Sunday, January 2, 2011

तलाइवर!!

प्रहारने निवडलेल्या पंचनायकांपैकी रजनीकांतबद्दल रविवार, २ जानेवारी, २०११ च्या अंकात लिहिलेला हा छोटासा परिचय. शनिवारच्या अंकात रजनी द बॉसचे इ-नोद आम्ही दिले होते. हे आणखी थोडेसे त्याच्याबद्दल...पडद्यावरचा अंधार फाडत श्रेयनामावलीतील पहिली अक्षरं उमटतात, सुपरस्टार. लगेच पुढे इंग्रजीत येतं, रजनी. पाठोपाठ तमीळमध्ये प्रखर तेजानं तळपणारं रजनी. तुमचे डोळे त्या चकाकीला सरावेपर्यंत तुमच्या लक्षात येतं, तुमच्या कानाचे पडदे फाटावेत इतका कल्लोळ सभोवताली सुरू झालाय आणि त्यातून एकच शब्द ऐकू येतोय.. तलाइवर! तलाइवर!! तमीळमधील या शब्दाचा अर्थ ‘बॉस’ और बॉस बोले तो रजनीकांत.
रजनीकांतच्या चित्रपटाचं फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकिट तुम्हाला कधी मिळालं असेल आणि तिथला भन्नाट, थरारून टाकणारा अनुभव तुम्ही घेतला असेल तर रजनीकांत आणि त्याची तुफान लोकप्रियता काय चीज आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जे या इन्यागिन्या भाग्यवंतांमध्ये मोडत नाहीत त्या आपल्यासारख्या कपर्दीकसमान क्षुद्र जीवांसाठी अशा शोच्या सुरुवातीचा एक सीन सांगतो.. (हा सीन इतर कुठल्याही हीरोच्या भाग्यात कधीच येऊ शकत नाही)
चित्रपट ‘शिवाजी’, रोबो अथवा रजनीकांतचा कुठलाही तमीळ ओरिजिनल. चित्रपटगृह अर्थात माटुंग्याचं अरोरा. जिथं चेन्नईसारखेच रजनीच्या चित्रपटाचे अगदी भल्या पहाटेही खेळ होतात, 25-35 फूट उंचीचे रजनीकांतचे बॅनर लागतात, त्यावर तितक्याच उंचीचे हार घातले जातात, किमान अर्धा तास फटाक्यांचा धूमधडाका सुरू रहातो, बॅनरवरून दुग्धाभिषेक होत असतो आणि थिएटरच्या काळोखात तुमच्या अवतीभवती रजनीच्या सर्वभाषक पण प्रामुख्याने तमीळ चाहत्यांचा गच्च समुद्र पसरलेला असतो. पडद्यावरचा अंधार फाडत श्रेयनामावलीतील पहिली अक्षरं उमटतात, सुपरस्टार. लगेच पुढे इंग्रजीत येतं, रजनी. पाठोपाठ तमीळमध्ये प्रखर तेजानं तळपणारं रजनी. तुमचे डोळे त्या चकाकीला सरावेपर्यंत तुमच्या लक्षात येतं, तुमच्या कानाचे पडदे फाटावेत इतका कल्लोळ सभोवताली सुरू झालाय आणि त्यातून एकच शब्द ऐकू येतोय.. तलाइवर! तलाइवर!! तमीळमधील या शब्दाचा अर्थ ‘बॉस’ और बॉस बोले तो रजनीकांत.
मग पडद्यावर त्याची एन्ट्री होते. एन्ट्री म्हणजे पडद्यावर फक्त एका बुटाचा तळ दिसायला लागतो, तो पाय जमिनीकडे यायला लागतो तसं वाटेतला कचरा, धूळमाती एखादं वादळ आल्यागत बाजूला फेकली जाते. पाय जमिनीवर स्थिरावतो, कॅमेरा वर सरकतो आणि थांबतो, फ्रेम फ्रीज होते.. तोपर्यंत ध्वनिप्रदूषणानं कमाल मर्यादा ओलांडून कानाचे पडदे फाटलेले असतात, तलाइवरचा गजर टिपेला भिडतो आणि स्क्रीनसमोर शुभ्र वस्त्रांमध्ये उभ्या असलेल्या काही मंडळींकडून आरती सुरू होते, आरती कुणाची तर रजनीकांतची, अगदी दाक्षिणात्य थाटात तळहातावर पेटता कापूर घेऊन.. सांगा हा सीन आणि हे भाग्य अन्य कुणाला लाभणे शक्य आहे का?
शिवाजी गायकवाड नावाच्या एका बस कंडक्टरचा दुय्यम खलनायकी भूमिका, स्टार, सुपरस्टार, मेगास्टार हा प्रवास शब्दांत पकडणे अशक्य आहे. अर्थात पडद्यावर अतर्क्य, अद्भुतसमान, अकल्पित, सुपरह्यूमन करामती करणा-या रजनीला मात्र ते सहज शक्य आहे. (रजनीच्या नावावर आणखी एक इनोद)
त्याची सगळी कहाणीच पुरी फिल्मी वाटावी अशी पण खरोखरची आहे.
तमीळ, कन्नड, तेलुगु, मल्याळम, हिंदी, इंग्रजी आणि बंगाली भाषेतील जवळपास 170 चित्रपट आणि मानधन आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनचे उच्चांक आज त्याच्या नावावर जमा आहेत.
अंगात नाना कळा असलेला हा बस कंडक्टर दुर्योधन म्हणून स्थानिक रंगभूमी गाजवत होता तेव्हा प्रख्यात दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या नजरेत भरला. आता तो जिवंतपणी दंतकथा झालाय, पण त्याचा प्रारंभ कमलाहासनकडून पडद्यावर मार खाणारा खलनायक म्हणून झालाय. तेव्हाही सुपरफास्ट अ‍ॅक्शन, वेगवान वावर, गॉगल-सिगारेटच्या करामती आणि टाळीखाऊ संवाद हे त्याचे वैशिष्टय़ होते. खलनायक ते नायक आणि मग महानायक झालेल्या रजनीने पुढे कमलाहासनसकट सगळ्यांना गुंडाळून ठेवले.
पिटातल्या प्रेक्षकांचा आणि बॉक्स ऑफिसचा तो बॉस आहे, एवढं त्याच्या चाहत्यांना पुरेसं आहे. ‘पडद्यावरची प्रतिमा पडद्यावर’ असं पाय जमिनीवर ठेवणारं भान असल्यामुळेच तो, छप्पर उडालेलं टक्कल, पांढरा सदरा, गुडघ्यापर्यंत वर उचललेली पांढरी लुंगी आणि पायात स्लिपर अशा कमालीच्या साधेपणानं कुठेही वावरतो. आणि तरीही त्याचे चाहते त्याच्यासाठी जीव टाकतात.. त्याच्या ‘रोबो’च्या ट्रेलरचे विशेष खेळ झाले तेव्हा सगळी तिकिटे सोल्ड-आउट होती. लक्षात घ्या, चित्रपट नव्हे फक्त ट्रेलर होता तो. असं दुसरं उदाहरण आहे तुमच्या पहाण्यात, ऐकण्यात?

No comments:

Post a Comment