Tuesday, January 4, 2011

पुस्तकांबद्दल माझा हायपोथिसिस आणि अभिजितचं नवं पुस्तक

आपण जे वाचतो त्यातून आपली आवडनिवड, छंद, हौसमौजेच्या गोष्टी प्रतिबिंबित होतात का? की आपल्या छंदांचेच प्रतिबिंब आपण वाचतो त्यातून उमटते... मनात खूप दिवस असा घोळ सुरु होता. ठाण्यात साहित्य संमेलन झालं तेव्हा काही पुस्तकं खरेदी केली, शिवाय वाचनालयातील पुस्तकं अवतीभवती असतातच. ती चाळत होतो तर अचानक जाणवलं की अरे आपण घेतलेली पुस्तकं आणि दासावातून आणतोय ती सगळीच आपल्या आवडीनिवडींशीच मिळतीजुळती आहेत की...
सध्या माझ्याकडे असलेली पुस्तकं सांगतो, बघा हं

सायबर कॅफे - डॉ. बाळ फोंडके
नारायण धारपांचं पळती झाडे
कोकणातल्या आडवाटा - प्रा. सुहास बारटक्के
मार्क इंग्लिस हा माणूस एव्हरेस्ट चढला त्याची गोष्ट - डॉ. संदीप श्रोत्री
देवचाफा - विद्याधर पुंडलीक
डोंगरमैत्री - आनंद पाळंदे 
 
डॉ. श्रोत्रींचं एव्हरेस्टच्या पायथ्याशी आधीच वाचून झालंय. शैलजा देशमुख यांचं अॅण्ड  स्कर गोज् टू... ऑस्कर पुरस्कार सुरू झाले तेव्हापासूनच्या ऑस्करिवजेत्या चित्रपटाविषयीचं पुस्तक. मग मला वाटलं की बहुधा हेच खरं असणार, निदान आपल्यापुरतं तरी... 
आवडणा-या साहित्यप्रकारांची , लेखकांचीच, आपल्या छंदांबद्दल अधिक माहिती देतील अशीच पुस्तकं वाचली जातायत आपल्याकडून.  संमेलनात मी कोकणातल्या आडवाटा घेतलंय तसंच वनतपस्वी मारुती चितमपल्ली यांचं चकवाचांदण  एक वनोपनिषद हे आत्मकथनपर पुस्तक घेतलंय... आय थिंक माय हायपोथिसीस इज प्रूव्हड्. 
The case rests here...

अभिजितचं नवं पुस्तक
आणखी एका पुस्तकाविषयी मला सांगायचयं...
 माझा मित्र अभिजित देसाईच्या 'शिणेमाच्या ष्टोरी'मागील गोष्ट  या पुस्तकाबद्दल. अभिजितच्या अकाली निधनानंतर त्याची पत्नी विशाखा देसाई यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलंयं. सिनेमा, भटकंती, खाद्यंती, फोटोग्राफी या सगळ्यांमध्ये अभिजितला कमालीचा रस होता. पुस्तक पूर्ण होता-होता तो अचानक आमच्यातन निघून गेला... विशाखा यांचं मनोगत वाचताना घशात आवंढा दाटून येतो... अभिजितचं पुस्तक उघडल्यावर आणखी एक झुळुक हळवी करून जाते. या या पुस्तकाची मांडणी सजावट माझा सिनेपत्रकार मित्र नंदकुमार पाटील याने प्रेमाने केलीय. पुस्तक उघडल्यावर समोर येणारी अभिजितची रेखाचित्र नजरेला खिळवून ठेवतात. परवा नंदूचा फोन आला - पुस्तक पाहिलंस का? मी म्हटलं, पाहिलं, चाळलं आणि आता ते विकत घ्यायचंय. सिनेमासाठी जिव कधीचाच गहाण असल्यामुळं , पुस्तक अभिजितचं असल्यानं ते ओघानेच आलं म्हणा. तर, नंदूला म्हटलं, रेखाचित्रं फार सुरेख आहेत रे... नंदू अभिमानानं म्हणाला, त्याच्याच लेकाने मिथिलेशनं काढलीत ती सारी. मी एकदम हरखलोच. गेल्याच वर्षी मिथिलेशला ड्रॉइंगच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्या एवढ्याशा मुलानं काढलेली रेखाचित्र सुरेख आहेत आणि अभिजितचं पुस्तकही. (ते वाचल्यावर सविस्तर लिहिनच)

1 comment: