मी तद्दन आळशी आहे. हे परखड आत्मपरीक्षण वगैरे मी सबळ पुराव्यानिशी करतोय. पहिला पुरावा म्हणजे या ब्लॉगवरचं हे पहिलंवहिलं लिहायलाच मी जवळपास वर्ष घेतलंय. अर्थात हा आळशीपणा माझं माझ्यापुरतं लिहण्याचा आहे हे सांगायला हवं. कामात अळंमटळंम नाही की वेळकाढूपणा नाही. पण हा एरव्हीचा कामातला वक्तशीरपणा वेगळं काही लिहायचं म्हटल्यावर कुठेतरी गायब होतो. मग लिहायचं की वाचायचं असं द्वंद्व मनात सुरू होतं, ते सतत सुरू असतचं म्हणा...
पत्रकार म्हणून डेडलाइनची तलवार मानेमागे अगदी टोचायला लागली कीच मी लिहायला घेतो हे माझं माझ्यापुरतं निरीक्षण आहे. तर नमनाला घडाभर तेल घालून झालंय. सांगायचं ते असं की आता जे काही तुम्ही वाचणार आहात या ब्लॉगवर ते असंच टाळणे अशक्यच झाल्यावर लिहायाचा कंटाळा अगदी कठोरपणे बाजूला सारत, बैठक मारून लिहीलेलं काहीबाही आहे. भटकंती, हॉलीवूड, बॉलीवूड, पुस्तकं, वाचन, जागतिक सिनेमा यावरंच हे बहुतांशी लिखाण आहे. लोकसत्ता, प्रहार, धनंजय दिवाळी अंक व इतर कुठेतरी कधीतरी लिहिलेलं असं हे सारं. लिहायचं की वाचायचं या द्वंद्वात माझ्या मनाचा तोल नेहमीच वाचनाकडे झुकला आहे. मराठीत, इंग्रजीत इतक्या दिग्गजांनी इतकं लिहून ठेवलंय की तेच वाचायला हे आयुष्य पुरणार नाही. नव्या वर्षात तरीही आळस झटकून दिसामाजी काही तरी लिहायचा संकल्प आहे. लिहिण्याचा आळस झटकण्याचा संकल्प सोडल्याबद्दल हा ब्लॉग म्हणजे माझी मलाच नववर्षाची भेट आहे. आता पुढचं पुढे...तोपर्यंत ही सुदाम्याची पुरचुंडी (आळसाने मात केली नाही तर ब्लॉग जमेल तसा अपडेटही करणार आहे)
नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा !!
No comments:
Post a Comment