Monday, December 16, 2013

स्वत:ला कमी गुण देणारा लेखक अॅलिस्टेअर मॅक्लिन


 ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ पुस्तक आधी वाचलं होतं की, चित्रपट आधी पाहिला ते आता आठवत नाही. त्या काळात, म्हणजे कॉलेजात पाऊल टाकल्यावर जे उंडारलेपण अंगात येतं, त्यानुसार बहुधा चित्रपट आधी पाहिला गेला असावा. चित्रपट अर्थातच भन्नाट होता. कथानक सशक्त वगैरे शब्दसंपत्तीचा परिचय झाला नव्हता तेव्हाची गोष्ट. काय सॉलिड स्टोरी आहे, जबरा.., एवढय़ावर आमची गाडी थांबायची. पण, याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट बनला आहे आणि अॅलिस्टेअर मॅक्लिन नावाच्या कुणा लेखकाने ही जबरदस्त कथा लिहिली आहे, याची माहिती जमा झाली होती. यथावकाश कादंबरीही हातात आली, वाचून झाली आणि मॅक्लिनने माझा ताबा घेतला. खरं तर ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ने ताबा घेतला असं म्हणायला हवं. कारण, नंतर त्याचं लगेचच अगदी प्रयत्नपूर्वक मिळवून वाचलेलं पुस्तक म्हणजे ‘फोर्स टेन फ्रॉम नेव्हरॉन. या दोन कादंबऱ्यांमध्ये दहा वर्षाचं अंतर आहे. या पुस्तकामुळे मी इतका प्रभावित झालो नव्हतो. ‘द गन्स ऑफ नेव्हरॉन’ ही मॅक्लिनची दुसरी कादंबरी. ‘एचएमएस युलिसेस’ ही पहिली. दुस-या महायुद्धाच्या कालखंडात समुद्रावर लढल्या गेलेल्या युद्धाचे सर्वाधिक वास्तवपूर्ण वर्णन असलेली कादंबरी म्हणून तिची आज कल्ट क्लासिकच्या प्रभावळीत गणना होते. युद्धावर अधिकारवाणीने बोलणे मॅक्लिनला सहज शक्य होते. कारण, १९४१ ते १९४६ या काळात तो नौसैनिक होता. मॅक्लिनचा जन्म १९२२चा. दुस-या महायुद्धाला तोंड फुटलं, तेव्हा तो विशीचा तरणाबांड युवक होता. त्या काळातील शिरस्त्यानुसार, मुलगा तरुण झाला की त्याचं पाऊल सरळ युद्धभूमीवरच पडायचं. अॅलिस्टेअरचं तेच झालं. तो इंग्लंडच्या शाही नौदलात नौसैनिक म्हणून दाखल झाला. पीएस बोर्नमाऊथ क्वीन या विमानविरोधी तोफा बसवलेल्या जहाजावर त्याची रवानगी झाली. इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या किनारपट्टी भागात ही नौका गस्त घालत असे. १९४३मध्ये एचएमएस रॉयेलिस्ट या युद्धनौकेवर सेवा बजावताना अटलांटिक महासागरातून ये-जा करणाऱ्या मालवाहू नौकांना सुरक्षा कवच पुरवण्याची जबाबदारी त्याच्या तुकडीवर होती. याच युद्धनौकेवरील सेवाकाळात त्यानं दक्षिण फ्रान्स, तिरपित्झ, नॉर्वेची किनारपट्टी, भूमध्य समुद्र, क्रिट आणि एजिअन तसेच अतिपूर्वेकडील बर्मा, मलाया आणि सुमात्रा या भागांमध्ये प्रत्यक्ष युद्धाचा, चकमकींचा भरपूर अनुभव घेतला. युद्धकाळातील थेट सहभाग आणि अनुभवांचा खजिना त्याला पुढे लेखक म्हणून उपयोगी आला. युद्धसमाप्तीनंतर ग्लासगो विद्यापीठात इंग्रजीचं अध्ययन करत असतानाच त्याने खर्चाची हातमिळवणी करण्यासाठी कथा लिहायला सुरुवात केली होती. बहुतेक कथा अर्थातच सागरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर असायच्या. याच