दररोज ब्लॉगवर काहीतरी लिहायचा संकल्प दहा दिवसांच्या आत मोडीत निघाला. शनिवारी दांडी झाली राव... वाईट वाटलं, पण अख्ख्या आठवडय़ात एक सुटी येते आणि ती फक्त कुटुंबासाठी असं कधीचंच ठरवलंय (हा संकल्प मात्र अद्याप मोडीत निघालेला नाही, बायको आणि लेक ते मला करूही देणार नाहीत आणि मीही ते करणार नाही). त्यामुळे कालचा शनिवार ब्लॉगवर येण्याचं, काही नोंदवण्याचं राहून गेलं. अर्थात रोजच काहीतरी लिहावंच असंही बंधन नाही, पण लिहिलं पाहिजे असं मात्र मनापासून वाटतंय...
कालचा शनिवार मस्त मजेत गेला. नव्या वर्षाचा माझा संकल्प वाचला असाल तर दर शनिवारी एकतर मराठी नाटक वा चित्रपट टाकायचाच असं मी ठरवून ठेवल्याचं तुमच्या ध्यानात असेलच. या संकल्पानंतरचा हा पहिलाच शनिवार होता. नाटक आधीच ठरवलं होतं, मी शारुक मांजरसुंभेकर, सिद्धार्थ जाधवचं नवकोरं. गडकरीला प्रयोग हाऊसफुल्ल होता. `गडकरी रंगायतन पूजा समिती' नावानं कुणीतरी प्रयोग घेऊन मनाला वाटेल ते दर लावून तिकिटं खपवली होती. मीच दोनशे रुपयांची तीन तिकिटं घेतली होती. या भ्रष्टाचाराबद्दल वेगळं लिहायला आणि पत्रकार म्हणून खणायला लागणार आहे, ते आता येत्या दोन-तीन दिवसांत करीनच...
हां, तर नाटकाबद्दल सांगतो. प्रमुख भूमिकेत सिद्धार्थ, लिहिलंय मकरंद अनासपुरे, सतीश तारे आणि महेश मांजरेकर यांनी, या नाटकाच्या सुरू असलेल्या जाहिराती यामुळे धम्माल इनोदी वगैरे काहीतरी असणार असा माझ्यासकट सगळ्यांचा समज झाला होता. बॉलीवूडच्या मोहात पडून मुंबई गाठणाऱया, स्टुडिओंमध्ये, निर्माते-दिग्दर्शकांकडे खेटे घालणाऱया एका स्ट्रगलरची कहाणी असा काहीसा नाटकाचा कथाविषय असंही कुठेतरी मनात होतं. झालं वेगळंच. कथाविषयाचा अंदाज खरा ठरला तरी बाकी सारे गैरसमज ठरले...
नाटकात सिद्धार्थ बेफाट सुटलायं, कम्प्लिट ऑथरबॅक भूमिका असं काय म्हणतात ते त्याच्या व्यक्तीरेखेबद्दल म्हणता येईल आणि सिद्धूनेही फूल्ल फुटेज खात रोलचं सोनं केलंय. त्यात तो आयरनी ऑफ लाइफ असं सारखं म्हणतो. नाटक पाहतांना मला सारखं आयरनी ऑफ ड्रामा (या नाटकाचा) वाटत होतं. कारण एकच सवंग, अभिरुचीहीन आणि थेट कमरेखालच्या विनोदांनी नाटकाची, एका संवेदनशील, सिरीयस विषयाची माती केलीय. त्याच्या गंभीर बाजाला उणेपणा आणलाय. विनोदी, हास्यस्फोटक म्हणून खुर्चीत स्थिरावणारा प्रेक्षक पहिल्याच लावणीनं आणि राजा-प्रधानाच्या बतावणीनं खुश होतो, सिद्धुची ये-जा सुरू झाल्यावर हुरळतो, पण नंतर ध्यानी येतं विषय हवापाण्याचा नाही, स्ट्रगलरच्या ससेहोलपटीचा, हेलपाटय़ांचा आहे. दत्तात्रय हरिश्चंद्र मांजरसुभेकर याची निराशा, हताशा आणि तरीही उसळी घेणारी अपराजित उर्मी या सगळ्याचं अफलातून सादरीकरण सिद्धू समोर करत असतो आणि दाताखाली खडा यावा, गवई बेसूर व्हावा, मोबाइल बॅटरी संपून अवचित बंद पडावा तसे अतिशय सवंग, हीन, सरळसरळ अश्लील विनोद नाटकाची वाट लावत रहातात. ही या नाटकाची आयरनी ऑफ ड्रामा आहे.
मकरंदचा, सिद्धार्थचा स्ट्रगल, त्यांच्यासारख्या अनेकांचा स्ट्रगल एका सुंदर संहितेतून रंगमंचावर आणण्याची सुवर्णसंधी या भंगार विनोदांमुळे, काही नकोशा प्रसंगांमुळे वाया गेलीय आणि नाटकंही उभं रहाता-रहाता विस्कटलंय...
या अपराधाला जे कुणी जबाबदार असतील त्यांना सुजाण प्रेक्षक कधीही क्षमा करणार नाहीत!
फार अश्लिल आहेत का विनोद ?
ReplyDeleteफॅमिलीसोबत जाणार होतो आज हे नाटक बघायला. (फक्त सिद्धूची ऍक्टींग बघण्यासाठी !)