कल्याण-डोंबिवली पालिकेतील निलंबित लाचखोर कार्यकारी अभियंता सुनील जोशी याला पुन्हा कामावर घेण्याचा ठराव महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती मागल्या दाराने मंजूर करवून घेते यामागील ‘अर्थ’ न समजण्याइतके मतदार खुळे नाहीत. जोशीची विभागीय चौकशी पूर्ण करण्यात यावी, तसेच त्याच्या खटल्याचा निर्णय लागेपर्यंत त्याला कामावर हजर करू नये, असा ठराव यापूर्वीच पालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या महासभेत मंजूर झाला असताना अचानक हा ठराव मंजूर करण्यात आला हे विशेष. प्रसारमाध्यमांतून आणि विरोधी पक्षांकडून या ठरावावर टीकेची झोड उठल्यानंतरही हा ठराव करण्यात काहीही वावगे केलेले नाही, असा निगरगट्ट खुलासा महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनी केला. जोशी याला घरबसल्या पन्नास हजार रुपये वेतन दिले जात आहे, त्याच्याकडून त्या पैशांचे ‘काम’ करून घ्यावे, या उदात्त हेतूने हा ठराव युतीने मंजूर केला होता म्हणे! जनतेच्या पैशाची नासाडी टाळण्याची यांची आंच एवढी मोठी की ‘रिमोट कंट्रोल’ने चालणा-या शिवसेनेच्या वरिष्ठांना अंधारात ठेवून हे सत्कार्य तडीस नेण्यात आले, असाही हास्यास्पद दावा युतीने केला आहे. शनिवारी महासभा संपतेवेळी कार्यपटलावर नसलेला ठराव एका अपक्ष नगरसेवकाकडून आयत्यावेळी मांडण्यात येतो आणि युतीचे सदस्य कोणतीही चर्चा घडवून न आणता तो तात्काळ मंजूर करतात, महापौरबाई लगेचच राष्ट्रगीत सुरू करण्याचा आदेश देऊन महासभा गुंडाळतात, या सगळ्या घडामोडींतून दिसणारी युतीची जनहिताची कळकळ आपण समजून घेतली पाहिजे. जनतेमध्ये लाचखोर जोशीबद्दल आणि त्याची निर्लज्ज वकिली करणा-यांबद्दल किती प्रचंड रोष आहे, हे लक्षात आल्यावर वरिष्ठ नेत्यांनी कानावर हात ठेवून स्थानिक सुभेदारांचे कान उपटण्याचे नाटक रंगविले. अगदी जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेच्या नगरसेवकांची ‘खरडपट्टी’ काढण्याचे आव आणला. खरोखरीच वरिष्ठांना विश्वासात न घेता हा व्यवहार झाला असता, तर आतापर्यंत महापौर, सभागृह नेते, जिल्हाप्रमुख यांचे राजीनामे घेतले गेले असते. ते तसे घेतले गेले नाहीत याचा अर्थ उघड आहे. या एकाच प्रकरणात युतीच्या ‘स्वच्छ’ कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत असे नाही; यापूर्वीही सुरेश पवारांसारख्या भ्रष्ट अधिका-याला याच मंडळींनी ‘पावन’ करून घेतले आहे. निलंबनाची कारवाईही महापौरांनीच रोखली आहे. मनसेनेही शहरात महापौरांचा राजीनामा मागणारे फलक लावून सचोटीचे प्रदर्शन केले आहे. मात्र, भ्रष्टाचाराचा वटवृक्ष रुजवणा-या युतीला पालिकेत सत्तेवर आणण्याचे पातक त्यांच्याच माथी आहे, हे मतदार विसरणार नाहीत.
Thursday, June 23, 2011
Monday, June 20, 2011
थेंबांचे इवलाले मोती तळहातावर झेलून घ्यावे...
पावसाबद्दल प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूरने लिहिलंय -
बहकीसी बारीशने फिर
यादोंकी गठरी खुलवायी
मीलें चन्द लम्हें घायल
और ढेर सारी रुसवाई...
आणि त्याच्याच एका कवितेत तो म्हणतोय -
झरे मेघ आभाळी तेव्हा
भान हरपुनी चिंब भिजावे
थेंबांचे इवलाले मोती
तळहातावर झेलून घ्यावे...
