हॅप्पी दिवाळी!!
दिवाळीत धमाल सुरू होती. फटाक्यांचे धडामधूम, मिठाई, फराळ आणि ‘हॅप्पी दिवाळी’ म्हणत शुभेच्छांची लयलूट.
शुभेच्छा संदेशांचा नुसता पाऊस पडतोय. प्रत्यक्ष फोन करण्याची, दोन शब्द बोलण्याची कुणाला फुरसद नसली तरी मेसेज टाइप करण्यासाठी, फॉर्वर्ड करण्यासाठी पाच-सात मिनिटे कामी येत आहेत. जो बघाल तो मोबाइलमध्ये अडकलेला. मान खाली, पाय चालू. समोरचा पण तसाच असेल तर टक्कर अटळ. सुदैवाने फटाके पाहण्यासाठी मान अधूनमधून वर होत असल्याने अनेक अपघात, टकरी होता होता राहिल्या आहेत. नाही तर दिवाळीत वेगळेच फटाके फुटले असते.
मोबाइल कंपन्यांनी भाववाढ करून एसएमएस संदेशवहनाची वाट अडवली असली तरी व्हॉट्स अॅपने संदेशवहनाचे महाद्वार जणू खुले केले आहे. या महाद्वारातून काहीही पाठवता येते. नुसते संदेश, चित्रं, छायाचित्रं, अॅनिमेशन, व्हीडिओ जे हवं ते. त्यामुळे या संदेशांमध्ये सुद्धा वैविध्य आलं आहे. एरव्हीही सणासुदीचे दिवस म्हणजे व्हॉट्स अॅपवर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव. जेवढे वाचाल तेवढे कमी… यातही नव्वद टक्के फॉर्वर्ड केलेले. म्हणजे दुसºया कुणीतरी पाठवलेले कॉपी पेस्ट करून जाने दो आगे टाइपचे. त्यात कधी कधी गोंधळ होतो. मूळ पाठवणाºयाने त्याचे नाव शुभेच्छांखाली लिहिले असले तरी ते खोडण्याचे राहून जाते. मग जी व्यक्ती माहितीतील नाही तिने पाठवलेला संदेश कुणातरी माहितीतील व्यक्तीकडून आपल्याला मिळतो. कधी या ढिसाळपणाचा रागही येतो आणि कधी गम्मतही वाटते.
दसरा-दिवाळीत तर जेवढे शुभेच्छा संदेश पाठवले जातात त्यांच्या आकड्याची विक्रम म्हणून नोंद घ्यायला हरकत नसावी असं कधीकधी वाटतं. भरपूर पुरेपूर अशा प्रकारचं हे संदेशसाहित्य असतं. त्यातला बहुतांशी भाग हा आधी म्हटल्याप्रमाणेच फॉर्वर्डच असतो पण, कधी कधी काही ‘संदेशमौक्तिके’ही हाती लागतात. काही निखळ शुभेच्छा असतात, काहींमध्ये थट्टेचा सूर असतो, काही मजेशीर असतात तर, काही खरोखरीच मार्गदर्शक, काहीतरी उपयुक्त सांगणारे, मांडणारे असे असतात.
यंदाच्या दिवाळीत असे अनेक संदेश व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून पाठवले गेले असतील. त्यापैकी काही उपयुक्त, मार्गदर्शनपर आणि काही मजेशीर असे संदेश पुढे देतोय -
एक संदेश आला होता – ‘‘कुणी शार्पशुटर आहे का, आपल्या ग्रुपवर?
का म्हणजे काय?
टिकल्यांचं पाकीट फोडायचय यार..’’
आणखी एक असाच मजेशीर होता -
‘‘तुम्ही स्वत:ला शेरदील, वाघ समजत असाल तर त्वरित संपर्क करा..
