Sunday, March 13, 2011

टुडे यू, टुमॉरो मी!


संकटात, अडचणीत सापडलेल्या अनोळखी, अपरिचित लोकांना कितीजण मदत करतात? कितीजण मदतीचा हात पुढे करतात? संकट फारच बिकट शब्द वाटत असेल तर असं म्हणू की, तुमची गाडी बंद पडली असेल, टायर पंक्चर झालं असेल वा तुम्ही रस्ता चुकला असाल तर कितीजण गाडी थांबवतात, लिफ्ट देतात, टायर बदलायला मदत करतात? कुणीतरी अगदी देवदूतासारखं मदतीला धावून आलंय असे फारसे अनुभव आपल्या गाठीशी असतील असं मला वाटतं नाही, आणि हे आपल्याकडेच नव्हे तर अमेरिकेसारख्या अगदी झकपक देशातही अगदी असंच घडतं... आणि जेव्हा असं घडतं तेव्हा परस्पर सहकार्याचा हा बंध सर्वदूर पोहोचवण्यासाठी इतरांना सांगावा असंही वाटतं, नाही का?
`मुंबई मिरर'मध्ये एक `5मिनिट5' नावाचा एक झकास स्तंभ दररोज छापून येतो. त्यात जस्टिन हॉर्नर या पोर्टलँडच्या ग्राफिक डिझायनरने त्याला यासंदर्भात आलेला एक अनुभव दिलाय. न्यू यॉर्क टाइम्सच्या मॅगझिन सेक्शनमध्ये त्याचा हा अनुभव छापून आला होता. तो मिररच्या स्तंभातून आपल्यापर्यंत फॉरवर्ड झालाय.
जस्टिन सांगतो - हायवेने जाताना गेल्या वर्षभरात त्याला तीनवेळा गाडीनं त्रास दिला. तिन्ही वेळा गाडी त्याची नव्हती, त्यामुळे तो त्याच्या गाडीत जसं एक्स्ट्रा साहित्य ठेवतो तसं नव्हतं. प्रत्येक वेळी मी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून इतर मोटारचालकांकडे मदत मागण्यासाठी हात हलवून-हलवून थकलो, पण कुणीच थांबायला तयार नव्हते. पेट्रोल पंपावर गेलो तर रिकामा गॅलन सुरक्षेच्या कारणास्तव देता येत नाही असं सांगणारी मंडळीच झाकण नसलेलं एक डबडं 15 डॉलरला माझ्या गळ्यात मारू पहात होती. `तुमच्यासारख्या लोकांमुळे आपला देश खड्डय़ात चाललाय', असं मी त्यांना ऐकवलंही. पण त्यामुळे माझी अडचण काही सुटली नाही. आश्चर्य म्हणजे या प्रत्येक खेपेस त्याच्या मदतीला कुणी कनवाळू अमेरिकन नाही तर मेक्सिकन स्थलांतरित धावून आले आणि त्यांच्यापैकी कुणालाही इंग्रजीचा गंधही नव्हता...
टायर पंक्चर झाला होता त्यावेळी आलेला एक अनुभव जस्टिननं दिलाय - मी हायवे वर जवळपास तीन तास लटकलो होतो. मित्राची जीप असल्यामुळे त्यात जॅक नव्हता, म्हणून मी गाडीवर मला टायर बदलण्यासाठी एक जॅक हवाय, असा बोर्डही लावला होता. पण कुणीच थांबत नव्हते. आता उपयोग नाही म्हणून मी पायपीट सुरू करणार एवढय़ात एक व्हॅन थांबली. त्यात एक कुटुंब होतं, कुटुंबप्रमुख उतरला. त्याला इंग्रजी येत नव्हतं, पण त्याच्या मुलीला समजत होतं. काय प्रॉब्लेम आहे ते मी त्यांना समजावून सांगितलं. त्याच्याकडचा जॅक जीपच्या मानानं छोटा होता, लगेच त्याने त्याच्या गाडीतून एक करवत काढली, रस्त्याकडेला पडलेल्या एका लाकडाचा पुरेसा तुकडा कापला. त्याच्यावर जॅक चढवून आम्ही कामाला लागलो. आणि जॅक फिरवायचे हँडलच माझ्याकडूनच तुटले. सत्यानाश. पण, लगेचच त्याने बायकोला शेजारच्या गावात पाठवून नवीन हँडल आणले आणि थोडासा घाम गाळून माझा टायर आम्ही बदललाही. घामाघूम, धुळीत माखलेल्या अशा आम्हा दोघांसाठी त्याच्या बायकोने गाडीतून हात धुण्यासाठी पाणी आणलं. मी त्याचे आभार मानून त्याला 20 डॉलर देत होतो, तर तो घेईना. मग मी ते त्याच्या बायकोकडे गुपचुप दिले. ही मंडळी अक्षरश: देवासारखी माझ्या मदतीला धावून आली होती. त्याच्या घरी काहीतरी नंतर भेटवस्तू पाठवून आभार मानावेत म्हणून मी त्याच्या मुलीला पत्ता विचारला तेव्हा कळलं की, ते सगळे मेक्सिकोतले आहेत. इथं रोजगारासाठी आले होते आणि परत चालले होते.