गुरू लिहितो अगदी आपल्या मनातलं सांगितल्यासारखं पण, तुम्ही खरं सांगा पायाला चाकं लावलेल्या तुम्हा-आम्हा मुंबईकरांना वेळ आहे का हो असं कुणाच्या आठवणींनी घनव्याकूळ व्हायला? सिमेंटच्या जंगलात सरसर उतरणाऱया पाऊसथेंबांचं स्वागत करायला क्षणभर थांबायला? `थांबला तो संपला' ही उक्ती मुंबईच्या पावसात `थांबला तो भिजला' अशी बदलते हे प्रत्येक मुंबईकरासाठी स्वानुभवाचे बोल आहेत. भरधाव वाहनांमुळे रस्त्यांवर नव्हे खड्डय़ांत साचलेल्या चिखलपाण्याच्या पिचकारीने ज्याला वा जिला शर्ट, स्कर्ट, पाटलोण, साडी अशा कुठल्याही वस्त्रावर हुसैनी डिझाइन चितारून घ्यायचंय त्याने असं मध्येच पावसासाठी थांबण्याची हिंमत करावी. मुरब्बी मुंबईकर कुठेच थांबत नाही. सोसाटय़ाचा वारा आणि तुफान पावसाला कसाबसा इवल्याशा छत्रीने सामोरा जाता जाता तो ओलाचिंब झालेला असतोच. पावसाला भेटायला तो थांबला नाही तरी पाऊस त्याला येऊन कडकडून भेटतोच. घाटात, गडकिल्ल्यांकडे जाणाऱया अनवट रानवाटांवर भेटणारा झिम्माड, तुफान, बेफाम, आडवातिडवा झोडपणारा पाऊस याच सगळ्या रूपांमध्ये इथल्या इथे मुंबईतही आपली गाठभेट घेतो. खऱया मुंबईकराला हे माहिती असतं.
यामुळेच, अडलेले रस्ते, वाहतुकीची कोंडी, लोकलमधील रखडपट्टी, फलाटांवरची अफाट गर्दी, दुकानांच्या पत्र्यांवरून ओघळणाऱया पागोळ्यांचा अभिषेक, रस्ता, खड्डे व्यापून चारीठाव वाहणारे चिखलपाणी कशाकशाने मुंबईकरांची पावले थांबत नाहीत, अडखळत नाहीत. नेमेची येणाऱया पावसाबरोबर ठरलेल्या अडचणीही दरवर्षी येणारच हे सर्वसामान्य मुंबईकरांनी आता गृहितच धरलंय. यामुळेच कितीही लटकंती झाली तरीही रस्त्याकडेला लागलेल्या गाडीवरील गरमागरम भजी आणि आलं घातलेली झकास कडक कटिंग चाय त्याला क्षणार्धात फ्रेश करते अन् मुंबई मस्त पाऊस अंगावर घेत चालत राहते!
छायाचित्रे - अतुल मळेकर, संदेश घोसाळकर
Thursday, June 16, 2011
‘स्पेशलवाला’
जे. डे गेल्यावर अनेकांनी त्याच्यावर लिहिलं, अगदी त्याच्या बातम्या नाकारणा-या वरिष्ठांनी आणि त्याला माणुसघाणा समजणा-या त्याच्या सहका-यानीही. मला डे आठवतो तो मितभाषी, आमच्या लालबागच्या कँटिनमध्ये एका बाजूला बहुतेकवेळा एकटाच बसून कडक चहाचे घुटके घेणारा. ओळख असूनही त्याला ‘हाय’ केलं तरच तो हात वर करून प्रतिसाद द्यायचा, हलकेच मान हलवायचा.. हे जवळपास दररोज घडायचं. डे ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये दाखल झाला तेव्हा ‘लोकसत्ता’त स्थिरावून मला काही वर्षे उलटली होती. काही अपवाद वगळता ‘एक्सप्रेस’च्या पत्रकारांनी ‘लोकसत्ता’ला गिनतीत धरायचं नाही आणि ‘लोकसत्ता’च्या मंडळींनीही त्यांना नजरेआड करायचं, असं अदृश्य कुंपण आमच्यात असायचं. कारण काहीच नव्हतं, पण असं जाणवत राहायचं. रिपोर्टर मंडळींच्या बाबतीत या कुंपणाला अपवाद करणारी मंडळी दोन्हीकडे होती. एखाद्या बातमीसाठी एक्स्प्रेसच्या रिपोर्टिग डेस्कवरून लोकसत्ताचा फोन वाजायचा, एखादी बातमी आणून दिली जायची, एखादी बातमी कन्फर्म केली जायची, इनपुट घेतले-दिले जायचे.. हेही रोजचंच होतं. डे या मंडळींपैकी एक होता. गुन्हे वार्तांकनाबाबत लोकसत्ता म्हणजे राम पवार आणि एक्स्प्रेसला डे यांच्याशिवाय पर्याय नव्हता. या दोघांमध्ये चांगलं सहकार्य असायचं. लालबाग कार्यालयाच्या आवारात कधीतरी दुपारी गप्पाटप्पा सुरू असताना, उंचापुरा, ब-यापैकी