्रं उलटी करावी लागली. या मंडळींचंही बरोबर होतं. त्यांना या चित्रांत गणपती दिसत नव्हता, गणपती असा नसतोच मुळी..., असा त्यांचा आक्षेप होता. गडबड झाली ती म्हापसेकरांची. मी कसा दिसतो हे गणपतीने या मंडळींना सांगून ठेवल्याचं त्यांना माहिती नव्हतं, त्यामुळे चित्रं काढताना त्यांनी आधी या  मंडळींना विचारलंच नाही, त्यांची परवानगी घेतली नाही. यामुळे सारं बिघडलं. आणखी एक बारीक गडबड झाली ती या मंडळींची. म्हापसेकरांना गणपती अशा वेगवेगळ्या आकारांत दिसतो, ज्याला-त्याला, चित्रकाराला, प्रत्येक सश्रद्ध व्यक्तीला त्याचे श्रद्धास्थान, दैवत अनेक आकारांत, प्रकारांनी दिसू शकते हे लक्षात न घेतल्यामुळे त्यांचंही डोक सटकलं असणार. त्यांना मतं आहेत, त्यांची आग्रही भूमिका आहे आणि त्याचप्रमाणे इतरांचीही, चित्रकारांचीही असू शकते इतका साधा विचार या गोंधळात सटकलेल्या डोक्यात येणं जरा अवघडच की!
या मंडळींनी म्हापसेकरांची पंचाईत केली आणि त्यांनी चित्रं उलटी फिरवली. एवढय़ावरच प्रकरण थांबलं नाही. त्या चित्रप्रदर्शनात आणखी कुणा `मनातून धर्म'वाल्या मंडळींनी म्हापसेकर यांना गाठलं नंतर. `तुम्ही चित्रं उलटी फिरवलीतच कशी? गणपतीचे तोंड भिंतीकडे फिरवता? कुठे फेडाल ही पापं? तुम्ही आमच्या भावनांचा, श्रद्धांचा, दैवताचा अपमान केलाय. ताबडतोब ही चित्रं पुन्हा सुलट करा...', अशी त्यांची भाषा. वैतागून म्हापसेकरांनी रविवारी संध्याकाळी सगळी चित्रंच उतरवली आणि प्रदर्शन आटोपतं घेतलं.
यात झालं काय की खुद्द गणपतीनं ज्यांना `दर्शन' देऊन तो असा दिसतो, असं सांगितलं होतं त्या मंडळींनी मुळात त्यांचा गणपती कसा दिसतो हे सांगितलंच नाही. आता यापुढे गणेशमूर्तिकार, चित्रकार, शिल्पकार अशा मंडळींनी कृपया त्यांच्याशी संपर्क साधून आधी या मंडळींकडून कॉपीराईट घ्यावा आणि मगच मातीत, रंगात हात-ब्रश घालावा... नपेक्षा अशा मति फिरलेल्या मंडळींकडून त्यांच्या कामाची माती व्हायला वेळ लागणार नाही, आधीच सांगून ठेवतो!
जाता जाता - मागे कधीतरी मी कुणा गणेशभक्त, कुणा कृष्णभक्त व्यक्तींना त्यांचे आराध्य दैवत साक्षात दर्शन देते असं ऐकलं-वाचलं होतं. त्यांच्याकडून ही दैवतं कशी दिसतात ते जाणून घ्यायचं राहिलं याची हळहळ वाटतेय. मी उगाचच आपला चित्रकारांनी चितारलेल्या दैवत चित्रांसमोर, देव्हाऱयातल्या मूर्त़ींसमोर आजवर नतमस्तक होत राहिलो. माय मिस्टेक!