Sunday, May 8, 2011

पनवेलची बुभुक्षित `श्वापदे'


पनवेलच्या कल्याणी आश्रमात निराधार, भिन्नमती मुलींच्या आयुष्याशी जे काही अकल्याण चालले होते ते एसीपी रश्मी करंदीकर यांच्या पथकाने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर उघडकीस आणले, दहाजणांना अटक झाली, संभवित विकृतांनी चालवलेले पशूपेक्षाही हीन वर्तन एेकून वाचून मनात संतापाचा लाव्हा खदखदत होता. तेव्हा उमटलेले हे शब्द... 
पनवेलच्या कल्याणी महिला आणि बालक सेवा संस्थेत भिन्नमती, अपंग, असहाय्य मुलींचा जो लैंगिक छळ सुरू होता तो पाहता या मुलींशी असे घृणास्पद दुर्वर्तन करणा-या संस्थाचालकांची आणि अशा कथित संभवितांची संभावना मानवी कातडे पांघरलेली बुभुक्षित श्वापदे म्हणूनच करावी लागेल. नीटसे बोलूही न शकणा-या, वाढते वय, वासनांध नजरा या कशाचीही जाण नसणा-या 19 अश्राप मुलींबरोबर गेली अनेक वर्षे या वासनासक्त मंडळींनी चालवलेल्या विकृत चाळ्यांचे पाढे एसीपी रश्मी करंदीकर यांच्या पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाचण्यात आले आहेत. लैंगिक छळाला विरोध करणा-या मुलींच्या हाता-पायांवर, नाजूक भागाजवळ सिगारेटचे चटके, तापत्या पळीचे, सळईचे डाग, शय्यासोबतीस नकार देणा-या मुलींना मारहाण, गळा दाबून मारण्याचे प्रयत्न, दोर रुतून जखमा होतील इतके घट्ट बांधून ठेवणे अशा भयानक यातना या मुली सहन करत होत्या. संस्थेत यायचे, पाहिजे ती मुलगी निवडून गच्चीवर न्यायची आणि तिचा उपभोग घ्यायचा, विरोध करणा-या मुलींना चटके द्यायचे, मारहाण करायची, बेल्टने झोडपून काढायचे, त्यांचा दुबळा प्रतिकार मोडून काढण्यासाठी त्यांना जबरदस्तीने दारू पाजायची, असे उन्मादी थैमान संस्थेत सुरू होते आणि संस्थाचालक रामचंद्र करंजुले याचीही त्यांना साथ होती. रामचंद्र, त्याची पत्नी सुरेखा, मुलगी कल्याणी, स्थानिक वार्ताहर असलेला त्याचा पुतण्या नानाभाऊ करंजुले, संस्थेतील दोन आया यांच्यासह एकूण दहाजणांवर हे आरोपपत्र दाखल केले गेले आहे. समाजातील जागल्या म्हणून ज्याने खरे तर अशा गुन्हेगारांचे बुरखे ‘लोकमता’समोर टराटर फाडायला हवे होते अशा या नानाचाही या अत्याचारांमध्ये सहभाग होता. राज्याच्या अनेक भागांतील आश्रमशाळा, महिला आश्रम येथील निराधार मुले-मुली याच प्रकारच्या शोषणाला सामोरे जात असतात. शहापूर तालुक्यातील कवडास येथील आश्रमशाळेतील मुलामुलींवर असेच अत्याचार झाल्याचे यापूर्वी उजेडात आले होते. आश्रमशाळा, बालकल्याण व महिला संस्थांमधील या गैरप्रकारांकडे काणाडोळा करणा-या संबंधित यंत्रणांच्या धृतराष्ट्रीय पवित्र्यामुळे अशा मुखंडांचे आजवर फावत आले आहे. यापैकी अनेक प्रकरणांमधील आरोपी उजळ माथ्याने फिरत असताना या शोषितांच्या बाजूने लढण्यासाठी कुणीही नाही ही शोकांतिका आहे. बलात्कारी व्यक्तींचे खच्चीकरण करण्याची सूचना मध्यंतरी दिल्लीतील एका महिला न्यायाधीशांनी केली होती. असहाय्य मुलामुलींवर लैंगिक अत्याचार करून उजळ माथ्याने फिरू धजावणा-या अशा मानवी श्वापदांसाठी खरे तर यापेक्षाही कठोर शिक्षेची गरज आहे!

No comments:

Post a Comment