दहा-पंधरा वर्षे उलटून गेली असतील, तेव्हाची गोष्ट. सेंट्रल रेल्वेचा प्रवासी म्हटल्यावर पश्चिम रेल्वेवाले त्या प्रवाशाकडे अतिव कणवेने पहायचे. हा प्रवासी दादरला उतरून पश्चिम रेल्वेच्या विरार गाडीत जरी शिरला तरी अगदी दयाद्र्र दृष्टीने त्याला न्याहाळून जमेल तशी जागाही करून द्यायचे.
Monday, November 3, 2014
मध्य रेल्वे ‘झिंदाबाद’
हवेहवेसे काही शब्दांतून निसटले होते
आभासांचे अभ्र
आठवणींचे कवडसे
त्या संध्याकाळी
कळेना कोण कुणाला छळत होते
हवेहवेसे काही शब्दांतून निसटले होते
- @#शैलेंद्रशिर्के
साहित्यातील ‘प्रांत’वाद
यंदाच्या साहित्यासाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक फ्रेंच लेखक पॅट्रिक मोदीआनो यांना प्रदान करण्यात आलं. नोबेलच्या ‘नोबेलप्राइझ.ऑर्ग’ या वेबसाइटवर गेलात तर एक मजेशीर गोष्ट पाहाता येते.
यंदाच्या साहित्यासाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक फ्रेंच लेखक पॅट्रिक मोदीआनो यांना प्रदान करण्यात आलं. या पारितोषिकासाठी केनियन लेखक गुगी वा थिओंग आणि जपानी लेखक हारुकी मुराकामी यांची नावं आघाडीवर म्हणून चर्चेत होती. प्रत्यक्षात ते दिलं गेलं पॅट्रिक मोदीआनो यांना. नोबेलच्या ‘नोबेलप्राइझ.ऑर्ग’ या वेबसाइटवर गेलात तर एक मजेशीर गोष्ट पाहाता येते. मोदीआनो यांच्या नावाची घोषणा करणा-या पेजवर एका बाजूला एक प्रश्न विचारलाय. ‘आजचा कौल’ वा वाचक काय म्हणतात या टाइपचा. प्रश्न आहे की, मोदीआनो यांचे काहीतरी साहित्य तुम्ही वाचलं आहे का? होय वा नाही असे दोन पर्याय आहेत. आणि सुमारे ११ हजार वाचकांनी तिथे प्रतिसाद दिलाय. त्यापैकी ९१ टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं आहे.
याचा अर्थ मोदीआनो हे फारसं कुणालाही माहिती नसलेले लेखक आहेत, असाही घेता येऊ शकतो. किंवा ज्या वाचकांनी तिथे नकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे त्यांना वाचक म्हणून वरच्या यत्तेत प्रवेश मिळायला अजून अवकाश आहे, त्यांना बरंच वाचन करायचं आहे (मोदीआनो यांच्या पुस्तकांचेही) असाही घेता येईल. आपल्याकडेही मोदीआनो कितीजणांना माहिती आहेत असं विचारल्यावर प्रतिसाद उत्साहवर्धक असेल, याची खात्री देता येणार नाही.
मोदीआनो यांचं नाव जाहीर झाल्यावर विदेशातही अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्याच. त्यांचं नाव जाहीर करण्याआधी पारितोषिक निवडसमितीचे सदस्य होरेस इंगडाल यांनी तर बॉम्बच टाकला. ‘पाश्चिमात्य साहित्याची पुरती वाट लागलीय. विद्यापीठं, संस्था यांच्याकडून मिळणारं अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती आणि लेखनकला ‘शिकवणारे’अभ्यासक्रम यामुळे ख-या साहित्याचा कसच नाहिसा झालाय. लेखकाला हे जे काही पैसे मिळतात, वित्तीय पाठबळ मिळतं त्यामुळे फोफावलेल्या व्यावसायिक लेखनवृत्तीचा साहित्यनिर्मितीवर नकारात्मक परिणाम होतोय. काही प्रमाणात मी हे समजू शकतो, पण यामुळे लेखकांची समाजाशी नाळ तुटते आणि त्याला आधार देणा-या संस्थांशी तो जखडला जातो.’ असं काय काय इंगडाल यांनी ‘ल क्रॉइक्स’या फ्रेंच दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल्यावर भरपूर गदारोळ उठला. पारितोषिक जाहीर व्हायच्या आधी इंगडाल यांनी ही मुलाखत दिली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी मोदीआनो यांचे नाव जाहीर झाल्यावर तर, इंगडाल आणि स्वीडिश अकादमी समितीच अमेरिकन साहित्याच्या विरोधात आहे, म्हणूनच तिथल्या लेखकांचा पारितोषिकासाठी विचार होत नाही, अशी टीकाही झाली.
‘द गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात या मुलाखतीचा गोषवारा वाचायला मिळाला. इंगडाल यांच्या म्हणण्यानुसार, लेखकाला आर्थिकदृष्टय़ा स्थिर करणा-या अनुदानांमुळे त्याच्यातला लेखक मारला जातोय. पूर्वीच्या दिग्गजांना असा आश्रय मिळत नव्हता. कुणी टॅक्सी चालवायचे, कुणी कारकूनी करायचे, कुणी वेटर तर कुणी आणखी कुठली तरी कामं करायचे. सॅम्युएल बेकेट आणि कितीतरी जण असेच झुंजले. तो विषम संघर्ष होता पण, साहित्यिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या संघर्षानेच त्यांच्यातील लेखकाचं पोषण केलं. आपल्या पाश्चिमात्य साहित्य जगातच ही समस्या जाणवते. आशियाई आणि आफ्रिकन लेखकांचं साहित्य वाचताना त्यात काही प्रमाणात तरी कस जाणवतो, ही त्याची शेरेबाजी अनेकांना झोंबली.
इंगडाल या मुलाखतीत आजच्या कथित वेगळ्या, बंडखोर धाटणीच्या साहित्यावरही घसरले आहेत, ‘चौकट मोडण्याचा आव आणणा-या कादंब-या हल्ली खूप लिहिल्या जातात, पण प्रत्यक्षात त्या तशा नसतातच. चोखंदळ वाचकाला लगेच समजतं की यात काही दम नाही. यातलं चौकट मोडणं वगैरे निखालास बनवेगिरी, पूर्वनियोजित आहे हे जाणवतंच. यापैकी बहुतेक लेखक युरोपियन किंवा अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिकलेले असतात. ते कुठलाही उंबरठा ओलांडत नाहीत वा मापदंड मोडत काढत नाहीत, कारण ज्या काही मर्यादा, चौकटी ओलांडायला हव्यात असं त्यांनी ठरवलेलं असतं तशा काहीही मर्यादा, चौकटी नसतातच.’
इंगडाल यांनी यापूर्वीही लेखनविषयक अभ्यासक्रम, विद्यापीठांचं अनुदान यावर टीका केली होती, पण या मुलाखतीतील थेट वार अमेरिकन साहित्यक्षेत्राच्या जास्तीच जिव्हारी लागले. आणखी एक दुखरी नस त्याला कारणीभूत आहे. ती म्हणजे १९९३ मध्ये टोनी मॉरिसन या अमेरिकन लेखिकेनं साहित्याचं नोबेल मिळवलं होतं. त्यानंतर आजतागायत अमेरिकन लेखकाला नोबेल मिळालेला नाही. त्यात इंगडाल यांनी आता थेट अमेरिकेतील साहित्यनिर्मितीला लक्ष्य केल्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली. आताचं साहित्य म्हणजे एखादी खरेदीविक्रीची वस्तू असते तसं झालं आहे. त्याची समीक्षा करण्याइतकं काहीच नाही. जे काही दर्जेदार साहित्य आहे त्यातही त्यामुळे बदल झाला आहे, असं इंगडाल बोलल्यावर तर हलकल्लोळ झाला. ‘ऑब्झव्र्हर’साठी लिहिणारे समीक्षक रॉबर्ट मक्रम यांनी तर इंगडाल यांना अमेरिकाविरोधी आणि ढुढ्ढाचार्य ठरवून टाकलं.
यापूर्वीही इंगडाल यांनी अमेरिकेतील साहित्यनिर्मितीवर, दर्जावर टीका केली होती. त्यांच्या टीकेवर जोरदार प्रतिहल्ला झाल्यावर इंगडाल यांनी त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास झाल्याची भूमिका घेतली. ‘महत्त्वाच्या अमेरिकन लेखकांना नोबेल जिंकण्याची संधी अजिबातच नाही असंच जणू मी म्हटल्यासारखे सारेजण माझ्यावर तुटून पडले असले तरी मी तशा अर्थाने काहीही म्हणालेलो नाही. नोबेलसाठी पात्र असे अमेरिकन लेखक नाहीत असं मी कधीही म्हणालो नाही. माझं म्हणणं एवढंच की, जागतिक साहित्याचे प्रवाह, अनुवाद यांची अमेरिकेतील उपलब्धता अत्यंत सीमीत असल्यामुळे अमेरिकन साहित्यक्षेत्राला, समीक्षेला मर्यादा आल्या आहेत. जे काही घडतंय, लिहिलं जातंय ते अमेरिकाकेंद्रीत. जणू एखाद्या आरसेगृहात अमेरिकेचीच प्रतिमा सगळीकडून प्रतिबिंबित होत आहे.’ इतर घडामोडींचा अमेरिकन साहित्यात अजिबात पडसाद उमटत नाहीत असंच काहीसं इंगडाल यांना सुचवायचं होतं. ते अर्थातच अमेरिकन लेखक आणि समीक्षकांच्या पचनी पडलेलं नाही.
यापूर्वीही इंगडाल यांनी अमेरिकेतील साहित्यनिर्मितीवर, दर्जावर टीका केली होती. त्यांच्या टीकेवर जोरदार प्रतिहल्ला झाल्यावर इंगडाल यांनी त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास झाल्याची भूमिका घेतली. ‘महत्त्वाच्या अमेरिकन लेखकांना नोबेल जिंकण्याची संधी अजिबातच नाही असंच जणू मी म्हटल्यासारखे सारेजण माझ्यावर तुटून पडले असले तरी मी तशा अर्थाने काहीही म्हणालेलो नाही. नोबेलसाठी पात्र असे अमेरिकन लेखक नाहीत असं मी कधीही म्हणालो नाही. माझं म्हणणं एवढंच की, जागतिक साहित्याचे प्रवाह, अनुवाद यांची अमेरिकेतील उपलब्धता अत्यंत सीमीत असल्यामुळे अमेरिकन साहित्यक्षेत्राला, समीक्षेला मर्यादा आल्या आहेत. जे काही घडतंय, लिहिलं जातंय ते अमेरिकाकेंद्रीत. जणू एखाद्या आरसेगृहात अमेरिकेचीच प्रतिमा सगळीकडून प्रतिबिंबित होत आहे.’ इतर घडामोडींचा अमेरिकन साहित्यात अजिबात पडसाद उमटत नाहीत असंच काहीसं इंगडाल यांना सुचवायचं होतं. ते अर्थातच अमेरिकन लेखक आणि समीक्षकांच्या पचनी पडलेलं नाही.
इंगडाल असं परखड बोलल्यामुळे यंदाचं नोबेल आशियाई वा आफ्रिकन लेखकाला मिळणार अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. काही नावांवर सट्टाही लागला होता. पण ते मिळालं मोदीआनो यांना, तरीही इंगडाल यांच्या या मुलाखतीमुळे काही प्रश्न मात्र छळू लागले आहेत.
उदाहरणार्थ, लेखकाला मग कुटुंबकबिला सांभाळण्यासाठी आर्थिक आधार मिळूच नये का, असा आधार मिळाला तर त्याच्या लेखनाचा कस कमी होतो का, त्याने त्याच्या लिखाणातून संघर्ष मांडला तरच ते लिखाण कसदार, दर्जेदार, पारितोषिकासाठी विचार व्हावा अशा दर्जाचं ठरतं का, बाकीच्यांचे साहित्य मग या निकषांनुसार फुटकळ, सुमार ठरवावं का, या प्रश्नांची उत्तर शोधायला हवीत.
आणि लेखक लिहिता कधी होतो. वास्तवाचे चटके बसल्यावर, परिस्थितीच्या गर्तेत गरगर फिरल्यावर, आत्मा काजळून टाकेल असे दाहक अनुभव घेतल्यावर की तुम्ही फक्त लिहा, बाकी काही करू नका. तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था, कुटुंबाचा उदरनिर्वाह याची जबाबदारी आमची. असं त्याला आश्वस्त केल्यावर प्रतिभेचा झरा त्याच्यातून उमळतो. या प्रश्नांचीही उत्तरं मिळवायला हवीत. प्रयत्न करूया!
हॅप्पी दिवाळी!!
हॅप्पी दिवाळी!!
दिवाळीत धमाल सुरू होती. फटाक्यांचे धडामधूम, मिठाई, फराळ आणि ‘हॅप्पी दिवाळी’ म्हणत शुभेच्छांची लयलूट.
शुभेच्छा संदेशांचा नुसता पाऊस पडतोय. प्रत्यक्ष फोन करण्याची, दोन शब्द बोलण्याची कुणाला फुरसद नसली तरी मेसेज टाइप करण्यासाठी, फॉर्वर्ड करण्यासाठी पाच-सात मिनिटे कामी येत आहेत. जो बघाल तो मोबाइलमध्ये अडकलेला. मान खाली, पाय चालू. समोरचा पण तसाच असेल तर टक्कर अटळ. सुदैवाने फटाके पाहण्यासाठी मान अधूनमधून वर होत असल्याने अनेक अपघात, टकरी होता होता राहिल्या आहेत. नाही तर दिवाळीत वेगळेच फटाके फुटले असते.