त्यांचे आभार मानून मी जीपकडे वळलो तेव्हा त्याच मुलीनं हाक मारून मला, जेवलायतं का असं विचारलं. मी नाही म्हटल्यावर तिनं मला एक सँडविच दिलं. मला भरून आलं. त्या रस्त्यावरून जाणाऱया इतर कुणापेक्षाही खचितच गरीब आणि हातावर पोट असणाऱया त्या कुटुंबानं एका संपूर्ण अनोळखी इसमासाठी तास-दोन तास खर्च केले होते. मी गाडीकडे जाता-जाताच सँडविचवरचा कागद उघडला तर, आत मी दिलेले 20 डॉलरही होते. मी गर्रकन वळून व्हॅनकडे धावलो, त्या माणसानं खिडकीची काच खाली केली. वीस डॉलरची नोट पाहून त्याने नको, नको अशी मान हलवायला सुरूवात केली. तो तोंडभर हसून मोडक्यातोडक्या इंग्रजीत म्हणाला, `टुडे यू, टुमॉरो मी'.
माझे डोळे भरून आले. वर्षभरात माझ्या मनाजोगं काहीच घडत नव्हतं, अडचणीच अधिक होत्या, मी वैतागलो होतो. अशा वेळी या साध्या माणसानं थोडक्या शब्दांत जगण्याचं सार मला सांगितलं होतं. त्याचे शब्द मी लक्षात ठेवलेत, तेव्हापासून गेल्या काही महिन्यांत, मी टायर बदलायला मदत केलीय, लोकांना पेट्रोल पंपापर्यंत सोडलंय, एका मुलीला तर 50 मैल वाट वाकडी करून विमानतळावर पोहोचवलं आहे. मी या मदतीबद्दल काहीच घेत नाही. पण तरीही मला वाटतं प्रत्येक वेळी माझ्या खात्यात काहीतरी चांगलं जमा होतंय...
जस्टिनचा हा अनुभव आणि मला स्वत:ला अष्टविनायक करत असताना सोलापूर हायवेला आलेला अनुभव यात फारसा फरक नाही. सिद्धटेकच्या रस्ता नसलेल्या रस्त्यावरून उस ट्रक्टरना वाट देत गाडी हाणतानाच बहुधा टायरची वाट लागली होती. माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही. गाडी दौंडमधून बाहेर पडून सोलापूर-पुणे हायवेला लागल्यावर जोरात हाणली तसा टायरचा फटफट आवाज यायला लागला. तो लक्षात येऊन गाडी कंट्रोल करून बाजूला लावेपर्यंत मागच्या टायरची पार वाट लागली होती. फाटून तुकडे झाले होते. थांबलो नसतो तर रिम रस्त्यावर उतरलं असतं. गाडीत चालक-मालक मीच. सोबत पत्नी वर्षा आणि लेक अपूर्वा. टायर बदलायचं कसं पुस्तकी माहित, पण प्रत्यक्षात शून्य माहिती. ज्या कुणाच्या वस्तीवर थांबलो तेथेही कुणी नव्हतं. रस्ता भरधाव. कुणी थांबायला तयार नाही. तेवढय़ात एक टमटम थांबली. त्याने सांगितलं, थोडं पुढे टायरवाला आहे, तिकडे बघा मदत मिळते का. मागून येणाऱया एका मोटारसायकलवाल्याला थांबवून तिथं गेलो तर सारं बंद. मग तोच म्हणाला, पुढं आणखी टायरवाला आहे, तिकडे पाहू. तिकडे गेलो तर तिथे मोठाले ट्रक्टरचे टायर आणि काय काय पंक्चर काढायला आलेलं. टायरवाला एकटाच. तो म्हणाला मी काही येत नाही, तुमचं तुम्ही बघा कसं ते. मी गांगरलो होतो. स्टेपनी होती पण टायर बदलायची माहितीच नाही. माझी ती अवस्था तिथं बसलेले दोघेजण बघत होते. दोघे बाजूच्याच कुठल्या वस्तीवरचे होते. मोटारसायकलचं पंक्चर काढायला आलेले.
अंधार पडायला लागलेला. शेवटी त्यांच्यातला एकजण म्हणाला, पावणं, स्टेपनी हाय का, टायर बदलता येतं का? मी पहिल्याला हो आणि दुसऱया प्रश्नाला अर्थातच नाही असं उत्तर दिलं. मंग आमी दावलं तर बदलाल का टायर?, असं त्यांनी विचारल्यावर मी जरासा हुशारून हो म्हटलं. त्यांच्या मोटारसायकलीचं चांगभलं झाल्यावर आम्ही तिघे पुन्हा माझ्या गाडीकडे आलो. मग जॅक काढला, पान्हा काढला. त्याने जॅक मला लावायला दिला. माझी ओढाताण पाहून पान्हा घेऊन त्यानेच टायरचं नट खोलायला सुरूवात केली. तोपर्यंत मी कसाबसा जॅक चढवला, टायर निघाला. स्टेपनी मी काढली. मी गाडीवान असलो तरी टायर बदलण्याबाबत एकदमच पावणा आहे हे त्यांना कळून चुकल्यामुळे त्यांचाच खोळंबा नको म्हणून त्यांनीच मग स्टेपनी लावली, फिट केली, जॅक काढला आणि हुश्श केलं. माझ्याही मनात हुश्श झालं...
तर सांगायचं असं की ती देघं देवासारखी भेटली नसती तर माझीही तिथेच लटकंती होती निदान रात्रीपुरती. मी कुणाकुणाला कधी ना कधी केलेली मदत बहुधा अशी कामी आली होती.
टायर बदलण्याचं तंत्र तेवढं अजून घोटून व्हायचं आहे, बाकी `टुडे यू, टुमॉरो मी' हे मला एकशेएक टक्के पटलंय!

2 comments: