Tuesday, January 11, 2011

एका लेकीचा अस्वस्थ बाप...


आला दिवस आपण कितीही सकारात्मक घालवायचा म्हटला तरी अवतीभवती घडणाऱया घडामोडी, पेप्रातल्या बातम्या नाही लागू देत आपला दिवस सत्कारणी... काहीतरी असं घडतं, काहीतरी असं वाचायला मिळतं, कुठलीतरी बातमी इतकी अस्वस्थ करून जाते की मूडची पार वाट लागते...
आजच्या दोन बातम्यांनी माझ्या मूडची सध्या तरी वाट लावलीय...
इंडियन एक्स्प्रेसमधून साभार
`इंडियन एक्स्प्रेस'मध्ये आज पहिल्या पानावर आलेली बातमी - बातमी आहे मध्य प्रदेशच्या अनुप्पूर जिल्ह्यातील दूधपुलिया गावची. आपल्या देशाची, सर्वसामान्यांची दुर्गती प्रकर्षाने अधोरेखित करणारी. तिथला गोकुळ गोंड नावाचा एक गरीब. सोळा वर्षाच्या लेकीने विष पिऊन आत्महत्या केली म्हणून कोसळलेला. होतं काय, पोलिस येतात, पंचनामा करतात आणि मुलीच्या मृतदेहाची शवचिकित्सा करायला जिल्ह्याला घेऊन जा म्हणून गोकूळलाच सांगून पाठ फिरवून निघून जातात. येता-जाता बिस्किटचा तुकडा मोडावा तसा कायदेभंग करणाऱया शिरजोरांच्या आपल्या देशात गोकूळसारखे कायद्याला घाबरणारे, कायद्याची चाड असणारे अल्पसंख्याक अजून आहेत. पोलिसांनी जबाबदारी झटकली तरी गोकूळ मात्र त्याच्या दुर्गम भागातून 14 किमी वरील जिल्ह्याच्या ठिकाणी निघाला, सायकलच्या कॅरियरवर लेकीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधलेला... (इंडियन एक्स्प्रेसने असे छायाचित्रही छापलेय)
दुसरी बातमी पीटीआयने आज दिलेली.  उत्तर प्रदेशमधील बसपच्या द्विवेदी नामक आमदाराने अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या सीबीआय चौकशी अहवालाची. या आमदाराने या मुलीवर अत्याचार केला आणि वर तिच्यावरच चोरीचा खोटा आळ घेतला, पोलिसांनीही आमदाराला साथ देत तिच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. हा आमदार माझ्यावर अत्याचार करताना त्याचे पित्ते मला चिडवत होते, असे ती मुलगी जबाबात सांगत असताना, आमदार मात्र, मी तर नपुंसक आहे, मी कसा अत्याचार करणार या मुलीवर, असं सांगतोय... अशा घटनांमध्ये थेट शरीयतचा कायदाच (हात के बदले हात, अत्याचारी व्यक्तींचा 'तो' अवयवच छाटून टाकण्याची आदी) अपराध्यांसाठी अमलात यावा असं मला वाटू लागलंय.
आरुषीची हत्या असंच मन विदीर्ण करणारी. मी हे सगळं वाचतो आणि अस्वस्थ होतो, घाबरतोही.
- एका लेकीचा अस्वस्थ बाप

No comments:

Post a Comment