मोबाइल कंपन्यांनी भाववाढ करून एसएमएस संदेशवहनाची वाट अडवली असली तरी व्हॉट्स अॅपने संदेशवहनाचे महाद्वार जणू खुले केले आहे. या महाद्वारातून काहीही पाठवता येते. नुसते संदेश, चित्रं, छायाचित्रं, अॅनिमेशन, व्हीडिओ जे हवं ते. त्यामुळे या संदेशांमध्ये सुद्धा वैविध्य आलं आहे. एरव्हीही सणासुदीचे दिवस म्हणजे व्हॉट्स अॅपवर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव. जेवढे वाचाल तेवढे कमी… यातही नव्वद टक्के फॉर्वर्ड केलेले. म्हणजे दुसºया कुणीतरी पाठवलेले कॉपी पेस्ट करून जाने दो आगे टाइपचे. त्यात कधी कधी गोंधळ होतो. मूळ पाठवणाºयाने त्याचे नाव शुभेच्छांखाली लिहिले असले तरी ते खोडण्याचे राहून जाते. मग जी व्यक्ती माहितीतील नाही तिने पाठवलेला संदेश कुणातरी माहितीतील व्यक्तीकडून आपल्याला मिळतो. कधी या ढिसाळपणाचा रागही येतो आणि कधी गम्मतही वाटते.
दसरा-दिवाळीत तर जेवढे शुभेच्छा संदेश पाठवले जातात त्यांच्या आकड्याची विक्रम म्हणून नोंद घ्यायला हरकत नसावी असं कधीकधी वाटतं. भरपूर पुरेपूर अशा प्रकारचं हे संदेशसाहित्य असतं. त्यातला बहुतांशी भाग हा आधी म्हटल्याप्रमाणेच फॉर्वर्डच असतो पण, कधी कधी काही ‘संदेशमौक्तिके’ही हाती लागतात. काही निखळ शुभेच्छा असतात, काहींमध्ये थट्टेचा सूर असतो, काही मजेशीर असतात तर, काही खरोखरीच मार्गदर्शक, काहीतरी उपयुक्त सांगणारे, मांडणारे असे असतात.
यंदाच्या दिवाळीत असे अनेक संदेश व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून पाठवले गेले असतील. त्यापैकी काही उपयुक्त, मार्गदर्शनपर आणि काही मजेशीर असे संदेश पुढे देतोय -
एक संदेश आला होता – ‘‘कुणी शार्पशुटर आहे का, आपल्या ग्रुपवर?
का म्हणजे काय?
टिकल्यांचं पाकीट फोडायचय यार..’’
आणखी एक असाच मजेशीर होता -
‘‘तुम्ही स्वत:ला शेरदील, वाघ समजत असाल तर त्वरित संपर्क करा..
दिवाळीचा किल्ला केलाय… त्या किल्ल्यावरच्या गुहेत बसण्यासाठी तुमची गरज आहे…’’
हे सगळे टाइमपास प्रकारचे संदेश. पण, काही खरोखरीच विचार करायला लावणारे असतात. वेगळी, समाजपयोगी दिशा दाखवणारे असतात. जसा हा संदेश -
धनत्रयोदशीच्या दिवशी आलेला हा संदेश धनवृद्धी कशी कराल, तुमची आर्थिक स्थिती कशी मजबूत ठेवाल याबद्दल काही चांगल्या टीप्स देतो. तुमच्या क्षमतेइतके, पात्रतेइतके वेतन मिळवा आणि खर्च तुमच्या कमाईपेक्षा कमी ठेवा… बजेट हा आजच्या युगाचा एकाक्षरी मूलमंत्र ध्यानात ठेवा… आपली कमाई लक्षात घेऊन प्रत्येकानेच बजेट आखले पाहिजे, खर्चाचीही आवश्यक आणि अनावश्यक अशी विभागणी केली पााहिजे.. याचा काटेकोर अवलंब केलात तर श्रीमंत होणे अशक्य नाही. क्रेडिट कार्डची देयके वेळच्या वेळी चुकती करा… केवळ क्रेडिट कार्डच नव्हे तर वीज बिल, टेलिफोन बील अशी सगळीच बिले मुदतीआधी भरलीत तर तुमची बचत तर होईलच पण थोडा अधिकचा पैसाही तुमच्याजवळ असेल… निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीही तजवीज करून ठेवा. तशा एखाद्या विमा योजनेत पैसे गुंतवा. बचत खात्यात शिल्लक वाढून फार काही फायदा होत नसतो, बँकेतील बचत खात्यातील रकमेवर मिळणाºया व्याजावर कर भरावा लागतो तो वेगळाच. यामुळेच तुमची बचत योग्य प्रकारे, फायदेशीररीत्या गुंतवा. गुंतवणूक मॅच्युअर झाली की लगेच दुसरीकडे फिरवा. तो पैसा जितका काळ तसाच पडून राहील तेवढे तुमचा तोटा अधिक. गुंतवणूक योजनांच्या माहितीसाठी तुम्ही स्वत: अभ्यास करा, फक्त मध्यस्थांवर अवलंबून राहू नका. अडीअडचणीच्या प्रसंगांसाठी पैसा राखून ठेवा वा तात्काळ मोकळा करता येईल अशा योजनांमध्ये गुंतवा. म्हणजेच तुमचा सध्याचा खर्च, बिलं भागवता येतील आणि तीन ते सहा महिने खर्च भागेल अशी बचत म्हणजेच अडीअडचणीसाठीचा पैसा. चांगली विमा योजना घ्या. इच्छापत्र बनवा आणि ते अपडेटही करत राहा. तुमच्या सर्व गुंतवणुकीचं, बचतीचं आणि देणग्या, वैद्यकीय खर्च अशा सगळ्याच्या नोंदी एकत्र ठेवा. तरच प्राप्तीकरातून सवलत, वजावट आदीचा लाभ तुम्हाला घेता येईल आणि ऐनवेळी धावाधाव होणार नाही.
आणखी एक संदेश थोडा भावनिक होता – मोबाइल, टीव्ही बंद करून आईबाबांनी मुलांना दिलेला वेळ हेच मुलांसाठी धन, पतीच्या नजरेत दिसणारं प्रेम हेच पत्नीसाठी धन, वृद्ध मातापित्यांची काळजी घेणारी मुलं हेच त्या ज्येष्ठांचे खरे धन… हाही विचार करायला लावणारा होता.
