Thursday, April 28, 2011

वाट लावतोय रिक्षावाला...


`कामावर जायला उशीर झायला, बगतोय रिक्षावाला गं वाट माझी बगतोय रिक्षावाला...' संपूर्ण ठाणे जिल्ह्यात गेले वर्ष-दीड वर्ष धुमाकूळ घालणाऱया या गाण्यात कल्याण-डोंबिवलीतील सहनशील प्रवाशांनी सध्या थोडासा बदल केला आहे. आरटीओ, वाहतूक शाखा आणि क्वचितप्रसंगी हुज्जत घालणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके खमके प्रवासी यांच्यातील कुणालाच न जुमानणाऱया उद्दाम, मुजोर रिक्षावाल्यांसाठी कल्याण-डोंबिवलीतील चाकरमान्यांनी `वाट माझी लावतोय रिक्षावाला' असे नवे गाणे उद्वेगाने म्हणायला सुरुवात केली आहे. भाडे नाकारणे, हुज्जत घालणे, मनाला येईल तेवढे पैसे मागणे अशा स्वरूपातील रिक्षाचालकांची मग्रुरी मुंबई-ठाण्याचे अडले-नडले प्रवासी रोजच अनुभवत असतात. पण, कल्याण-डोंबिवलीतील परिस्थिती त्यापेक्षाही भीषण टोकाला पोहोचली आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा न मानणारी अशी येथील रिक्षाचालकांची जमात आहे. त्यांना मीटर लावण्याचा कायदा ही सक्ती वाटते, मात्र, शेअरभाडय़ाचे दर आरटीओने ठरवून देण्याआधीच परस्पर भाडेवाढ करणे हा त्यांचा `न्याय' आहे. कल्याण, डोंबिवली या शहरांना मराठमोळी नगरे म्हणून सुसंस्कृत चेहरा आहे. अनेक राज्यांतून पोटापाण्यासाठी मुंबई गाठणाऱयांनीही कल्याण-डोंबिवलीला आपलेसे केले आहे. या शहरांच्या सीमेबाहेर वसलेल्या मूळच्या गावा-पाडय़ांमध्ये विस्तारत गेलेल्या सिमेंटच्या जंगलांमध्ये या सगळ्यांचे संसार नांदत आहेत. महापालिकेची सार्वजनिक वाहतूकव्यवस्था पुरेशी सक्षम नसल्यामुळे सकाळच्या धावपळीच्या वेळी कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली यापैकी कोणतेही रेल्वे स्थानक गाठायचे तर रिक्षाशिवाय तरणोपाय नाही. मीटरने भाडे ही संकल्पनाच रिक्षाचालकांना मान्य नसल्यामुळे शेअर रिक्षा म्हणजे हम करे सो कायदा अशी त्यांची मनमानी अनेक वर्षे सुरू आहे. आरटीओच्या `डोळे'वटारणीलाही भीक न घालणाऱया या रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांनांही `पुडी'त गुंडाळून खिशात ठेवले आहे. मनाला येईल तेव्हा शेअरभाडे वाढवून प्रवाशांची लुबाडणूक करणाऱया या रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांची बाजू घेऊन ज्या राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी उभे राहायला हवे, त्याच पक्षांनी आश्रय दिल्यामुळे रिक्षा संघटनांचेही फावले आहे. ही लुबाडणूक आणि प्रवाशांना वाऱयावर सोडणाऱया यंत्रणांबद्दल आम्ही सातत्याने आवाज उठवल्यानंतर आरटीओने शेअररिक्षाचे दरपत्रक जाहीर केले खरे, पण हे दरपत्रक न जुमानता आजही रिक्षाचालकांनी वाटमारी सुरू ठेवली आहे. अनेकांना तर दरपत्रक असल्याचेच माहिती नाही. सरकारी यंत्रणांचा या संघटित लुबाडणुकीला आशीर्वाद आहे, यात शंकाच नाही. आता प्रवाशांनीच बहिष्काराचे अस्त्र उपसून `वाट बगतोय रिक्षावाला' असे म्हणण्याची वेळ रिक्षाचालकांवर आणायला हवी.

No comments:

Post a Comment