Monday, January 3, 2011

उद्वेगबोध २

रामजीत याचे उघड्यावर पडलेले कुटुंब
चूक रामजितसारख्यांचीच...


अखेर बोईसरच्या रामजित सिंगने रविवारी दु:खीकष्टी अंतकरणाने जगाचा निरोप घेतला. तुम्ही वाचलीत ना त्याच्या आत्महत्येची बातमी?
 ‘प्रहार’चा अपवाद सोडला तर, बराक ओबामांच्या सरबराईत गुंतलेल्या प्रसारमाध्यमांनी बोईसरच्या कोप-यात राहणा-या या रामजितच्या कुटुंबावर कोसळलेल्या आपत्तीची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. त्याच्यावर भयानक दडपण आलं होतं. न्यायालयाच्या दट्टय़ानंतर अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ठाणे जिल्ह्यात ‘सुरू असलेल्या’ मोहिमेत ‘कर्तव्यकठोर’ यंत्रणांची टाच त्याच्या घरावर येणार होती. तशी त्याला नोटिसही आली होती. आपले घर पाडले जाणार याचे दडपण त्याला असह्य झाले, पेलवेनासे झाले आणि ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या रात्री त्याने या दडपणातून मोकळं होण्याचा त्याच्यापुरता मार्ग शोधला.
 रोजंदारीवर जगणा-या रामजितनं पै-पै जमवून भय्यापाडा येथील चाळीत त्याचं हक्काचं घर घेतलं होतं. ही चाळ सरकारी जागेवरील अतिक्रमण असल्याचं संबंधित यंत्रणांना न्यायालयाच्या आदेशानंतर ‘लक्षात’ आलं. तोपर्यंत आठ वर्ष उलटून गेली होती. अचानक आलेल्या नोटिशीनं तो गांगरून गेला होता. त्याचा सारा संसार उघडय़ावर येणार होता. सुटकेचा मार्ग दिसत नव्हता, चाळमालक दाद देत नव्हता. यामुळे रामजितनं कुटुंबालाच उघडय़ावर टाकून सगळ्याचा निरोप घेतला.
रामजित गरीब बिच्चारा वगैरे काही नव्हता हो.. असं अतिक्रमण करण्याचा, अनधिकृत बांधकामांमध्ये जागा खरेदी करायला त्याच्यासारखे गोरगरीब मुळात धजावतातच कसे? भूखंडलाटू उच्चपदस्थ, अधिकारी यांची गोष्ट वेगळी असते हो! तिथे सगळीच साखळी एकमेकांच्या सहकार्याने काम करते, फाइली सरकवल्या जातात, परवानग्या मिळतात, लाइट, पाणी सगळे सुरळीत होते, पाहता-पाहता आदर्शवत इमारत उभी राहते. कोणाची हिम्मत होत नाही की, एवढी मोठी इमारतच संपूर्णपणे अनधिकृत आहे म्हणण्याची.
 मुंबईत, ठाण्यात, कळव्यात, मुंब्य्रात, डोंबिवलीत जिथे नजर टाकाल तिथं अनधिकृत बांधकामं आहेत, इमारतींवर अनधिकृतपणे मजले चढवले गेले आहेत, अतिक्रमणं सुरू आहेत. रातोरात इमारती उभ्या केल्या जातात. न्यायालयाने कितीही तासलं तरी या इमारतींची एक वीटसुद्धा ढिली झालेली आपण तरी कधी पाहिली नाही (अपवाद शोधायचाच म्हटलं तरी फार शोध घ्यावा लागेल). कारवाई केलीच तर अशा नाजूकपणे होते की भिंतींना पाडलेली भगदाडं एका रात्रीत बुजवता येतील. ठाणे काय, वसई काय, दिवा काय सगळीकडे याची उदाहरणं दिसत असतात.
न्यायालयाने कारवाईचा आग्रह धरला की सरकारी यंत्रणांचे बुलडोझर वळतात ते झोपडपट्टय़ांकडे, रामजितसारख्या हतबल रहिवाशांच्या घरटय़ाकडे. बाजूलाच उभ्या असलेल्या टोलेजंग अनधिकृत इमारतींकडे बघत एखादा अगतिक रामजित स्वत:शी चडफडत जीव सोडतो. गरीब म्हणून कुठल्याशा कोप-यात झोपडं उभारण्याची चूक त्यानेच तर केलेली असते!
प्रसिद्धी दिनांक (10 November, 2010)

No comments:

Post a Comment