Friday, January 28, 2011

काय केलंत '२६ जानेवारी'ला?

काय? काय केलंत `26 जानेवारी'ला? (कुठं होतात? हा कंसातला आणि मनातला मुख्य प्रश्न)
ध्वजवंदन, परिसरातील कार्यक्रम, सोसायटीतील स्पर्धा वगैरे... अगदीच सार्वजनिक काका किंवा खादीचे जाकीटधारी आदरणीय व्यक्तीमत्व असाल किंवा तुम्ही पत्रकार असल्याची कुणाला माहिती असेल तर स्थानिक तरुण, युवक, विकास मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थिती, बक्षीसांचे वाटप, चमकदार, गुळगुळीत शब्दांचे मार्गदर्शन... इतक्यावर माझ्यासकट बहुतेकांचा `26 जानेवारी' संपतो. 26 जानेवारीच्या सुटीला जोडून ऑफिसातून रजा घेता आली तर मंडळी ध्वजवंदन वगैरे सोपस्कार पार पाडून वा करताही जवळपासच्या सहलींना रवाना होतात (हे मनातल्या प्रश्नाचे उत्तर) हेही दरवर्षी अनेकांसाठी नित्याचेच. ज्या धुरीणांनी जबाबदारी पार पाडावी त्यांनीच 26 जानेवारीचा `सण' करून टाकल्यावर तो एंजॉय करणाऱया बेफिकीर तरुणाईला, तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांना तरी कशासाठी दोष द्यायचा म्हणा?
अगदी माझ्याच बाबतीत म्हणाल तर गेल्या 26 जानेवारीपर्यंत यापेक्षा फारसे वेगळे मीदेखील केले नव्हते...
पण, या वेळी `मी 26 जानेवारीला काय केलं?' या प्रश्नाचं माझ्याकडे वेगळं उत्तर आहे. जे मलाही अनोखं, वेगळ्या वाटेकडे नेणारं, काहीतरी करण्याची, माझ्यापुरता खारीचा वाटा उचलण्याची प्रेरणा प्रत्यक्षात आणणारं ठरलं आहे. यंदाच्या 26 जानेवारीला मी देखील सुटी जोडून घेतली होती. भटकण्यासाठी. पण ही भटकंती स्वयंसुखासाठी, रंजनासाठी नव्हती, तर एका उद्देशासाठी होती. हे दोन दिवस मी चिपळूण, पोलादपूर, महाड, माणगाव, पनवेल तालुक्यांत दुर्गम भागात पक्की सडक-कच्ची सडक, मिळेल ती पायवाट तुडवत होतो.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, पंचायत राज सगळ्या संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत, पण रुजलेल्या नाहीत, तिथल्या गावकारभाराचा गाडा हाकणाऱया मंडळींना त्यांना मिळालेल्या अधिकारांची, घटनादत्त अधिकारांचीही फारशी कल्पना नाही, कुठल्या योजना राज्याच्या, कुठल्या केंद्राच्या, त्या कशा गावापर्यंत आणता येतील, जिल्हा प्रशासन, झेडपी, पंचायत समिती स्तरापर्यंत यंत्रणा कशी हलवता येईल, आमदार-खासदार लोकप्रतिनिधींचे सहकार्य कशा प्रकारे मिळवता येईल या साऱयाबद्दलही `साक्षरता' बहुतांशी नाहीच. ज्यांना याची जाण आहे त्यांनी हे ज्ञान इतरांपर्यंत अर्थातच नेलेलं नाही, हे सगळं गेले दीडेक वर्षं मला दिसत होतं, टोचत होतं. माझ्या बोलण्यातून कळत-नकळत या भागातील काही संवेदनशील पत्रकारांपर्यंत हे पोहोचलं होतं. या पत्रकारांच्या सक्रीय सहकार्यातून आम्ही उभी केलीय `जागर फाऊंडेशन'.
 तर, जागर आणि समाधान सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यंदा काही गावांमध्ये, ग्रामपंचायतींमध्ये तिथल्या सर्वसामान्यांमध्ये त्यांच्या हक्काचा जागर करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेची प्रत आम्ही दिली. पत्रकार हा केवळ व्यासपीठावर वा पत्रकार परिषदेत व्यासपीठासमोरील घटक नसावा तर, सर्वसामान्य, ग्रामीण भाग आणि प्रशासन यांच्यातील एक संवादक असावा, परिमाण अथवा जमल्यास परिवर्तनाची प्रक्रिया घडवून आणणारा एक कॅटलिस्ट घटक असावा, असं मला नेहमी वाटत आलंय. त्यालाच पोलादपूरचे ज्येष्ठ पत्रकार बबन शेलार, महाडचे निलेश पवार, सचिन कदम आणि `समाधान'च्या युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असं स्वरूप मिळालंय.
ही घटनेची प्रत गावागावांत पोहोचावी, लोकांनी, ग्रामसभेनं ती चाळावी, त्यातील कलमांद्वारे नागरिक म्हणून काय हक्क मिळाले आहेत, त्याची त्यांनी जाणीव करून घ्यावी, एवढय़ासाठी हे पहिलं पाऊल टाकलं. सामाजिक जाणिवेचा वन्ही, स्फुल्लींग वगैरे छापील शब्द वापरताही `26 जानेवारी'चं माझ्यापुरतं उत्तर असं वेगळं आहे.
(जाता जाता - चिपळूण तालुक्यातील खोपड माझं गाव. तसं दुर्गम, डोंगरावर. तालुक्याला जवळ असूनही डॉक्टर नाही, रस्ता नाही अशी अवस्था कित्येक वर्ष कायम होती. गेल्या बारा-पंधरा वर्षांत खडबडीत का होईना रस्ता गावात पोहोचलाय, संपर्क साधनं वाढली, रिक्षा, टेम्पो आले असले तरी डॉक्टर नव्हताच. आजारपण आलं, कुणी गंभीर झालं तर डोंगर उतरायचा, खाली कोंढे किंवा थेट चिपळूण गाठायचं हे ठरलेलं. माझ्या वडिलांनी निवृत्त झाल्यावर पुढाकार घेत तेथील ज्येष्ठांच्या, ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्यानं `खोपड आरोग्यसेवा केंद्र' सुरू केलं आणि गावात दररोज एकवेळ डॉक्टर येऊ लागले. अल्पस्वल्प मदत मिळवून, पदरचे पैसे खर्च करून ही रुग्णसेवा आजही सुरू आहे. बाबांचे हे प्रयत्न मी आजवर जराशा अलिप्तपणेच पहायचो, पण बहुधा काहीतरी करण्याची प्रेरणा म्हणायची तर यातूनच मिळाली असावी...)

