Monday, April 4, 2011

तुह्या गनेश कंचा?
कुणाचं डोकं कशावरून सटकेल सांगता येत नाही. काहीही कारण प्रक्षोभक ठरू शकतं. आता याच मजकूराच्या प्रारंभी दिलेली गणेशचित्रे तुम्ही पाहिली असतीलच! तुम्हा-आम्हाला ती गणेशचित्रे वाटली तरी आणखी कुणाला त्यांत काही वेगळेच दिसू शकते. अगदी `भलतेच आक्षेपार्ह' असेही काही वाटू शकते. या गणेशचित्रांचे चित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी ठाण्यात या चित्रांचे प्रदर्शन भरवले आणि पायावर जणू भला मोठा धोंडाच पाडून घेतला. `ही कसली चित्रे, हा मुळात गणपतीच नाहीये, ही विटंबना आहे गणेशाची...', असं काय-काय बडबडत ठाण्यातील काही जागरूक गणेशप्रेमी मंडळी त्यांच्यावर चालून आली. म्हापसेकरांना चित्रं उलटी करावी लागली. या मंडळींचंही बरोबर होतं. त्यांना या चित्रांत गणपती दिसत नव्हता, गणपती असा नसतोच मुळी..., असा त्यांचा आक्षेप होता. गडबड झाली ती म्हापसेकरांची. मी कसा दिसतो हे गणपतीने या मंडळींना सांगून ठेवल्याचं त्यांना माहिती नव्हतं, त्यामुळे चित्रं काढताना त्यांनी आधी या  मंडळींना विचारलंच नाही, त्यांची परवानगी घेतली नाही. यामुळे सारं बिघडलं. आणखी एक बारीक गडबड झाली ती या मंडळींची. म्हापसेकरांना गणपती अशा वेगवेगळ्या आकारांत दिसतो, ज्याला-त्याला, चित्रकाराला, प्रत्येक सश्रद्ध व्यक्तीला त्याचे श्रद्धास्थान, दैवत अनेक आकारांत, प्रकारांनी दिसू शकते हे लक्षात न घेतल्यामुळे त्यांचंही डोक सटकलं असणार. त्यांना मतं आहेत, त्यांची आग्रही भूमिका आहे आणि त्याचप्रमाणे इतरांचीही, चित्रकारांचीही असू शकते इतका साधा विचार या गोंधळात सटकलेल्या डोक्यात येणं जरा अवघडच की!
या मंडळींनी म्हापसेकरांची पंचाईत केली आणि त्यांनी चित्रं उलटी फिरवली. एवढय़ावरच प्रकरण थांबलं नाही. त्या चित्रप्रदर्शनात आणखी कुणा `मनातून धर्म'वाल्या मंडळींनी म्हापसेकर यांना गाठलं नंतर. `तुम्ही चित्रं उलटी फिरवलीतच कशी? गणपतीचे तोंड भिंतीकडे फिरवता? कुठे फेडाल ही पापं? तुम्ही आमच्या भावनांचा, श्रद्धांचा, दैवताचा अपमान केलाय. ताबडतोब ही चित्रं पुन्हा सुलट करा...', अशी त्यांची भाषा. वैतागून म्हापसेकरांनी रविवारी संध्याकाळी सगळी चित्रंच उतरवली आणि प्रदर्शन आटोपतं घेतलं.
यात झालं काय की खुद्द गणपतीनं ज्यांना `दर्शन' देऊन तो असा दिसतो, असं सांगितलं होतं त्या मंडळींनी मुळात त्यांचा गणपती कसा दिसतो हे सांगितलंच नाही. आता यापुढे गणेशमूर्तिकार, चित्रकार, शिल्पकार अशा मंडळींनी कृपया त्यांच्याशी संपर्क साधून आधी या मंडळींकडून कॉपीराईट घ्यावा आणि मगच मातीत, रंगात हात-ब्रश घालावा... नपेक्षा अशा मति फिरलेल्या मंडळींकडून त्यांच्या कामाची माती व्हायला वेळ लागणार नाही, आधीच सांगून ठेवतो!
जाता जाता - मागे कधीतरी मी कुणा गणेशभक्त, कुणा कृष्णभक्त व्यक्तींना त्यांचे आराध्य दैवत साक्षात दर्शन देते असं ऐकलं-वाचलं होतं. त्यांच्याकडून ही दैवतं कशी दिसतात ते जाणून घ्यायचं राहिलं याची हळहळ वाटतेय. मी उगाचच आपला चित्रकारांनी चितारलेल्या दैवत चित्रांसमोर, देव्हाऱयातल्या मूर्त़ींसमोर आजवर नतमस्तक होत राहिलो. माय मिस्टेक!


1 comment:

  1. इतरांवर लाथा झाडताना आपल्याही पेकाटात दोन बसणार याचे भान प्रदीप म्हापसेकरानी ठेवणे जरूर होते.

    ReplyDelete