Thursday, March 3, 2011

`ऑनर किलिंग' अर्थात ऐकत नाही तर खलास करा लेकीला


हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ वगैरे आठवला तर खानदानकी इज्जत... सारखे डायलॉग लगेच आठवतात. मजा वाटायची नायकाचा किंवा नायिकेचा बाप असं बडबडायचा तेव्हा... असे चित्रपट पाहून-पाहून माहित असायचं की काही झालं तरी पडद्यावर बागबगिच्यात गाणीबिणी म्हणत हुंदडणारे ते घोडनवरे आणि घोडनवऱया शेवटी बोहल्यावर चढणारच आहेत, त्यांच्यापैकी कुणाचाही बाप आडवा आला तरी ते अटळ आहे. पण, या डायलॉगमागे एक वास्तव दडलंय एवढं कळण्याइतकी समज आली नव्हती तेव्हा हे चित्रपट पाहायचो, थिएटरमध्ये, टीव्हीवर. नंतर चित्रपटसृष्टी बदलत गेली आणि मीही. पण, रुपेरी पडद्यावर जे काही दाखवलं जातं त्यात वास्तवाचा अंश असा ना तसा, या ना त्या प्रकारे असतोच असतो, बऱयाचदा ते वास्तवाचंच पाहणाऱयाच्या नजरेला, बुद्धीला झेपेलसं प्रतिबिंब असतं, हे मात्र लगेच्याच काही वर्षात उमजलं होतं.
खानदानकी इज्जत... असतेच असते, प्रत्यक्षात आपल्याच रक्ता-मांसाच्या मुलीला गळा घोटून, विहिरीत ढकलून, विष देऊन, गळफास देऊन मारण्याइतकी ती विखारी असते हे मात्र गेल्या काही वर्षांत प्रकर्षानं कळून आलंय. उत्तर प्रदेश, हरयाणा इथलीच उदाहरणं वाचायला मिळायची तेव्हा `ऑनर किलिंग' कसलं भयानक प्रकरण आहे, असं वाटायचं. आता थेट महाराष्ट्रात, नव्हे आपल्या मुंबईजवळ मुरबाडला गेल्या आठवडय़ात हेच घडलं. आंतरजातीय प्रेमसंबधांमुळे घरच्यानीच एका तरूण जोडप्याला संपवून टाकलं. दोन दिवसांपूर्वी मुंबईत याच प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. घरच्यांच्या विरोधामुळे जातीबाहेरच्या मुलाबरोबर पळून जाणाऱया पूजाला तिच्या भावानेच मारहाण करत, शिव्याशाप देत पनवेल फास्ट लोकलमधून वाशी खाडीपुलावर ढकलून दिले. आयुष्याची दोरी बळकट म्हणून पूजा वाचलीय, पण तिच्या डोक्याला, चेहऱयाला जबर मार बसलाय, जबडा निखळलाय. सध्या ती बोलू शकत नाही आणि ती तोल जाऊन पडली म्हणून सांगणाऱया तिच्या भावाला पोलिसांनी अपघात म्हणून नोंद करून सोडून दिलाय.

`टाइम'च्या वेबसाइटवर अमेरिकेतील एका ऑनर किलिंगबद्दल लेख प्रकाशित झालाय. (http://www.time.com/time/nation/article/0,8599,2055445,00.html?xid=newsletter-weekly) नूर-अल-मलेकी या इराकी मुलीबद्दल. ती जीन्स घालते, इकडे-तिकडे फिरते, इराकी मुलाबरोबर लग्न कर म्हटलं तर ऐकत नाही, थोडक्यात खानदानकी इज्जत साफ धुळीला मिळवतेय, म्हणून तिच्या बापाने नूरच्या अंगावर जीप घालून तिला 2009मध्ये अरिझोनाच्या एका वाहनतळावर चिरडून मारलं. फलेह-अल-मलेकी हे त्याचं नाव. अभ्यासात हुशार, सुंदर अशा नूरला अमेरिकन स्व-तंत्रवादी जीवनशैलीनं आकर्षून घेतलं होतं. तिला पाहिजे त्या प्रमाणे ती जगत होती आणि फलेहला ते आवडत नव्हतं.
नूर-अल-मलेकी
यामुळेच त्याने नूरला 17 वर्षांची असताना इराकला नेऊन तिचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं होतं. अवघ्या वर्षभरात नूर परत आली आणि वेगळी रहायला लागली. फलेहचं तेव्हापासून मस्तक फिरलं होतं. नूरनं घराण्याचं नाव बरबाद केलं असं मनात घेतलेल्या फलेहने अखेर एक दिवस तिचा काटा काढलाच. मला तिला मारायचं नव्हतं, तिच्या अंगावर थुंकायचं होतं, पण गाडीवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला, असं त्याचं म्हणणं अर्थातच कोर्टानं मानलं नाही. धक्कादायक हे की, `अशी मुलगी असेल तर काय करणार बाप, नूरने हे ओढवून घेतलं, तिला नीट वागायला काय झालं होतं, फलेहने केलं ते काही गैर नाही...' अशा प्रतिक्रिया अमेरिकेत स्थायिक झालेल्या इराकी समाजातून उमटल्या आहेत.
काहीही व्यक्त होण्यापलिकडलं हे भीषण वास्तव आहे.
मी माझ्या लेकीकडे पाहतोय... `मुली बापांच्या लाडक्या असतात' या सप्रमाण सिद्ध उक्तीला मी अपवाद नाही याची पुरेपूर जाणीव असलेल्या माझ्या लेकीनं आताच मला गुंडाळून ठेवलंय. पण, लेकींना कायम पाठीशी घालणारे माझ्यासारखे बाप आणि `मुलगी ऐकत नाही, खलास करा तिला', अशा हीन पातळीला उतरणारे बाप नावाचे राक्षस यांपैकी या राक्षसांची संख्या वाढू लागलीय की काय, या शंकेने मी भयकातर झालोय!
ज्या लेकीला वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी करायचं, तिलाच खलास करायचं, दुसऱया घरची मुलगी सून म्हणून आणायची आणि तिला पेटवून द्यायचं, तिचा कोळसा करायचा असं करू शकणार्र्या राक्षसांचं अवतीभवती असणंही नकोसं झालंय!

1 comment:

  1. मालाडची रश्मी तळपदे आणि नॉयडाची आरूषी तलवार यांचं किलींग कुठल्या प्रकारात मोडतं? त्यांच्याबाबतीत नक्की काय झालं?

    ReplyDelete