दणकट शरीरयष्टीचा, थोडासा वाकून चालणारा डे छोटय़ाशा गेटमधून आत शिरायचा. मोटारसायकल आणि डे असं एक समीकरण आमच्या मनात फिट्ट होतं. बहुतेकदा नीट इन केलेला बारीक चौकटींचा हाफ शर्ट, कधी जीन्स तर कधी पँट असा डे एखाद्या साध्या वेशातील पोलिसासारखा ‘स्पेशलवाला’ दिसायचा, वावरायचा. सतत बीटवर असल्यासारखंच त्याचं वागणं असायचं. त्या पाच-सहा वर्षाच्या कालखंडात मी कधीच एक्स्प्रेसच्या इतर रिपोर्टर मंडळींच्या कोंडाळ्यात गप्पा हाणतांना, खळखळून हसताना पाहिला नाही. कँटिनमध्येही एका बाजूला बसलेल्या डेला ‘आज कुछ है क्या..’, असं विचारल्यावर तो फार काही सांगायचा नाही. तरीही काही वेळा त्याने ‘लोकसत्ता’ला बातम्यांची कॉपी दिली होती. त्या काळात ‘जे. डे’ ही बायलाइन एक्स्प्रेसच्या पानांचा अविभाज्य भाग असायची. कालांतराने ‘एक्स्प्रेस’ची साथ सोडून तो ‘हिंदुस्तान टाइम्स’कडे गेला. आता तर तो सगळचं सोडून गेलाय..
Labels:
specials
पोलिस यंत्रणेमुळेच जे. डेंचा बळी
...गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, ही राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलेली नेहमीची पोपटपंची आणि ‘..जे. डे यांच्या मारेक-यांना पकडले जाईल इतकेच नव्हे तर त्यांच्या हत्येचा कट रचणा-यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल’, हे मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांचे वक्तव्य, या सगळ्याला आता पाच दिवस उलटून गेलेत. पोलिसांनी जारी केलेली मारेक-यांची रेखाचित्रे वगळता अन्य कुठलाही धागादोरा त्यांच्या हाती लागलेला नाही. तपास थांबल्यागत झालाय. थांबलेले नाहीत ते फक्त जेंच्या आईच्या, बहिणीच्या आणि पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू. आता तर डे यांच्या हत्येमागे पोलिस अधिकारीच असल्याचे उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.
पोलिसांवरंच प्रेशर वाढत चाललं तसं कुणातरी तिघांना पकडून हजर केलं गेलं. आणि लगेच रात्री सोडूनही दिलं. पोलिस या करामती नेहमीचकरत असतात. पण यामुळे पोलिस या हत्येबाबत मारेकर्यांचा शोध घ्यायला खरोखरीच कितपत सीरीयस आहेत हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तेल तस्करी, टोळीयुद्ध, मटका, रिअल इस्टेटकडे नजर वळलेल्या बडय़ा डॉन मंडळींची मोठमोठय़ा गृहनिर्माण प्रकल्पांतील भागीदारी आणि एसआरएतील गुंतवणूक, खंडणीखोर गुंड, मुंबईवर राज्य करण्यासाठी अंडरवर्ल्डमध्ये सतत सुरू असलेली चढाओढ, परदेशातील गुंडांच्या संपर्कात, पे रोलवर असणारे भ्रष्ट पोलिस अधिकारी, गुंडपुंडांचे आश्रयदाते राजकारणी यांच्यातील साटेलोटे.. या सगळ्याबद्दल जे बिनधास्त लिहायचा, त्याचं नेटवर्क जबरदस्त होतं, पोलिस खात्यात, अंडरवर्ल्डमध्ये, खब-यांच्या दुनियेत त्याला माहिती उपलब्ध व्हायची. त्याच्या या तपशीलवार पर्दाफाशमुळे पोलिसांना कारवाई करणे, हातपाय हलवणे भाग पडायचे. त्याच्या या लिखाणामुळे अनेकांची मोठी हानी झाली होती, अनेकांच्या काळ्या कारवाया उजेडात आल्या होत्या. त्यात गुंड होते, टोळ्या पोसणारे राजकारणी होते, तेल तस्कर होते आणि दुखावले गेलेले काही भ्रष्ट पोलिस अधिकारीही होते. अनेकांच्या मागावर असलेला जे आणखी काही धक्कादायक भांडाफोड करण्याच्या तयारीत होता. यापैकी कुणीतरी त्याला मार्गातून दूर केला असण्याची शक्यता आहे.
