मराठीतून ब्लॉग लिहिणारी मंडळी तशी कमीच. त्यात आता मी भर टाकलीय... पण माझं लिखाण वा लेखणी मी आळस झटकला तरच पुढे सरकणार. तर, सांगायची गोष्ट म्हणजे या मराठी ब्लॉगर मंडळींबद्दल प्रहारच्या कोलाज या रविवार पुरवणीत एक चांगला लेख २ जानेवारीच्या अंकात आम्ही छापलाय. समीक्षा नेटके यांनी लिहिलेला हा लेख इथे देतोय...तो वाचा आणि लिहिते व्हा, माझ्यासारखे राहू नका !
ब्लॉग कशासाठी?
ब्लॉग मराठीतही सुरू झाले आणि केवळ ‘रोजच्या डायरीऐवजी इंटरनेटवरली ही अनुदिनी’एवढीच त्यांची व्याप्ती न राहता, आज छापील नियकालिकांइतकंच सकस लेखन निव्वळ ब्लॉगसाठी करणारे लोक आहेत! या बदलाचं स्वागत करताना त्यांनी मांडलेले मुद्दे वाचावे लागतील, ब्लॉग-लेखकांचा वेगळेपणा, त्यांचा ‘आजचे’पणा यांची दखल घ्यावी लागेल.. विस्तारत जाणाऱ्या मराठी ब्लॉग-जगताचा वेध घेणारं हे नवं सदर! त्यातला हा पहिला लेखांक, ‘ब्लॉगच्या प्रस्तावना’ याच विषयाला वाहिलेला..
मराठीत वेबलॉग ऊर्फ ‘ब्लॉग’ लिहिण्याची- ‘मराठी ब्लॉगिंग’ची सुरुवात कधी, कोणी पहिल्यांदा केली हे इंटरनेटवरून तरी माहीत करून घेता येत नाही. तरीदेखील, 25 जून 2004 रोजी बेळगावच्या अजित ओक यांचा ‘उगाच उवाच’ हा आजही ‘मृत’ नसलेला ब्लॉग सर्वात जुना ठरतो, तेव्हा बरं वाटतं! अजित ओक यांनी दोन स्व-रचित कविताच ब्लॉगवर पुन्हा ‘बरहा’ नावाच्या टंकात (फॉण्टमध्ये) रीटाइप केल्या आणि झाला ब्लॉग सुरू. अशा हौशी-छंदी ब्लॉगची संख्या हळुहळू वाढत गेली आणि 2007 नंतर ब्लॉगवाल्यांना तसंच 2009- 10 या काळात मराठी पत्रकारांचे ब्लॉगही संख्येनं आणि (आधीच छाप्यात प्रसिद्ध झालेल्या) कंटेंटनं फुगले. जिथं नोकरी करतो त्या प्रकाशनापेक्षा निराळा वाचकवर्ग पत्रकारांना ब्लॉगमुळे मिळाला, पण ही नवनिर्मिती ब्लॉगसाठी नव्हती. ब्लॉग- गर्दी वर्षागणिक वाढत असताना, आपण इथं कशासाठी आहोत, असा रास्त प्रश्न आपापला ब्लॉग सुरू करताना अनेकांना पडू लागल्यावर उत्तरादाखल ‘हा ब्लॉग कशासाठी?’ अशी प्रस्तावना किंवा हेतुवाक्यं आपापल्या ब्लॉगना देणं सुरू झालं. या प्रस्तावना कशा बदलत गेल्या, हे पाहिल्यास ब्लॉग-स्फिअर कसा बदलत गेला, हेही कळतं.
‘‘मराठी साहित्य हा माझ्या अतिशय आवडीचा विषय. तसे म्हटले तर प्रत्येकात एक लेखक दडलेला असतो. पूर्वी फार कमी जणांना आपले विचार अभिव्यक्त करायची संधी मिळायची. सुदैवाने इंटरनेटने जवळपास प्रत्येकाला ही संधी ब्लॉग्जद्वारे उपलब्ध करून दिली आहे. मराठी फॉन्ट्समुळे तर आता आपण मातृभाषेत सुद्धा संवाद साधू शकतो. या ब्लॉगला कितपत प्रतिसाद लाभेल हे मला माहीत नाही, पण अल्प का होईना, आपल्या मातृभाषेतून आपल्या जिव्हाळय़ाच्या विषयावर संवाद साधता येणे हेहि नसे थोडके’’
- ही ‘प्रस्तावना’ (हेच पोस्टचं शीर्षक) http://marathisahitya.blogspot.com या ब्लॉगवर 29 जुलै 2005 रोजी नंदन होडावडेकर यांनी लिहिली आहे. त्यांना ब्लॉग हेच ‘सुदैव’ वाटण्याचा काळ अवघ्या पाच वर्षापूर्वी होता. त्यानंतर सव्वा वर्षानं दुस-या ‘अनुदिनी अनुतापे’ या ब्लॉगला नंदन यांनी लिहिलेलं ‘प्रयोजन’ (11 नोव्हेंबर 2006 ) मात्र आटोपशीर आहे.. ‘(मराठी साहित्य या पहिल्या) अनुदिनीवर लिहिताना विषयाचे बंधन पाळावे लागत असल्याने, दुसरी- कसलाच धरबंध नसलेली, कुठलाही विषय वज्र्य नसणारी अनुदिनी सुरू करण्याचा विचार बरेच दिवस डोक्यात रेंगाळत होता. तो आता प्रत्यक्षात आला एवढंच.’’