Friday, January 21, 2011

न्यू अँड सेकंडहँड बुकशॉप बंद? जायचं कुठं वाचकांनी?


शशिकांत सावंत या ग्रंथप्रेमी व्यक्ती बद्दल मला कुतुहल आहे. सतत पुस्तकांच्या शोधात, पुस्तकं हातात, खाकेत, सोबतच्या पिशवीत घेऊन फिरणार्या शशीबद्दल मला सूक्ष्म असूया पण वाटते. छंदाचे रुपांतर व्यवसायात करणार्या यशस्वी व्यक्तींपैकी तो एक आहे. आपल्याला आपला कामधंदा सांभाळून वाचनाचा छंद जोपासावा लागतो, हा पुस्तकवेडा दिवसभर पुस्तकांसाठीच वणवण करतो आणि त्यातच रमलेला असतो, अशी ही असूयेची किनार आहे. मी त्याला ळखतो. तो मला किंचितसा ळखत असावा. लोकसत्तात  तो यायचा तेव्हा भेट व्हायची आणि आता प्रहारमध्ये तो येत-जात असतो, माझी त्याची वाटेतच गाठ पडते. तो मुकेशकडे, अभिजित ताम्हाणेंकडे, संपादक आल्हाद गोडबोले यांच्याकडे पुस्तकं घेऊन येतो. नव्या-जुन्या पुस्तकांच्या खजिन्याची चावी असल्यागत शशिकांत वावरत असतो. आणि काही मोल घेऊन ती पुस्तकं ज्यांना हवी असतात त्यांना पोहोचवत असतो. हे सगळं पाल्हाळ लावायचं कारण म्हणजे त्याने सकाळमध्ये मुंबई मेरी जान मध्ये गुरुवारी लिहिलेला स्तंभ. न्यू अँड सेकंडहँड बुक शॉप दुकान बंद झाल्याची अस्वस्थ करणारी बातमी त्याने दिलिय. डॉ. अरुण टिकेकर, कुमार केतकर यांच्या बोलण्यातून-लिहिण्यातून ज्या दुकानाचे कौतुक वाचले होते ते जुन्या पुस्तकांचे हे दुकान आता बंद झालेय, असं त्याने म्हटलंय. फोर्टातली जुन्या पुस्तकांची दुकानं, चर्चगेट परिसरातील पुस्तकांनी व्यापलेले पदपथ जेव्हा मी शोधक नजरेने आणि खिसा चाचपत फिरत असे, तेव्हाही हे पुस्तकांचं दुकान मनात कुठेतरी ठाण मांडून होतं. पण तिथली किंमत परवडेल की नाही या शंकेने मी या दुकानाकडे वळलो नव्हतो. मध्ये बराच काळ उलटून गेला आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या मामि चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने या दुकानाशी नजरभेट झाली. मेट्रोच्या कर्णरेषेत मधलं सर्कल लांडण्याची कसरत पार पाडली की या दुकानाचा पदपथ आपण गाठतो. एकदा का जुन्या पुस्तकांच्या दुकानाशी नजरभेट झाली की त्या दुकानातील सारी पुस्तकं धुंडाळण्याखेरीज मला चैन पडत नाही. मामिसाठी मेट्रोला दररोज हजेरी लागत होतीच, दोन खेळांच्या मधला वेळ हाताशी होता. मग लागोपाठ तीन-चार दिवस मी तो या दुकानात सत्कारणी लावला. दुकान