सामाजिक जबाबदारीचं भान देणारा हा एक संदेशही सर्वत्र फिरत होता – डी फॉर डोनेट. गरजूंना कपडे, अन्नधान्य दान करा. आय फॉर इल्युमनेट. निसर्ग संरक्षणाची जाण तुमच्यात जागवा. डब्लू फॉर विश. जागतिक, राष्ट्रीय आणि स्वत:ची भरभराट व्हावी, शांतता व समाधान लाभावे यासाठी प्रार्थना करा. ए फॉर अव्हॉइड. फटाके, वीज, अन्न यांची नासाडी टाळा. प्रदूषण टाळा. एल फॉर लाइट. आध्यात्मिक तेजाने तुमचे आयुष्य उजळून टाका. आय फॉर इन्स्पायर. सौहार्द, बंधुभाव याची साक्ष म्हणून दिवाळी साजरी करण्यास सर्वांना उद्युक्त करा…
दिवाळीचा एक संदेश फारच सुंदर होता… चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती.
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे, मी देईन साथ…
हेच तर महत्त्वाचं असतं… ऐक्य, परस्परांना पाठबळ आणि अंधकार दूर करण्याची एकत्रित ताकद… ती तुम्हाला कायमच लाभावी याच शुभेच्छा!!
Monday, December 16, 2013
स्वत:ला कमी गुण देणारा लेखक अॅलिस्टेअर मॅक्लिन
‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ पुस्तक आधी वाचलं होतं की, चित्रपट आधी पाहिला ते आता आठवत नाही. त्या काळात, म्हणजे कॉलेजात पाऊल टाकल्यावर जे उंडारलेपण अंगात येतं, त्यानुसार बहुधा चित्रपट आधी पाहिला गेला असावा. चित्रपट अर्थातच भन्नाट होता. कथानक सशक्त वगैरे शब्दसंपत्तीचा परिचय झाला नव्हता तेव्हाची गोष्ट. काय सॉलिड स्टोरी आहे, जबरा.., एवढय़ावर आमची गाडी थांबायची. पण, याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट बनला आहे आणि अॅलिस्टेअर मॅक्लिन नावाच्या कुणा लेखकाने ही जबरदस्त कथा लिहिली आहे, याची माहिती जमा झाली होती. यथावकाश कादंबरीही हातात आली, वाचून झाली आणि मॅक्लिनने माझा ताबा घेतला. खरं तर ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ने ताबा घेतला असं म्हणायला हवं. कारण, नंतर त्याचं लगेचच अगदी प्रयत्नपूर्वक मिळवून वाचलेलं पुस्तक म्हणजे ‘फोर्स टेन फ्रॉम नेव्हरॉन. या दोन कादंबऱ्यांमध्ये दहा वर्षाचं अंतर आहे. या पुस्तकामुळे मी इतका प्रभावित झालो नव्हतो. ‘द गन्स ऑफ नेव्हरॉन’ ही मॅक्लिनची दुसरी कादंबरी. ‘एचएमएस युलिसेस’ ही पहिली. दुस-या महायुद्धाच्या कालखंडात समुद्रावर लढल्या गेलेल्या युद्धाचे सर्वाधिक वास्तवपूर्ण वर्णन असलेली कादंबरी म्हणून तिची आज कल्ट क्लासिकच्या प्रभावळीत गणना होते. युद्धावर अधिकारवाणीने बोलणे मॅक्लिनला सहज शक्य होते. कारण, १९४१ ते १९४६ या काळात तो नौसैनिक होता. मॅक्लिनचा जन्म १९२२चा. दुस-या महायुद्धाला तोंड फुटलं, तेव्हा तो विशीचा तरणाबांड युवक होता. त्या काळातील शिरस्त्यानुसार, मुलगा तरुण झाला की त्याचं पाऊल सरळ युद्धभूमीवरच पडायचं. अॅलिस्टेअरचं तेच झालं. तो इंग्लंडच्या शाही नौदलात नौसैनिक म्हणून दाखल झाला. पीएस बोर्नमाऊथ क्वीन या विमानविरोधी तोफा बसवलेल्या जहाजावर त्याची रवानगी झाली. इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या किनारपट्टी भागात ही नौका गस्त घालत असे. १९४३मध्ये एचएमएस रॉयेलिस्ट या युद्धनौकेवर सेवा बजावताना अटलांटिक महासागरातून ये-जा करणाऱ्या मालवाहू नौकांना सुरक्षा कवच पुरवण्याची जबाबदारी त्याच्या तुकडीवर होती. याच युद्धनौकेवरील सेवाकाळात त्यानं दक्षिण फ्रान्स, तिरपित्झ, नॉर्वेची किनारपट्टी, भूमध्य समुद्र, क्रिट आणि एजिअन तसेच अतिपूर्वेकडील बर्मा, मलाया आणि सुमात्रा या भागांमध्ये प्रत्यक्ष युद्धाचा, चकमकींचा भरपूर अनुभव घेतला. युद्धकाळातील थेट सहभाग आणि अनुभवांचा खजिना त्याला पुढे लेखक म्हणून उपयोगी आला. युद्धसमाप्तीनंतर ग्लासगो विद्यापीठात इंग्रजीचं अध्ययन करत असतानाच त्याने खर्चाची हातमिळवणी करण्यासाठी कथा लिहायला सुरुवात केली होती. बहुतेक कथा अर्थातच सागरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर असायच्या. याच वेळी १९५४मध्ये त्याने एक कथालेखन स्पर्धा जिंकली आणि कॉलिन्स प्रकाशन संस्थेचं त्याच्याकडे लक्ष गेलं. मॅक्लिननं एक कादंबरी लिहून द्यावी, असं त्यांनी सुचवल्यावर तो बैठक मारून बसला. त्याच्याजवळ अनुभवांच्या पोतडीत पुष्कळ अस्सल चिजा होत्या, त्यातून जी कादंबरी समोर आली तीच ‘एचएमएस युलिसेस’. बेस्टसेलर लेखक म्हणून मॅक्लिनची ओळख वाढू लागली. मॅक्लिन जरा विक्षिप्तच होता. आपल्या कादंबऱ्या कथानकामुळे खपतात, मॅक्लिन या नावामुळं नाही, हे सिद्ध करण्यासाठी त्यानं इयान स्टुअर्ट या टोपणनावानं दोन कादंबऱ्या लिहिल्या. त्याही तडाखेबंद खपल्या. १९६०मध्ये तो इतका लोकप्रिय होता, गाजत होता, पैशांच्या राशीत लोळत होता की, त्याला कर वाचवण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंडलडला मुक्काम ठोकावा लागला होता. मॅक्लिन हे जवळपास ब्रँडनेम बनलं असतानाच १९६३ ते १९६६ या कालखंडात लेखणी बाजूला ठेवून त्यानं इंग्लंडमध्ये दोन-तीन हॉटेलं सुरू केली होती. ती फार चालली नाहीत, हे