Friday, August 30, 2013

बाईच्या जन्माला आली तू.. तिथंच घात झालाय..

काय सांगू बाई तुले.
बाईच्या जन्माला आली तू.
तिथंच घात झालाय.
कुणाकुणापासून वाचवू तुले
किती कुंपणं न् किती भिंती
अन् कुठल्या कणगीत झाकू तुला.
घरातला काळोखही असतो हल्ली आसक्त
बाहेरच्या अंधारालाही असतात नख्या
आणि उजेडात तर तुझ्या प्रत्येक देहरंध्राला
टोचायला सज्ज हजारो सुया.
कितीही झाकली काया
हैवानांना नसते दया
हेच असतं खरं.
काहीच होणार नाही
निषेधफे-या आणि निदर्शनांच्या धडका मारून
ही वस्ती कधीच मेलीय
तरारलेल्या श्वापदांचा उन्मादी थयथयाट
आणि सगळी दारे बंद