दिवाळीचा किल्ला केलाय… त्या किल्ल्यावरच्या गुहेत बसण्यासाठी तुमची गरज आहे…’’
हे सगळे टाइमपास प्रकारचे संदेश. पण, काही खरोखरीच विचार करायला लावणारे असतात. वेगळी, समाजपयोगी दिशा दाखवणारे असतात. जसा हा संदेश -
धनत्रयोदशीच्या दिवशी आलेला हा संदेश धनवृद्धी कशी कराल, तुमची आर्थिक स्थिती कशी मजबूत ठेवाल याबद्दल काही चांगल्या टीप्स देतो. तुमच्या क्षमतेइतके, पात्रतेइतके वेतन मिळवा आणि खर्च तुमच्या कमाईपेक्षा कमी ठेवा… बजेट हा आजच्या युगाचा एकाक्षरी मूलमंत्र ध्यानात ठेवा… आपली कमाई लक्षात घेऊन प्रत्येकानेच बजेट आखले पाहिजे, खर्चाचीही आवश्यक आणि अनावश्यक अशी विभागणी केली पााहिजे.. याचा काटेकोर अवलंब केलात तर श्रीमंत होणे अशक्य नाही. क्रेडिट कार्डची देयके वेळच्या वेळी चुकती करा… केवळ क्रेडिट कार्डच नव्हे तर वीज बिल, टेलिफोन बील अशी सगळीच बिले मुदतीआधी भरलीत तर तुमची बचत तर होईलच पण थोडा अधिकचा पैसाही तुमच्याजवळ असेल… निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीही तजवीज करून ठेवा. तशा एखाद्या विमा योजनेत पैसे गुंतवा. बचत खात्यात शिल्लक वाढून फार काही फायदा होत नसतो, बँकेतील बचत खात्यातील रकमेवर मिळणाºया व्याजावर कर भरावा लागतो तो वेगळाच. यामुळेच तुमची बचत योग्य प्रकारे, फायदेशीररीत्या गुंतवा. गुंतवणूक मॅच्युअर झाली की लगेच दुसरीकडे फिरवा. तो पैसा जितका काळ तसाच पडून राहील तेवढे तुमचा तोटा अधिक. गुंतवणूक योजनांच्या माहितीसाठी तुम्ही स्वत: अभ्यास करा, फक्त मध्यस्थांवर अवलंबून राहू नका. अडीअडचणीच्या प्रसंगांसाठी पैसा राखून ठेवा वा तात्काळ मोकळा करता येईल अशा योजनांमध्ये गुंतवा. म्हणजेच तुमचा सध्याचा खर्च, बिलं भागवता येतील आणि तीन ते सहा महिने खर्च भागेल अशी बचत म्हणजेच अडीअडचणीसाठीचा पैसा. चांगली विमा योजना घ्या. इच्छापत्र बनवा आणि ते अपडेटही करत राहा. तुमच्या सर्व गुंतवणुकीचं, बचतीचं आणि देणग्या, वैद्यकीय खर्च अशा सगळ्याच्या नोंदी एकत्र ठेवा. तरच प्राप्तीकरातून सवलत, वजावट आदीचा लाभ तुम्हाला घेता येईल आणि ऐनवेळी धावाधाव होणार नाही.
आणखी एक संदेश थोडा भावनिक होता – मोबाइल, टीव्ही बंद करून आईबाबांनी मुलांना दिलेला वेळ हेच मुलांसाठी धन, पतीच्या नजरेत दिसणारं प्रेम हेच पत्नीसाठी धन, वृद्ध मातापित्यांची काळजी घेणारी मुलं हेच त्या ज्येष्ठांचे खरे धन… हाही विचार करायला लावणारा होता.
सामाजिक जबाबदारीचं भान देणारा हा एक संदेशही सर्वत्र फिरत होता – डी फॉर डोनेट. गरजूंना कपडे, अन्नधान्य दान करा. आय फॉर इल्युमनेट. निसर्ग संरक्षणाची जाण तुमच्यात जागवा. डब्लू फॉर विश. जागतिक, राष्ट्रीय आणि स्वत:ची भरभराट व्हावी, शांतता व समाधान लाभावे यासाठी प्रार्थना करा. ए फॉर अव्हॉइड. फटाके, वीज, अन्न यांची नासाडी टाळा. प्रदूषण टाळा. एल फॉर लाइट. आध्यात्मिक तेजाने तुमचे आयुष्य उजळून टाका. आय फॉर इन्स्पायर. सौहार्द, बंधुभाव याची साक्ष म्हणून दिवाळी साजरी करण्यास सर्वांना उद्युक्त करा…
दिवाळीचा एक संदेश फारच सुंदर होता… चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती.
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे, मी देईन साथ…
हेच तर महत्त्वाचं असतं… ऐक्य, परस्परांना पाठबळ आणि अंधकार दूर करण्याची एकत्रित ताकद… ती तुम्हाला कायमच लाभावी याच शुभेच्छा!!
No comments:
Post a Comment