चाहत्यांचं सुदैव. त्यामुळे तो पुन्हा लिखाणाकडे वळला आणि नव्या जोमानं लिहायला लागला. जेम्स बॉण्डचा लेखक इयान फ्लेमिंगही त्या वेळी जोरात होता. त्याच्या तुलनेत मॅक्लिन फारच क्लिन लिहायचा. सेक्स नाही, रोमान्स नाही. फक्त साहस आणि थरारक घटना. कथानकात बाकी भानगडी आणल्या तर मूळ कथा, त्यातला थरार बाजूला पडतो, त्यातली मजा उणावते, असं तो म्हणायचा. ते खरंच होतं. ‘एचएमएस युलिसेस’पासून फिअर इज द की, द गोल्डन रांदेहू, आइस स्टेशन झेब्रा, व्हेअर इगल्स डेअर (हो, हीपण त्याचीच अफलातून कादंबरी), पपेट ऑन अ चेन, द लास्ट फ्रंटियर, ब्रेकहर्ट पास, सँटोरिनी, व्हेन एट बेल्स टोल.. यापैकी त्याच्या कुठल्याही कादंबरीत प्रेम, शृंगार यांना फारसा थारा नाही. त्याचे कथानायक परिस्थितीशी, खलनायकांशी चिवटपणे झुंज देतात, टिकून राहतात, विजयी होतात. सर्वसामान्य वाचकांना हवा तो थरार, तात्पुरती का होईना पण जाणवणारी उमेद, प्रेरणा हे सारं त्याच्या कथानकातून, नायकाच्या संघर्षातून नेमकं व्यक्त व्हायचं. सागरी युद्धाचं तंत्र, युद्धकाळातील त्याचे प्रत्यक्ष अनुभव यांचं आकर्षक मिश्रण त्याच्या अनेक कादंबऱ्यांमधून आढळतं. २८ कादंबऱ्या, एक कथासंग्रह आणि चार पटकथा त्याच्या नावावर जमा आहेत. आणि यातील प्रत्येक कादंबरी बेस्टसेलर ठरली होती. त्याच्या एकूण १६ कादंबऱ्या आणि २ कथांवर चित्रपट बनवले गेले. त्यापैकी चार चित्रपटांच्या पटकथा तर त्यानेच लिहिल्या होत्या. हॉलिवुडमधील एका स्टुडिओने चित्रपटांच्या कथाकल्पना लिहिण्यासाठी १९८०मध्ये त्याला करारबद्ध केल्यावर, मॅक्लिनने ‘युनायटेड नेशन्स अॅण्टी-क्राइम ऑर्गनायझेशन’ (युनॅको) ही काल्पनिक संस्था कागदावर उतरवली. या संस्थेच्या कामगिरीबद्दल लिहिलेल्या त्याच्या दोन कथांवर चित्रपट (‘होस्टेज टॉवर’ आणि ‘डेथ ट्रेन’) बनवले गेले. ‘व्हेअर इगल्स डेअर’ त्याने लिहिला तो रिचर्ड बर्टनसाठी. (स्वित्झर्लंडलडला बर्टनच्या कबरीपासून जवळच मॅक्लिनही विसावला आहे) बर्टनला त्याच्या मुलासोबत पाहता येईल असा एक साहसपट बनवायचा होता. त्याने मॅक्लिनला सांगितल्यावर त्याने ‘व्हेअर इगल्स डेअर’ची पटकथा लिहायला घेतली आणि त्याच वेळी कादंबरीही सुरू केली. कादंबरी आणि पटकथेत खूप फरक आहे. रुपेरी पडद्यावर क्लिंटने घेतलेले सर्वाधिक बळी या चित्रपटात आहेत, असं म्हटलं जातं. ‘गन्स ऑफ नेव्हरॅन’ आणि ‘व्हेअर इगल्स डेअर’चं कथानक बरंचसं एकसारखं आहे. पण दोन्हीकडे मॅक्लिन फॉर्म्युला हीट झाला. मॅक्लिन सिद्धहस्त लेखक होता. पहिलीच कादंबरी बेस्टसेलर ठरल्यावरही जन्मजात मध्यमवर्गीय सावधपणामुळे त्यानं शिक्षकाची नोकरी लगेचच सोडली नाही. ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’नं त्याला अफाट लोकप्रियता मिळवून दिल्यावर, आता आपलं नाव चालतंय, अशी खात्री झाल्यावरच तो पूर्णवेळ लेखन करू लागला. या पुस्तकाच्या चार लाख प्रती पहिल्या सहा महिन्यांत खपल्यानंतर कुठे त्याने शिक्षकाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पहाटेच उठून टाइपरायटरची टकटक सुरू करायची ती दुपापर्यंत, अशी त्याची लिखाणाची पद्धत होती. कच्चा आराखडा, फेरफार, पुनर्लेखन, पुन्हा-पुन्हा सुधारणा, त्यानंतर फायनल ड्राफ्ट यातलं काहीच त्याला मान्य नसायचं. एकदा लिहिलेल्या कथानकात काहीही दुरुस्ती करायला तो नाखूश असायचा. एकदा त्याच्या कादंबरीत काही सुधारणा हव्यात, असं त्याला पटवायला प्रकाशकांनी त्याच्याकडे प्रतिनिधी पाठवला होता. तो माणूस स्वित्झर्लंडलडला मॅक्लिनकडे पोहोचण्यापूर्वीच त्या पुस्तकावरील चित्रपटाचे हक्क विकले गेले होते. अर्थातच पुनर्लेखन वगैरे काहीही न सुचवता प्रकाशकाचा माणूस इंग्लंडला परतला. ‘कादंबरीचा शेवट माझ्या डोक्यात फिट्ट होईतो मी पहिलं वाक्यही लिहीत नाही, मी एकदा लिहिलेलं पुन्हा वाचतही नाही. लिहून झालं की थेट प्रकाशकांकडे रवाना करतो’, असं तो सांगायचा. १९७०च्या दशकात दोन कोटी प्रती खपवणाऱ्या या लेखकाची राहणी इतका प्रचंड पैसा कमावूनही एकदम साधी होती. ते नैतिकतेला धरून नसल्याचं दडपण त्याच्यावर असायचं. १९८७मध्ये तो गेला तेव्हा स्वित्झर्लंडलडमधील एका फ्लॅटमध्ये राहत होता. डाळ-तांदूळ जे लागेल ते विकत आणायचं, स्वत:चं जेवण बनवायचं अशी त्याची दिनचर्या होती. अफाट प्रसिद्धी, लोकप्रियता मिळूनही मॅक्लिनला त्याचा गर्व नव्हता. ‘साहित्यविश्वातील मी एक साधा प्रवासी आहे. माझी वाटचाल ती काय, एका पुस्तकाकडून दुस-या पुस्तकाकडे धडपडत जातो. कधी तरी मी खचितच खूप चांगलं लिहीन अशी आशा मात्र मी सोडलेली नाही’, असं म्हणण्याइतका तो ‘डाऊन टू अर्थ’ होता. आजही त्याची पुस्तकं खपतात, पदपथांवर मांडलेल्या पसाऱ्यात मॅक्लिनच्या कादंबऱ्यांवर हमखास नजर खिळते. तेव्हा वाटतं, मॅक्लिननं लेखक म्हणून स्वत:ला फारच कमी गुण दिले होते! ंं
Sunday, September 22, 2013
पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन धम्माल पुन्हा पुन्हा..
‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’
चित्रपटमालिकेतील चित्रपट तुम्ही किती वेळा पाहिले आहेत? जॉनी डेपने या
चित्रपटांसाठी घेतलेला सागरी चाच्याचा अफलातून अतरंगी अवतार कॅप्टन जॅक
स्पॅरो आणि त्याच्या करामती कारवायांच्या मनोरंजक कथा प्रेक्षकांसमोर
आणणा-या या चित्रपटांबद्दल केवळ हाच प्रश्न विचारता येईल. कारण उघड आहे.
महाइब्लिस, महाअतरंगी असा कॅप्टन जॅक
स्पॅरो, त्याला साजेसे असे त्याचे बदमाश साथीदार, त्यांचे जहाज ब्लॅक पर्ल,
जॅकशी खुन्नस असणारा जेफ्री रशचा कॅप्टन बाबरेसा, खवळलेल्या समुद्राला
भेदून वर येणारे भुताळी जहाज ‘द फ्लाइंग डचमन’, या जहाजावरील अर्धमृत
खलाशी, भरसमुद्रात या चाच्यांच्या आणि ब्रिटिश आरमाराच्या ताफ्याशी होणा-या
चकमकी, चाच्यांनी दडवलेल्या खजिन्याच्या प्रचंड राशी.. वाढत्या वयातही
मनाच्या कुठल्या तरी कोप-यात खोडकर मुलासारखं दडून राहिलेल्या शैशवाला
भुलवणारं, साहसी, स्वप्नाळू भाववृत्तीला उत्तेजित करणारं, गुंगवून टाकणारं
असे हे कथानक. जॅक स्पॅरोच्या करामती मग डेड मॅन्स चेस्ट, अॅट वर्ल्डस्
एन्ड, ऑन स्ट्रेंजर टाइड्स या पुढच्या भागांमधून प्रेक्षकांसमोर आल्या आणि
हे सर्व चित्रपटही तितकेच चालले, गाजले. अपवाद म्हणावा तो चौथ्या भागाचा.
तो रॉब मार्शलने दिग्दर्शित केला होता. अनेकांना या संपूर्ण मालिकेतील हा
चित्रपट बराचसा बोअर, कंटाळवाणा वाटला आणि तो आलाही ब-याच उशिरा.
या चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी
ताटकळलेल्या चाहत्यांसाठी खूशखबर अशी की या चित्रपटमालिकेतील पुढचा म्हणजेच
पाचवा भाग ‘डेड मेन टेल नो टेल्स’च्या निर्मितीचे काम सुरू आहे.
‘कोन-टीकी’ चित्रपट बनवणा-या जोकीम रॉनिंग, एस्पेन सँडबर्ग या
दिग्दर्शकद्वयीकडे पाचव्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून ‘नाही-नाही’
म्हणणारा जॉनी डेप, ‘आता हा भाग शेवटचाच’ म्हणत पुन्हा जॅक स्पॅरोची
पायरेट हॅट डोक्यावर चढवून त्याचा इरसालपणा दाखवणार आहे. जॅक स्पॅरोच्या
अतरंगीपणासह इतर व्यक्तिरेखांचेही अंतरंग खुलवणारा पटकथाकार टेड एलियट या
नव्या कथानकासाठीही व्यक्तिरेखांना आकार-उकार देणार आहे. येथे जॅक आहे,
बाबरेसा आहे, चेटकिणी, भुतेखेते आहेत, जॅकसाठी नवी नायिका आहे आणि एक नवी
जोडीही आहे. बम्र्युडा त्रिकोणाच्या रहस्याचा पायरेट्स स्टाइल पर्दाफाशही
या नव्या कथानकातून होईल, अशी खबर आहे.एवढया सगळ्यासाठी २०१६ उजाडायची वाट
बघावी लागणार आहे. एवढेच काय ते पायरेट्स आणि जॉनी डेपच्या चाहत्यांचा
अपेक्षाभंग करणारे आहे.
Labels:
नाटक-सिनेमा
Friday, September 20, 2013
बाप्पा आम्हालाही आशा आहे..
This is what I felt aftr seeing the visarjan DHINGANA.. But there is still hope..
Please read
http://prahaar.in/shadow/135488
वेळ
रात्री बारा-एकची स्थळ- हिंदुजा रुग्णालयाचा परिसर, तो चौकच. नीरव शांतता
वगैरे काही नाही. मुंबई तशीही कधी झोपत नाहीच विसर्जनच्या बुधवारी तर
पाहायलाच नको..दणदणाट. कानठळ्या बसवणारे डीजे संगीत. हातगाडय़ा, टेम्पो,
ट्रक मिळेल त्या वाहनावर चढवलेली भल्याथोरल्या स्पीकरची दहीहंडी. गणपती
मिरवणूक चाललीय. कर्णकर्कश्श गाण्याबजावण्याचा गोंगाट ११० डेसीबल्सच्या
वर.. कपाळावर आठय़ा आणण्याची कोणाची हिंमत आहे? कोन रे तो, आमच्या सनाला
आडवा येतो, घ्या त्याला.. ए बजाव.. रुग्ण गेले खड्डय़ात, झोपू पाहणारे
रहिवासी गेले ढगात.. बजाव ढिंचॅक..
Please read
http://prahaar.in/shadow/135488
बुधवारचीच
गोष्ट.. बाप्पा घरी परत निघाले होते त्या वेळची. कर्णकर्कश्श गोंगाटात
घराच्या भिंतीच नव्हे माणसे आणि प्राणी-पक्षीही थरथरत होते.
या कानठळी संगीताच्या तालावर ‘धुंद’
कार्यकर्ते हातपाय उडवत होते, रासायनिक गुलाल उधळत होते. आणि याच
कर्णकर्कश्श गोंगाटात घराच्या भिंतीच नव्हे माणसे आणि प्राणी-पक्षीही थरथरत
होते. या गोंगाटाचा गलका, फटाक्यांच्या माळांचा कडकडाट असह्य झालेल्या
इथल्याच एका कुटुंबाने पाळलेल्या लारा नावाच्या कुत्रीने त्याचा धसका घेऊन
जीव सोडला.. हीदेखील विसर्जनाच्या बुधवारचीच गोष्ट..
००००
००००
स्थळ पुणे..
वेळ – विसर्जनाची म्हणजे दिवसभरातील कोणतीही
पुण्यातील विसर्जन सोहळा म्हणजे काय
शिस्त.. सगळं कसं पद्धतशीर, नियमाने, क्रमानुसार.. किती र्वष ऐकत आलोय
पुण्याची कीर्ती. तिथले मानाचे गणपती, तिथली लेझीम पथकं, ढोल पथकं, बँड,
रांगोळ्यांचे सडे.. सगळं ऐकून मनात अगदी अप्रूप दाटून आलेलं..