नव्हतं ते गुहाच होती. नानाविध विषयांवरील पुस्तकांचा विभागवार खजिना तिथे होता. चार-पाच दिवस चित्रपटांच्या खेळांमधला वेळ मी या दुकानात घालवला. अनेक पुस्तकं पाहिली. बांधवगड व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली तेव्हा तिथल्या व्याघ्रकुळाची सुरूवात करणार्या सीता आणि चार्जर या श्री व सौ वाघांबद्दल एकलं होतं. बांधवगडमधील सध्याचं नांदतं व्याघ्रकुळ सीता आणि चार्जर यांची संतती आहे असं मानलं जातं. तर, नॅशनल जिओग्राफिकनं त्यांच्यावर केलेली ड़ॉक्युमेंट्री आणि सीता आणि तिच्या बछड्यांविषयी काढलेला विशेषांक पर्यावरणप्रेमींमध्ये फेमस आहे. बांधवगडला फिरताना मी याबद्दल गाइडकडून एेकलं आणि तिथल्या संग्रहालयात वाचलंही. तेव्हापासून मी नॅटजिच्या त्या अंकाच्या शोधात होतो. न्यू अँड सेकंडहँड बुकशॉपमध्ये पाऊल टाकलं तेव्हा स्वागताला समोरच नॅटजिचे जुने अंक, संच मांडले होते. आणि त्यात चक्क सीता वाघिणीवरील तो अंक होता. ग्रेट ना! तर असं बरंच काही त्या तीन-चार दिवसांत माझ्या हाताला लागलं होतं. पुन्हा एकदा सवडीनं आणखी वेळ काढून या दुकानात यायचं असं ठरवलं होतं तर शशिकांतनं ही मन खट्टू करणारी बातमी दिली...
१९०५ला
जमालभाई रतनसी यांनी रद्दीचं दुकान म्हणून सुरू केलेल्या या दुकानातून जुन्या पुस्तकांची विक्री सुरू झाली ती दुसर्या महायुद्धाच्या काळात.तेव्हापासून अगदी गेल्या डिसेंबरपर्यंत न्यू अँड सेकंडहँड बूकशॉप, ५२६ काळबादेवी हा पत्ता सर्व पुस्तकप्रेमींसाठी एका खजिन्याचा कोडवर्ड होता. जमालभाईंचा नातू आणि दुकानाचे सध्याचे चालक-मालक सुलतान के विश्राम, सध्याच्या पिढीकडून पाहिजे तसा फीडबॅक मिळत नाहीम्हणून चिंतेत असायचे, पण ते एकदम दुकानच बंद करतील असे वाटले नव्हते.
उद्या शनिवार. माझी सुटी स्ट्रँड आणि आशिश बुक सेंटरच्या ग्रंथप्रदर्शनात सत्कारणी लावण्याचा विचार आहे. तेव्हा मी नक्कीच या दुकानाकडे चक्कर मारणार आहे. मला आशा आहे. वाईट बातम्या कधीकधी खोट्या ठरतात, तसंच काहीसं होईल आणि हे दुकान सुरू असेल,सुलतानभाई नेहमीप्रमाणे काऊंटरमागे बसून चष्म्याआडून मला आजमावत राहतील... पाहू!
जाता
जाता - मुंबईतील जुन्या पुस्तकांच्या काही दुकानांविषयी वाचायचं असेल तर ही लिंक पहा - http://www.cnngo.com/mumbai/shop/mumbais-secondhand-book-shops-262929

