सुज्ञ मतदार हो...
कल्याण-डोंबिवलीकरांना सध्या ही नवीन पदवी मिळालीय..
एरव्ही हे शब्द कानावर पडायला लागले की समजायचं कुठल्या तरी निवडणुका जवळ आल्यात, गेल्या निवडणुकीत निवडून आल्यापासून मतदारांकडे ढुंकूनही न पाहिलेले अनेक चेहरे रस्त्यांवर, गल्लीबोळांत भेटून वाट अडवल्यागत आडवे येऊन नमस्कार घालू लागले की याची खात्रीच पटते. गोरगरीब प्रजा एकदम मतदार‘राजा’ वगैरे बनते, गळेपडू आर्जवं, मनधरणी सुरू होते..
कल्याण-डोंबिवलीत महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून हेच सुरू झालं आहे. जनताजनार्दनासमोर लोटांगणं सुरू आहेत, आश्वासनांची खैरात होतेय, गेल्या सत्ताकाळात पालिकेत काहीही केलं नसतानाही कर्तृत्वाचे पाढे वाचणे सुरू आहे, भावनिक आवाहनांचा मतदारांसमोर कल्लोळ सुरू आहे..
ही एकच संधी आहे तुम्हा-आम्हाला, आपला सुज्ञपणा, विवेकीपणा दाखवून द्यायची. पालिकेत भ्रष्टाचाराची युती करणा-या सत्तापिपासूंना त्यांची जागा दाखवून द्यायची, ही संधी गमावता कामा नये. धर्माचे, जातीचे रंग दाखवून सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी धडपडणा-या या मंडळींना आता विचारायला हवं, आम्ही दररोज खड्डय़ांत धडपडत होतो तेव्हा तुम्ही कुठं होतात, मीटर न लावता धावणाऱ्या रिक्षावाल्यांची मुजोरी, अरेरावी सहन करतोय तेव्हा तुम्ही काय केलंत, धडपणे चालता येईल, अशा रस्त्यांसाठी वैतागून मोर्चे काढत होतो तेव्हा तुम्ही कुठं होतात बाबांनो, पाण्यासाठी वणवण सुरू आहे तेव्हा कुठं दिसला नाहीत तुम्ही, शहर बस सेवेचे वाटोळं झालं तरी तुमचा आवाज नव्हता, तेव्हा कुठल्या शाखेत लपला होतात सारे?
इथले रस्ते खड्डय़ांत गेले, गटारं बुजली, सांडपाणी रस्त्यांवर आलं, मेनहोलची झाकणं उडाली, शहरांच्या सौंदर्यीकरणाचा बोजवारा उडून चौक, रस्ते भकास, बकाल दिसायला लागले तरीही पालिकेतील सत्ताधारी सुशेगात होते. निवडणुका जाहीर होणार, असा अंदाज येताच मात्र गडावर कोण धावपळ? केवढा गहिवर आला कल्याण-डोंबिवलीकरांचा? कुठले कुठले कोप-यात पडलेले, फाइलबंद केलेले, रखडलेले उपक्रम, योजना शोधून शोधून भूमिपूजन करण्यात आलं.. प्रचारासाठी तर कोण लगबग सुरू आहे सध्या. तीही आपण पाहतो आहोत. यांचे वचननामे तर त्यांचे वचकनामे. आधीच्या वचननाम्यांचं काय झालं किंवा काय झालं नाही, ते जणू काही आपण विसरून जायचं.
पण आपण सुज्ञ आहोत, असं आता सारेच म्हणताहेत. हा सूज्ञपणा दाखवून द्यायची हीच वेळ आहे. कोकणच्या धूळमातीत विकासाच्या डांबरी सडका नेण्याचे कर्तृत्व दाखवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री नारायण राणे यांनी कल्याण-डोंबिवलीला दर्जेदार शहरं बनवण्याची ग्वाही दिलीय. इतरांसारखा बोलघेवडेपणा, शिवराळपणा न करता मतदारांना विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलंय.
आजवर मूर्ख बनवल्या गेलेल्या सर्वासाठी येत्या रविवारी चुका सुधारण्याची सुवर्णसंधी आहे. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!
प्रसिद्धी दिनांक (28 October, 2010)
No comments:
Post a Comment