वेळी १९५४मध्ये त्याने एक कथालेखन स्पर्धा जिंकली आणि कॉलिन्स प्रकाशन संस्थेचं त्याच्याकडे लक्ष गेलं. मॅक्लिननं एक कादंबरी लिहून द्यावी, असं त्यांनी सुचवल्यावर तो बैठक मारून बसला. त्याच्याजवळ अनुभवांच्या पोतडीत पुष्कळ अस्सल चिजा होत्या, त्यातून जी कादंबरी समोर आली तीच ‘एचएमएस युलिसेस’. बेस्टसेलर लेखक म्हणून मॅक्लिनची ओळख वाढू लागली. मॅक्लिन जरा विक्षिप्तच होता. आपल्या कादंबऱ्या कथानकामुळे खपतात, मॅक्लिन या नावामुळं नाही, हे सिद्ध करण्यासाठी त्यानं इयान स्टुअर्ट या टोपणनावानं दोन कादंबऱ्या लिहिल्या. त्याही तडाखेबंद खपल्या. १९६०मध्ये तो इतका लोकप्रिय होता, गाजत होता, पैशांच्या राशीत लोळत होता की, त्याला कर वाचवण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंडलडला मुक्काम ठोकावा लागला होता. मॅक्लिन हे जवळपास ब्रँडनेम बनलं असतानाच १९६३ ते १९६६ या कालखंडात लेखणी बाजूला ठेवून त्यानं इंग्लंडमध्ये दोन-तीन हॉटेलं सुरू केली होती. ती फार चालली नाहीत, हे चाहत्यांचं सुदैव. त्यामुळे तो पुन्हा लिखाणाकडे वळला आणि नव्या जोमानं लिहायला लागला. जेम्स बॉण्डचा लेखक इयान फ्लेमिंगही त्या वेळी जोरात होता. त्याच्या तुलनेत मॅक्लिन फारच क्लिन लिहायचा. सेक्स नाही, रोमान्स नाही. फक्त साहस आणि थरारक घटना. कथानकात बाकी भानगडी आणल्या तर मूळ कथा, त्यातला थरार बाजूला पडतो, त्यातली मजा उणावते, असं तो म्हणायचा. ते खरंच होतं. ‘एचएमएस युलिसेस’पासून फिअर इज द की, द गोल्डन रांदेहू, आइस स्टेशन झेब्रा, व्हेअर इगल्स डेअर (हो, हीपण त्याचीच अफलातून कादंबरी), पपेट ऑन अ चेन, द लास्ट फ्रंटियर, ब्रेकहर्ट पास, सँटोरिनी, व्हेन एट बेल्स टोल.. यापैकी त्याच्या कुठल्याही कादंबरीत प्रेम, शृंगार यांना फारसा थारा नाही. त्याचे कथानायक परिस्थितीशी, खलनायकांशी चिवटपणे झुंज देतात, टिकून राहतात, विजयी होतात. सर्वसामान्य वाचकांना हवा तो थरार, तात्पुरती का होईना पण जाणवणारी उमेद, प्रेरणा हे सारं त्याच्या कथानकातून, नायकाच्या संघर्षातून नेमकं व्यक्त व्हायचं. सागरी युद्धाचं तंत्र, युद्धकाळातील त्याचे प्रत्यक्ष अनुभव यांचं आकर्षक मिश्रण त्याच्या अनेक कादंबऱ्यांमधून आढळतं. २८ कादंबऱ्या, एक कथासंग्रह आणि चार पटकथा त्याच्या नावावर जमा आहेत. आणि यातील प्रत्येक कादंबरी बेस्टसेलर ठरली होती. त्याच्या एकूण १६ कादंबऱ्या आणि २ कथांवर चित्रपट बनवले गेले. त्यापैकी चार चित्रपटांच्या पटकथा तर त्यानेच लिहिल्या होत्या. हॉलिवुडमधील एका स्टुडिओने चित्रपटांच्या कथाकल्पना लिहिण्यासाठी १९८०मध्ये त्याला करारबद्ध केल्यावर, मॅक्लिनने ‘युनायटेड नेशन्स अॅण्टी-क्राइम ऑर्गनायझेशन’ (युनॅको) ही काल्पनिक संस्था कागदावर उतरवली. या संस्थेच्या कामगिरीबद्दल लिहिलेल्या त्याच्या दोन कथांवर चित्रपट (‘होस्टेज टॉवर’ आणि ‘डेथ ट्रेन’) बनवले गेले. ‘व्हेअर इगल्स डेअर’ त्याने लिहिला तो रिचर्ड