Friday, March 25, 2011

हॉलिवुडची `क्वीन'


एलिझाबेथ टेलर गेल्याची बातमी आली आणि अनेकांना तिचे, कॅट ऑन हॉट टिन रुफ, सडनली, लास्ट समर, को वादिस, क्लिओपात्रा, बटरफिल्ड 8, हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ?, ` टेमिंग ऑफ श्रू' यासारखे अप्रतिम चित्रपट आठवले आणि त्यापेक्षाही अनेकांना तिने केलेली आठ लग्ने आठवली. नामवंत, त्यातही रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवलेल्या, व्यक्तींबाबत जी शोकांतिका घडते तेच लिझच्या बाबतीतही घडावे हा दुर्दैवी योगायोग आहे. सेकंदाला 24 फ्रेम्स या गतीने कलाकारांच्या अभिनयाची आणि देखणेपणाची, सौंदर्याची कसोटी लागलेली असते त्या रुपेरी पडद्यावरचा काही काळ आपल्या अभिनयाने आणि आरस्पानी सौंदर्याने गोठवून ठेवण्याचे सामर्थ्य लाभलेल्या मोजक्या अभिनेत्रींपैकी एलिझाबेथ उर्फ लिझ ही एक होती. हॉलिवुडमध्ये तिचे नाव गाजू लागले तो हॉलिवुडचा सुवर्णकाळ होता. ऑस्कर पुरस्कारांची सुरुवात होऊन एका दशकापेक्षा अधिक वर्षे उलटली होती. तिच्या नीलकमल नेत्रांचे मदनबाण, मादक सौंदर्य जेव्हा शेकडोंना घायाळ करत होते त्याचवेळी पीटर उस्तीनोव्ह, पॉल न्यूमन, रिचर्ड बर्टन, मार्लन ब्रँडो, कॅथरिन हेपबर्नसारखे अभिनयाचे मापदंड तिच्या अभिनयसामर्थ्याची वाखाणणी करत होते. वयाच्या नवव्या वर्षी, 1942मध्ये `देअर इज वन बॉर्न एव्हरी मिनिट', `लॅसी कम होम' या लागोपाठच्या दोन चित्रपटांमधून लिझचे रुपेरी पडद्यावर बालकलाकार म्हणून पहिले पाऊल पडले होते. बहुतेक बालकलाकारांच्या नशिबात रुपेरी पडद्यावरील क्षणिक प्रसिद्धी आणि नंतर उपेक्षेचा अंधार असतो. पण लिझ ही वेगळी चीज होती हे तिने एमजीएमच्या `नॅशनल वेल्व्हेट' या चित्रपटातून दाखवून दिले. या वेळी ती दहा वर्षांची होती. 1951चा प्लेस इन सन, को वादीस, कॅट ऑन हॉट रुफ, सडनली, लास्ट समर असे चित्रपट करता-करता तिचे सौंदर्य आणि अभिनय जोडीनेच बहरत होते. रंगमंचीय अभिनयकलेचेच धडे पडद्यावरही गिरवण्याचा, मेथड ऍक्टींगचा तो काळ होता. अशा वेळी अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेल्या एलिझाबेथने तिच्या उत्स्फूर्त अभिनयशैलीने हॉलिवूडमध्ये वेगळी वाट निर्माण केली.  `बटरफिल्ड 8' या चित्रपटातील हायसोसायटी कॉलगर्लच्या भूमिकेसाठी तिला पहिले ऑस्कर मिळवून दिले. तिच्यातील अभिनेत्री या गौरवाने कमालीची सुखावली होती. प्रत्यक्षातील एलिझाबेथचे उत्फुल्ल व्यक्तिमत्व, सहज वावर पडद्यावरील तिच्या प्रत्येक व्यक्तिरेखेतून डोकावत असे. `क्लिओपात्रा'पासून अगदी 1980मधील ` मिरर क्रॅक्ड'पर्यंत प्रत्येक चित्रपटात हा अनुभव येतो. `क्लिओपात्रा' हा तिचा बर्टनबरोबरचा पहिला चित्रपट. रिचर्ड बर्टन तेव्हा विवाहित होता. पण लिझ आणि तो परस्परांमध्ये कधी गुंतत गेले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. प्रत्यक्षात आणि पडद्यावर त्यांचे प्रणयप्रसंग खुलू लागले. `हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ?' या तिच्या बर्टनबरोबरच्या चित्रपटाने तिला दुसरे ऑस्कर मिळवून दिले. तोपर्यंत ते विवाहबद्धही झाले होते. हे लग्न दहा वर्षे टिकले. एकदा काडीमोड घेऊन या दोघांनी परस्परांशी पुन्हा लग्न केले होते. बर्टनशी पुन्हा घेतलेल्या घटस्फोटाने तिला मद्यासक्ती, ड्रग्ज, अतिखाणे अशा विकारांच्या वाटेवर नेऊन सोडले. तिच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. एक उत्तम अभिनेत्री, हॉलिवुडची अनभिषिक्त सम्राज्ञी या नामाभिधानांबरोबरच खासगी आयुष्यात, दुसऱयांचे नवरे पळवणारी, संसार मोडणारी अशी नकोशी बिरुदेही तिला तोवर चिकटली होती. सात घटस्फोट, आठ लग्ने, विवाहित पुरुषांशी प्रेमप्रकरणे आणि लग्न यामुळे तिची बदनामी झालीच, पण व्हॅटिकननेही तिला बहिष्कृत ठरवले होते. मधल्या काळात तिचा मित्र आणि गायक-अभिनेता रॉक हडसन याचा एड्सने बळी घेतला आणि एलिझाबेथ हादरली. त्याच्या जाण्याने तिला एड्स संशोधनविषयक फाऊंडेशनची स्थापना करण्याची प्रेरणा दिली. या क्षेत्रातील योगदानामुळेच तिला ऑस्कर अकादमीने तिसरे गौरवपर ऑस्कर प्रदान केले. 
अनेक व्याधी-विकारांचा सामना करता-करता तिच्या आयुष्याची संध्याकाळ सुरू झाली होती. `मला पैसा, प्रसिद्धी, उत्तम जीवन सगळं काही विनासायास मिळाल्यागत वाटत असलं तरी मी भोगलंही खूप आहे', अशी वेदना तिने एकदा बोलून दाखवली होती. खेदाची बाब ही की अभिनयासाठी दोनवेळा ऑस्कर मिळवूनही समीक्षकांनी तिच्या अभिनयगुणांपेक्षा तिच्या रसरशीत शरीरसौष्ठवाच्या पारडय़ातच नेहमी काकणभर वजन अधिक टाकले होते. तरीही, चित्रपट, ब्रॉडवे आणि टीव्ही या माध्यमांतील उण्यापुऱया सात दशकांची रुपेरी कारकीर्द आणि 50हून अधिक चित्रपटांमधील ताकदीचा अभिनय लक्षात घेता, लिझसारखी सौंदर्यवती अभिनयसम्राज्ञीही असू शकते का, या प्रश्नाचे उत्तर तिचा वकूब ओळखून असणाऱया दिग्गज दिग्दर्शकांनी, तिच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी नेहमीच होकारार्थी दिले आहे. ब्रिटनमध्ये जन्मलेली एलिझाबेथ ही हॉलिवुडसाठी `क्वीन' एलिझाबेथच होती एवढे नक्की!

No comments:

Post a Comment