Thursday, June 23, 2011

‘अर्थ’ उघड आहे..

कल्याण-डोंबिवली पालिकेतील निलंबित लाचखोर कार्यकारी अभियंता सुनील जोशी याला पुन्हा कामावर घेण्याचा ठराव महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती मागल्या दाराने मंजूर करवून घेते यामागील ‘अर्थ’ न समजण्याइतके मतदार खुळे नाहीत. जोशीची विभागीय चौकशी पूर्ण करण्यात यावी, तसेच त्याच्या खटल्याचा निर्णय लागेपर्यंत त्याला कामावर हजर करू नये, असा ठराव यापूर्वीच पालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या महासभेत मंजूर झाला असताना अचानक हा ठराव मंजूर करण्यात आला हे विशेष. प्रसारमाध्यमांतून आणि विरोधी पक्षांकडून या ठरावावर टीकेची झोड उठल्यानंतरही हा ठराव करण्यात काहीही वावगे केलेले नाही, असा निगरगट्ट खुलासा महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनी केला. जोशी याला घरबसल्या पन्नास हजार रुपये वेतन दिले जात आहे, त्याच्याकडून त्या पैशांचे ‘काम’ करून घ्यावे, या उदात्त हेतूने हा ठराव युतीने मंजूर केला होता म्हणे! जनतेच्या पैशाची नासाडी टाळण्याची यांची आंच एवढी मोठी की ‘रिमोट कंट्रोल’ने चालणा-या शिवसेनेच्या वरिष्ठांना अंधारात ठेवून हे सत्कार्य तडीस नेण्यात आले, असाही हास्यास्पद दावा युतीने केला आहे. शनिवारी महासभा संपतेवेळी कार्यपटलावर नसलेला ठराव एका अपक्ष नगरसेवकाकडून आयत्यावेळी मांडण्यात येतो आणि युतीचे सदस्य कोणतीही चर्चा घडवून न आणता तो तात्काळ मंजूर करतात, महापौरबाई लगेचच राष्ट्रगीत सुरू करण्याचा आदेश देऊन महासभा गुंडाळतात, या सगळ्या घडामोडींतून दिसणारी युतीची जनहिताची कळकळ आपण समजून घेतली पाहिजे. जनतेमध्ये लाचखोर जोशीबद्दल आणि त्याची निर्लज्ज वकिली करणा-यांबद्दल किती प्रचंड रोष आहे, हे लक्षात आल्यावर वरिष्ठ नेत्यांनी कानावर हात ठेवून स्थानिक सुभेदारांचे कान उपटण्याचे नाटक रंगविले. अगदी जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेच्या नगरसेवकांची ‘खरडपट्टी’ काढण्याचे आव आणला. खरोखरीच वरिष्ठांना विश्वासात न घेता हा व्यवहार झाला असता, तर आतापर्यंत महापौर, सभागृह नेते, जिल्हाप्रमुख यांचे राजीनामे घेतले गेले असते. ते तसे घेतले गेले नाहीत याचा अर्थ उघड आहे. या एकाच प्रकरणात युतीच्या ‘स्वच्छ’ कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत असे नाही; यापूर्वीही सुरेश पवारांसारख्या भ्रष्ट अधिका-याला याच मंडळींनी ‘पावन’ करून घेतले आहे. निलंबनाची कारवाईही महापौरांनीच रोखली आहे. मनसेनेही शहरात महापौरांचा राजीनामा मागणारे फलक लावून सचोटीचे प्रदर्शन केले आहे. मात्र, भ्रष्टाचाराचा वटवृक्ष रुजवणा-या युतीला पालिकेत सत्तेवर आणण्याचे पातक त्यांच्याच माथी आहे, हे मतदार विसरणार नाहीत.

No comments:

Post a Comment