या सर्वापेक्षा जे डेंच्या हत्येला जबाबदार आहे, ती निष्क्रिय पोलिस यंत्रणा. डिझेल माफिया, मटका किंग, खंडणीखोर गुंड, परदेशात लपून बसलेल्या गुन्हेगारांच्या सांगण्यानुसार इथे कुणावरही बंदूक रोखणारे, जीव घेणारे छोटे-मोठे शूटर, गुंडांना पोसणारे बिल्डर यापैकी कुणावरही कठोर कारवाई न करणाऱ्या मुंबई पोलिसांना जणू त्यांच्या ब्रीदवाक्याचा विसर पडला आहे. एकेकाळी अवघ्या अंडरवर्ल्डला जरब बसवणारे मुंबई पोलिस अवसान गळाल्यागत थंड पडले आहेत, हेच नेमके जेला खूपत होते. मुंबईला ग्रासणारा हा कॅन्सर पोलिसांना दिसत कसा नाही? या त्वेषात त्याने अनेक गोष्टी उघड केल्या, गुंडांना आणि त्यांना पाठीशी घालणा-या भ्रष्ट अधिका-यांना उघडे पाडले, त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा केले, बातम्या दिल्या. मुंबई शांत आहे, कुठे काय भानगडी सुरू आहेत.. अशा अविर्भावात डोळे मिटून बसलेल्या पोलिसांना त्याच्या तपशीलवार, पुराव्यानिशी दिलेल्या बातम्यांमुळे कारवाई करणे भाग पडले होते. त्याच्या या लिखाणामुळे तेलमाफियांचे प्रचंड नुकसान झाले होते, रियल इस्टेटमध्ये जम बसवू पाहणा-या अनेकांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात आले होते. या सगळ्यांना तो काटय़ासारखा सलू लागला होता. साम, दाम यापैकी कशालाही जे भीक घालत नसल्यामुळे त्याची लेखणी कायमची थांबवणे हाच एक पर्याय या मंडळींसमोर होता. यामुळेच जे मारला गेला. पत्रकार, छायाचित्रकारांवर लाठय़ाकाठय़ा चालवणाऱ्या मुंबई पोलिसांनी आधीच गुंडपुंडांना जरब बसवली असती, संघटित गुन्हेगारीचा, खंडणीखोर टोळ्यांचा बिमोड केला असता, तर जेला या भ्रष्ट यंत्रणेला इतके भिडायची गरज पडली नसती, त्याचा जीव तरी वाचला असता..
पत्रकारांनी लिहायचे आणि मगच पोलिसांनी हलायचे, असे दिवस आले असतील तर कठीण आहे. भ्रष्ट पोलिस, स्वार्थी राजकारणी आणि गुंड टोळ्यांचा ऑक्टोपस मुंबई कणाकणाने गिळतो आहे. छोटय़ा-मोठय़ा गुन्ह्यांतील आरोपींपासून अगदी संघटित टोळ्यांपर्यंत कुणावरही कारवाई करण्याची इच्छाशक्ती न दाखवणारी निष्क्रिय पोलिस यंत्रणा याचीच पुष्टी देत आहे. पोलिस आणि राजकारण्यांपर्यंत सगळेच भ्रष्ट आहेत, असा सरसकट शेरा मारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नसले तरी हे खरे असावे, असे वाटण्याइतकी जखम चिघळली आहे. आणि ‘विरुद्ध’ चित्रपटात अमिताभने साकारलेल्या असहाय्य बापासारखाच सर्वसामान्य मुंबईकरांचा चेहरा केविलवाणा दिसू लागला आहे.
Labels:
specials
Subscribe to:
Posts (Atom)