Sunday, January 16, 2011

मन झाले पतंग


 काका, पतंग द्या ना उडवून... 
रविवारच्या मेगाब्लॉकने वैतागलेल्या जिवला समजवत ऑफिसकडे झपझप पावले उचलत होतो तर अचानक असा कोवळा किलबिलाट कानावर आला आणि तीन-चार लहान मुलींनी वाट अडवलीच. छान निळा मांजाचा फिरकी, पिवळा कव्वा पतंग घेऊन त्यांचा पतंग उडवण्याचा आटापिटा सुरू होता, शेजारीच दादा कंपनी पतंग उडवत होती, पण या चिमुरड्यांचा पतंग काही हवेचे मजले चढत नव्हता आणि कुणी दादा त्यांच्या मदतीलाही येत नव्हता... आकाश मस्त पतंग बदवण्यासारखं निरभ्र होतं, पण या चिमुरड्यांच्या  त्यांच्या चेहर्यावर निराशेचे मळभ आलं होतं. मी दिसल्यावर बहुधा त्यांना हा काका जरा मदत करण्यातला दिसतोय असं वाटलं असणार आणि त्यांनी मला हाकारलं. त्यांची हाक ली
ती निळ्या मांजाची फिरकी पाहिली, पिवळा पतंग पाहिला आणि एकदम शेकडो पतंग मनात उडायला लागले, जाणवलं पतंगाचा धागा आपल्या हातातून सुटून किती दिवस, महिने झाले. पतंगाचा नव्हे जणू खेळत्या, धावत्या, उत्साहाने सळसळणार्या. चैतन्यमय वयाचा, क्षणांचा धागाच तुटलाय की. फिरकीला गच्च वेटाळून बसणार्या मांजांसारखं आपलंही आयुष्य एका चाकोरीभोवती एकदम गच्च वेटाळून फिरतंय, मांजाचा गुंता सुटायवजी कसा वाढतो तसं आयुष्याचा गुंताही वाढत चाललायं...
असं काहीबाही मनात येऊन एकदम फिलॉसॉफिकल वगैरे वाटायला लागलं होतं तोच, काका धरा ना पतंग, म्हणत एका चिमुरडीनं मला एकदम जमीनीवर आणलं. त्यांचा पतंग हातात धरला, एकीनं मांजा ताणून धरला आणि मी पतंग उंच आभाळाकडे भिरकवला. अर्थातच तो पुन्हा गोता खाऊन खाली आला, पण माझं मन एकदम हलकं झालं होतं, एकदम छान वाटायला लागलं होतं. मी हसून पुढं निघणार तो  त्या मुलींमध्ये काहीतरी कानगोष्टी झाल्या. मोर्चा पुन्हा माझ्याकडे वळला, काका, तुम्हीच उडवून द्या नं पतंग, पुन्हा गोड आग्रहाचा गलका सुरू झाला. ऑफिसच्या चाकोरीपासून अजून माझ्या मनाचा मांजा सुटा झाला नव्हता म्हणून पतंग हातात घ्यायचा मोह टाळून मी पुढे सरकलो, त्या बिचार्या खट्टू झाल्या असणार...
मला मात्र भलतंच छान वाटत होतं, मेगाब्लॉकचा वैताग कुठल्याकुठे पळाला होता, नजर आकाशातील पतंगांचा वेध घेत होती. आणि लक्षात आलं, ओळख ना पाळख अशा अनोळखी इसमाला त्या चिमुरड्या मोठ्या विश्वासानं काका म्हणाल्या होत्या, त्यांच्या खेळात त्यांनी त्याला सामावून घेतलं होतं. त्या लहानग्यांना माझ्यात काहीतरी आश्वस्त करणारं, विसंबावं, भरवसा टाकावा असं जाणवलं होतं...
माझ्या मनाचा जणू मुक्तपणे विहरणारा पतंगच झाला. त्या चिमुरड्यांनी माझा र
विवार एकदम गोड करून सोडला!

Wednesday, January 12, 2011

ठाणेकरांनो, चिरडून मरा..!