बर्टनसाठी. (स्वित्झर्लंडलडला बर्टनच्या कबरीपासून जवळच मॅक्लिनही विसावला आहे) बर्टनला त्याच्या मुलासोबत पाहता येईल असा एक साहसपट बनवायचा होता. त्याने मॅक्लिनला सांगितल्यावर त्याने ‘व्हेअर इगल्स डेअर’ची पटकथा लिहायला घेतली आणि त्याच वेळी कादंबरीही सुरू केली. कादंबरी आणि पटकथेत खूप फरक आहे. रुपेरी पडद्यावर क्लिंटने घेतलेले सर्वाधिक बळी या चित्रपटात आहेत, असं म्हटलं जातं. ‘गन्स ऑफ नेव्हरॅन’ आणि ‘व्हेअर इगल्स डेअर’चं कथानक बरंचसं एकसारखं आहे. पण दोन्हीकडे मॅक्लिन फॉर्म्युला हीट झाला. मॅक्लिन सिद्धहस्त लेखक होता. पहिलीच कादंबरी बेस्टसेलर ठरल्यावरही जन्मजात मध्यमवर्गीय सावधपणामुळे त्यानं शिक्षकाची नोकरी लगेचच सोडली नाही. ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’नं त्याला अफाट लोकप्रियता मिळवून दिल्यावर, आता आपलं नाव चालतंय, अशी खात्री झाल्यावरच तो पूर्णवेळ लेखन करू लागला. या पुस्तकाच्या चार लाख प्रती पहिल्या सहा महिन्यांत खपल्यानंतर कुठे त्याने शिक्षकाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पहाटेच उठून टाइपरायटरची टकटक सुरू करायची ती दुपापर्यंत, अशी त्याची लिखाणाची पद्धत होती. कच्चा आराखडा, फेरफार, पुनर्लेखन, पुन्हा-पुन्हा सुधारणा, त्यानंतर फायनल ड्राफ्ट यातलं काहीच त्याला मान्य नसायचं. एकदा लिहिलेल्या कथानकात काहीही दुरुस्ती करायला तो नाखूश असायचा. एकदा त्याच्या कादंबरीत काही सुधारणा हव्यात, असं त्याला पटवायला प्रकाशकांनी त्याच्याकडे प्रतिनिधी पाठवला होता. तो माणूस स्वित्झर्लंडलडला मॅक्लिनकडे पोहोचण्यापूर्वीच त्या पुस्तकावरील चित्रपटाचे हक्क विकले गेले होते. अर्थातच पुनर्लेखन वगैरे काहीही न सुचवता प्रकाशकाचा माणूस इंग्लंडला परतला. ‘कादंबरीचा शेवट माझ्या डोक्यात फिट्ट होईतो मी पहिलं वाक्यही लिहीत नाही, मी एकदा लिहिलेलं पुन्हा वाचतही नाही. लिहून झालं की थेट प्रकाशकांकडे रवाना करतो’, असं तो सांगायचा. १९७०च्या दशकात दोन कोटी प्रती खपवणाऱ्या या लेखकाची राहणी इतका प्रचंड पैसा कमावूनही एकदम साधी होती. ते नैतिकतेला धरून नसल्याचं दडपण त्याच्यावर असायचं. १९८७मध्ये तो गेला तेव्हा स्वित्झर्लंडलडमधील एका फ्लॅटमध्ये राहत होता. डाळ-तांदूळ जे लागेल ते विकत आणायचं, स्वत:चं जेवण बनवायचं अशी त्याची दिनचर्या होती. अफाट प्रसिद्धी, लोकप्रियता मिळूनही मॅक्लिनला त्याचा गर्व नव्हता. ‘साहित्यविश्वातील मी एक साधा प्रवासी आहे. माझी वाटचाल ती काय, एका पुस्तकाकडून दुस-या पुस्तकाकडे धडपडत जातो. कधी तरी मी खचितच खूप चांगलं लिहीन अशी आशा मात्र मी सोडलेली नाही’, असं म्हणण्याइतका तो ‘डाऊन टू अर्थ’ होता. आजही त्याची पुस्तकं खपतात, पदपथांवर मांडलेल्या पसाऱ्यात मॅक्लिनच्या कादंबऱ्यांवर हमखास नजर खिळते. तेव्हा वाटतं, मॅक्लिननं लेखक म्हणून स्वत:ला फारच कमी गुण दिले होते! ंं

No comments:

Post a Comment