त्याहीनंतर वर्षभरानं (11 डिसेंबर 2007 ) रोहन जगताप ‘अनुदिनी’ http://www.anudini.in नावाचा ब्लॉग सुरू करताना लिहितो -‘‘ मराठी ब्लॉगविश्व या साइटला भेट दिल्यावर मला समजलं की, एवढ्य़ा मोठय़ा लोकसंख्येतून केवळ सुमारे 350 लोक ‘मराठीतून’ ब्लॉग लिहीत आहेत. त्यातही काही ‘मृत’ आहेत.. म्हणजे 365 दिवसांहून अधिक काळ लेखन न झालेले ब्लॉग’’!हा रोहन जगताप, 2010 च्या मार्चपासून डिसेंबपर्यंत ‘अनुदिनी’वर फिरकला नव्हता. अखेर गेल्याच 13 डिसेंबरला त्यानं ‘नवी सुरुवात’ करताना लिहिलं- ‘‘2007 च्या डिसेंबर महिन्यात.. मला ब्लॉगिंगबाबत काही विशेष माहिती नव्हती. पण अनलिमिटेड इंटरनेट आणि हटकणारं कोणीच नसल्यानं दिवसभर अनेक तास मी सर्फिग करून इंटरनेटबाबत शिकत गेलो. अगदी त्याच काळात मी बराह शिकलो, मराठी ब्लॉग काढले आणि अॅडसेन्सचे अकाउंट काढले, अॅनॅलिटिक्सबाबत शिकत गेलो इ. इ. मला वाटते आता लोक मला या ब्लॉगाऐवजी ‘2know.in साठीच अधिक ओळखत असतील.’’.असं होतच राहतं. एका ब्लॉगमुळे दुस-याकडे दुर्लक्ष होणारच. निवृत्तीनंतर ‘फुलटाइम ब्लॉगर’ झालेले चंद्रशेखर आठवले यांनी ‘चायनाडेस्क’ नावाचा एक निराळाच ब्लॉग http://achandrashekhar.blogspot.com ) फुलवला, तरीही अन्य दोन ब्लॉगकडे त्यांचं लक्ष राहिलं. निव्वळ ब्लॉगलेखक या कारकीर्दीतून एक इंग्रजी व दोन मराठी पुस्तके (ईबुक) त्यांनी केली. ‘चायनाडेस्क’ ही मराठीत नवी माहिती आणण्याची चांगली सुरुवात आहे. ‘हा ब्लॉग कशासाठी’ याचे हेतुवाक्य चंद्रशेखर काकांनी (ब्लॉगरना अशी सलगीची संबोधने वर्ज्य नसावीत..) लिहिले आहे:
दक्षिण पूर्व आशियामधल्या माझ्या वास्तव्यानंतर, चीन या देशाचे जागतिक महत्त्व माझ्या लक्षात आले.. चिनी लोकांची राहणी, त्यांचा इतिहास, भूगोल, त्यांची दु:खे आपल्याला माहितीच नाहीत. चीनच्या अंतरंगात डोकावण्याचा हा एक अगदी प्राथमिक प्रयत्न आहे.
सातत्य आणि स्पष्टता, सोपेपणा आणि (ललितेतर) लिखाणातला रस, हे गुण चंद्रशेखर यांच्याकडे आहेत. अनेक ब्लॉगरना ‘आपण इथे कशासाठी आहोत’ हे पहिल्या पोस्टमध्ये जितकं कळतं, तितकं नंतर कळत तरी नाही किंवा लक्षात तरी राहात नाही!
- समीक्षा नेटके
माझं पेपर मध्ये नाव आलं आहे, हे आपल्यामुळे आज मला सहा महिन्यांनंतर कळत आहे. आपले अगदी मनापासून आभार!!!
ReplyDelete