मी ठाणेकर आहे, खाली व्यक्त केलेला उद्वेग दररोज चेंगरणार्या, धडपडणार्या हजारो ठाणेकरांसारखाच माझाही आहे. वाईट एवढेच कीएवढ्या-तेवढ्या कारणावरून फुटेज खायला धावणारे, लोकलअडवायला धावणारे लोकप्रतिनिधी ठाण्यातून ये-जा करणार्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या या दररोजच्या यातायातीकडे पहायला तयार नाहीत...होऊ नये ते घडले की मात्र या सगळ्यांना पाझर फुटेल आणिचॅनेलच्या कॅमेर्यांसमोर तोंड फुटेस्तोवर यांची बडबड सुरू होईल. तेव्हा दुर्दैवी शेळी जिवानिशी गेलेली असेल... असे होऊ नये एवढ्यासाठीच हे लिहिलंय...


ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन, तीन-चार आणि पाच-सहावर उतरणा-या सीएसटीच्या दिशेकडील प्रवासी जिन्यावर तुम्ही कधी पाय ठेवला आहात?, त्या अरुंद जिन्यांवरील चेंगराचेंगरीतून, घुसमटीतून कसेबसे बाहेर पडून मोकळा श्वास घेतला आहात? ही थरारक कामगिरी फत्ते करणारे तुम्ही एकमेव नाही, दररोज हजारो ठाणेकर ही जीवघेणी कसोटी देत असतात. गेली अनेक वर्षे सकाळ-दुपार-संध्याकाळ अगदी तिन्ही त्रिकाळ हे अरुंद जिने प्रवाशांची घुसमट करत आहेत, तिथे चेंगराचेंगरी दररोजची आहे. अद्याप यापैकी कुठल्याही जिन्यावर काहीही दुर्घटना घडलेली नाही हे केवळ प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याचे संकेत आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांना कधीचेच दैवाच्या हवाली केले आहे. इथली दररोजची परिस्थिती पाहिली तर, ‘चिरडून मरा..’ अशीच ठाणेकर प्रवाशांची अवहेलना मध्य रेल्वेने चालवली असल्याचे जाणवते.
 
जिथे ठाण्यातून निवडून आलेल्या आमदार-खासदारांनाच ठाणेकरांच्या या दररोजच्या यातायातीचे काही पडलेले नाही, तिथे मध्य रेल्वेने त्यांना वा-यावर सोडले तर नवल काय? हे अरुंद जिने आणि वरचा पादचारी पूल इथे एकदम दोन गाड्या आल्यावर जी काही अभूतपूर्व गर्दी होते, चेंगराचेंगरी होते त्यात दररोज किती विनयभंग होतात, नकोसे स्पर्श होतात, चिमटे काढले जातात, पर्स-पाकिटे उडवली जातात याचेही या लोकप्रतिनिधींना सोयरसुतक नाही. काही महिन्यांपूर्वी याबाबत फारच ओरड झाल्यावर होमगार्ड्स वगैरे ठेवून गर्दीचे नियंत्रण करण्याचे नाटक काही दिवस चालले होते. ठाण्याचे खासदार डॉ. संजीव नाईक, नेहमीच आग्रही मतांच्या पताका फडकवणारे आमदार जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक, राजन विचारे, एकनाथ शिंदे, बऱ्याचदा ठाणे रेल्वे स्थानकाचा राऊंड घेणारे खासदार आनंद परांजपे या लोकप्रतिनिधींपैकी कुणीही अद्याप तरी मध्य रेल्वेला प्रवाशांच्या या हालअपेष्टांसाठी धारेवर धरलेले नाही. नाही म्हणायला खासदार संजीव नाईक यांनी या समस्येसाठी रेल्वेशी पत्रव्यवहार केल्याचा दावा केला होता. मध्य रेल्वेनेही तीन-चार, पाच-सहा फलाटांवर उतरणारे आणखी दोन जिने करण्यासाठी निधी मंजूर केल्याची घोषणा केली होती.

प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही, मध्य रेल्वे आणि लोकप्रतिनिधी थंड, सुस्त आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात तीच चेंगराचेंगरी, तीच नकोशी घुसमट, तोच असह्य प्रवास नव्या वर्षातही सुरू आहे. या जिन्यावरून कसेबसे बाहेर पडणारे प्रवासी मात्र आजचा दिवस तरी वाचलो.., म्हणत थकलाभागला जीव पुढे ओढत जात आहेत.