त्यात वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवरून
मंगळवारपासून पुण्यातल्या विसर्जन सोहळ्याचं पुराण सुरू होतं. गणपती
विसर्जनाचा थाट म्हणजे काय ते पाहायचं असेल तर पुण्यातच यायला हवं, असं एका
वाहिनीवरील युवा पत्रकार दिवसभर सांगत होती.
त्याच मुलीची फेसबुकवर पडलेली पोस्ट..
- ‘ढोल ताशे, बँड, रांगोळीच्या पायघडय़ा
आणि त्यावरून जाणारा लाडका गणपती बाप्पा.. सगळ्यांनी हमखास बघावा आणि
दाखवावा असा, असं मी दिवसभर सांगत होते. पण बुधवारी सकाळी विसर्जनाचा सोहळा
लाइव्ह करण्यासाठी अलका चौकात उभी होते.. तर स्पीकरच्या भिंतींमधून हजारो
बेभान तरुण मुलांच्या रिमिक्स डान्समधून वाट काढणारा गणपती पाहताना भडभडून
आलं.. या बिचा-या गोजिरवाण्या गणपतीचे कान किटवूनच त्याला परत पाठवायचं
ठरवलं होतं की काय कुणास ठाऊक? एवढं सगळं सोसून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर
येतो म्हणजे बाप्पाचं मन पण खूपच मोठं असलं पाहिजे..’
०००००
०००००
पुण्यात यंदा या स्पीकरच्या गोंगाटामुळे
थोडा वाद झाला म्हणतात. मिरवणुकीच्या बदलत्या स्वरूपाला काहींनी आक्षेप
घेतला. मुंबईत मात्र एकमत आहे. फुल टू धमाल करायची याबद्दल. डीजे लावून,
वाट्टेल ती गाणी कितीही वेळ वाजवून, धांगडधिंगा करून दररोज आवाजी
प्रदूषणाचा विक्रम नव्याने प्रस्थापित करायचा याविषयी बहुतेक सगळ्याच
मंडळांची ठाम एकी आहे. जे अल्पमतात ते मंडपाबाहेर.. बसा म्हणावं घरात..
०००००००००
०००००००००
स्थळ – ठाणे पूर्व. कोपरी अष्टविनायक चौकातील विसर्जन घाट..
चौक संपूर्ण गर्दीने फुललेला.. आकाशात
रोषणाईच्या फटाक्यांमधून सप्तरंगी प्रकाशफुलांची उधळण. मुलींची लेझीम,
बँडपथकांचं तालबद्ध संगीत. विसर्जन घाटावर निर्माल्य कलश. स्वयंसेवी संस्था
आणि दानशूर व्यक्तींकडून येणारे भाविक, बंदोबस्तासाठी असलेले पोलिस आणि
इतर यंत्रणांचे कर्मचारी यांना नाश्ता, जेवण याची व्यवस्था. दृष्ट लागेल
असं कोपरीच्या घाटावरील व्यवस्थापन पाहून चौकाकडे वळलो तर हात कानावर गेले.
नेहमीच एकमेकांशी स्पर्धा करणा-या मनसे
आणि शिवसेनेने शेजारी-शेजारी उभारलेल्या मंचावरून गणेशभक्तांना शुभेच्छा
देण्याचा कानठळी गोंगाट भल्याथोरल्या स्पीकरची दहीहंडी रचून सुरू ठेवला
होता. ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादांचं उल्लंघन करून बोंबलणं सुरू
होतं. लाज, खंत, खेद सारं सारं मनात अनिवार झाले..
०००००
०००००
‘व्हॉट्स अॅप’वर एक विनोद फिरतोय..
विसर्जन झालं आणि गणपती कैलास पर्वतावर
घरी पोहोचले.. पार्वती मातेने मायेने विचारलं, काय कशी झाली ट्रीप..
पृथ्वीवर दहा दिवस धमाल केली ना, मोदक लाडू जोरात ना.
बाप्पा बोलले – मुझपे एक एहसान करना, की मुझपे कुछ भी एहसान न करना.
पार्वती – अरे हे काय बोलतो आहेस??
गणपती – लुंगी डान्स लुंगी डान्स..
रिद्धी-सिद्धी – देवा, अरे काय हे???
गणपती – १२ महिनेमे १२ तरीकेसे
ढिंका चिका ढिंका चिका रे एएए
महादेव – आईशप्पथ.. हल्ली मुलांना कुठे पाठवायची सोयच नाही राहिली..
००००००००
००००००००
याला विनोद कशाला म्हणायचं, हे भीषण
वास्तव आहे. महादेवा, काय चुकलं रे बाप्पांचं? पृथ्वीवर दिवसरात्र हीच
गाणी, हाच धिंगाणा ऐकलाय त्यांनी. आणखी काही दिवस तरी हाच इफेक्ट राहील
त्यांच्यावर.
गणपतीबाप्पांचे हात मोदकलाडू, परशू,
आशीर्वाद देण्यात गुंतलेले असतात म्हणून बरे, नाही तर बाप्पांनी या
गाण्यांपासून सुटका मिळावी म्हणून खचितच त्यांचे कान या हातांनी झाकून
घेतले असते.
त्याचं मन खूपच मोठं आहे.. म्हणूनच तो ही
सगळी थेरं खपवून घेतो.. ठाकूरद्वारला मिरवणूकीत तृतीयपथीयांच्या जोडीने
बिभत्स हावभाव करत नाचणारी उन्मादी टोळकी, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी
तासन् तास ताटकळणा-या महिलांच्या अंगचटीला जाणा-या, भाविकांची मानगूट पकडून
त्यांना हिसडणा-या मुजोर कार्यकर्त्यांचं त्यामुळेच तर फावतं.
पर्यावरणाची नासाडी, तलावांची, खाडय़ांची,
समुद्राची, जलचर सृष्टीची वाताहात दरवर्षी नित्यनेमाने होत राहते आणि
तरीही बाप्पा सगळे अपराध पोटात घालतात.. आज नाही उद्या, पुढच्या वर्षी तरी
माणूस नावाचा प्राणी सुधारेल अशी त्याला आशा आहे.
आपल्या परीने पर्यावरणाचा तोल सांभाळू
पाहणा-या, शाडू मातीची मूर्ती आणणा-या, ध्वनिप्रदूषणाला हातभार न लावणा-या,
घरच्या घरी पाण्याच्या टाकीत विसर्जन करण्याचा आगळा पायंडा पाडणा-या
अल्पमतातील काहीशेंनाही तीच आशा आहे देवा!
Labels:
निमित्ताने
Friday, August 30, 2013
बाईच्या जन्माला आली तू.. तिथंच घात झालाय..
काय सांगू बाई तुले.
बाईच्या जन्माला आली तू.
तिथंच घात झालाय.
कुणाकुणापासून वाचवू तुले
किती कुंपणं न् किती भिंती
अन् कुठल्या कणगीत झाकू तुला.
घरातला काळोखही असतो हल्ली आसक्त
बाहेरच्या अंधारालाही असतात नख्या
आणि उजेडात तर तुझ्या प्रत्येक देहरंध्राला
टोचायला सज्ज हजारो सुया.
कितीही झाकली काया
हैवानांना नसते दया
हेच असतं खरं.
काहीच होणार नाही
निषेधफे-या आणि निदर्शनांच्या धडका मारून
ही वस्ती कधीच मेलीय
तरारलेल्या श्वापदांचा उन्मादी थयथयाट
आणि सगळी दारे बंद
बाईच्या जन्माला आली तू.
तिथंच घात झालाय.
कुणाकुणापासून वाचवू तुले
किती कुंपणं न् किती भिंती
अन् कुठल्या कणगीत झाकू तुला.
घरातला काळोखही असतो हल्ली आसक्त
बाहेरच्या अंधारालाही असतात नख्या
आणि उजेडात तर तुझ्या प्रत्येक देहरंध्राला
टोचायला सज्ज हजारो सुया.
कितीही झाकली काया
हैवानांना नसते दया
हेच असतं खरं.
काहीच होणार नाही
निषेधफे-या आणि निदर्शनांच्या धडका मारून
ही वस्ती कधीच मेलीय
तरारलेल्या श्वापदांचा उन्मादी थयथयाट
आणि सगळी दारे बंद
Labels:
निमित्ताने
Monday, September 12, 2011
रिक्षाचालकांचे राज्य
ठाण्यातील मुजोर, उद्दाम रिक्षाचालकांनी बुधवारी एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली. ठाण्यातील रिक्षावाले म्हटल्यावर ते मुजोर, उद्दाम असणारच हे आता वेगळे सांगण्याची गरज राहिलेली नाही. ठाण्यात कोणत्याही रिक्षा-स्टॅण्डवर वा रस्त्यात अध्येमध्ये वाट अडवून, कोप-यावर दात कोरत, विडी फुंकत, गुटख्याच्या पिचका-या मारत टवाळकी करत उभ्या असलेल्या रिक्षाचालकांना एखाद्या ठिकाणी नेणार का, असे विचारण्याचा अविचार ज्यांनी केला आहे त्या सगळ्यांना या उर्मटपणाची शाब्दिक चपराक केव्हा ना केव्हा तरी बसलेली आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांनी भाडे नाकारणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. पण, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील रिक्षावाल्यांना कायद्यापासून, कारवाईपासून जणू अभय मिळाले आहे. ठाण्यात तर कायद्याचे नव्हे, रिक्षाचालकांचे राज्य आहे. ते म्हणतील तोच कायदा अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच समोरचा प्रवासी ज्येष्ठ नागरिक आहे की एखादी अवघडलेली महिला आहे की बाहेगावाहून मुलाबाळांसह आलेले नवखे कुटुंब आहे, याची दखल घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. रिक्षा स्टॅण्डवर रांगेत लावलेली असो वा रस्त्यात उभी असो, ‘नही जाने का’, असे झटकून टाकण्याची मुजोरी ही मंडळी सर्रास दाखवतात. भाडे नाकारणे हा त्यांना मुळी गुन्हा वाटतच नाही. जिवाचा संताप झाला तरी अपमान गिळून प्रवाशांना नाईलाजाने दुस-या रिक्षाचालकाची मनधरणी करावी लागते. अशावेळी वाहतूक पोलिस नेमके ‘बेपत्ता’ असतात. इंदिरानगरच्या नाक्यावर रिक्षाचालकांच्या याच उर्मटपणामुळे संतप्त झालेल्या दुर्योधन कदम यांनी या रिक्षाचालकांना दोन शब्द सुनावले आणि उर्मटपणा हा जन्मसिद्ध अधिकार मानणा-या रिक्षाचालकांनी कदम यांच्या वयाचेही भान न ठेवता त्यांना मारहाण केली. या मारहाणीत कदम यांनी जीव गमावला असला तरी राज्य रिक्षाचालकांचेच असल्यामुळे या संतापजनक घटनेबद्दल, राजकारणी चमकेश मंडळी वा रिक्षा संघटनांचे आश्रयदाते राजकीय पक्ष यांच्यापैकी कुणीही निषेधाचा चकार शब्दही उच्चारलेला नाही. गणेशोत्सवातील कर्णकटू गदारोळ, वाटमारी आणि वीजचोरी करून केलेला लखलखाट मिरवण्यात मग्न पुढा-यांना रिक्षाचालकांच्या या झुंडशाहीला फटकारण्यासाठी वेळ नाही. वाहतूक पोलिसही ‘प्रवाशांनी आमच्याकडे तक्रार करावी, तक्रार आल्यावर आम्ही कारवाई करतोच’, हे नेहमीचे पालुपद आळवत आहेत. एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेल्याबद्दल ठाण्यातील रिक्षा संघटनांना आत्मक्लेश होणे याची अपेक्षा करणे हाही कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणा-या सर्वसामान्यांच्या भाबडेपणाचा कळस ठरावा असेच हे भीषण चित्र आहे.
Labels:
specials
Thursday, June 23, 2011
‘अर्थ’ उघड आहे..
कल्याण-डोंबिवली पालिकेतील निलंबित लाचखोर कार्यकारी अभियंता सुनील जोशी याला पुन्हा कामावर घेण्याचा ठराव महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती मागल्या दाराने मंजूर करवून घेते यामागील ‘अर्थ’ न समजण्याइतके मतदार खुळे नाहीत. जोशीची विभागीय चौकशी पूर्ण करण्यात यावी, तसेच त्याच्या खटल्याचा निर्णय लागेपर्यंत त्याला कामावर हजर करू नये, असा ठराव यापूर्वीच पालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या महासभेत मंजूर झाला असताना अचानक हा ठराव मंजूर करण्यात आला हे विशेष. प्रसारमाध्यमांतून आणि विरोधी पक्षांकडून या ठरावावर टीकेची झोड उठल्यानंतरही हा ठराव करण्यात काहीही वावगे केलेले नाही, असा निगरगट्ट खुलासा महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनी केला. जोशी याला घरबसल्या पन्नास हजार रुपये वेतन दिले जात आहे, त्याच्याकडून त्या पैशांचे ‘काम’ करून घ्यावे, या उदात्त हेतूने हा ठराव युतीने मंजूर केला होता म्हणे! जनतेच्या पैशाची नासाडी टाळण्याची यांची आंच एवढी मोठी की ‘रिमोट कंट्रोल’ने चालणा-या शिवसेनेच्या वरिष्ठांना अंधारात ठेवून हे सत्कार्य तडीस नेण्यात आले, असाही हास्यास्पद दावा युतीने केला आहे. शनिवारी महासभा संपतेवेळी कार्यपटलावर नसलेला ठराव एका अपक्ष नगरसेवकाकडून आयत्यावेळी मांडण्यात येतो आणि युतीचे सदस्य कोणतीही चर्चा घडवून न आणता तो तात्काळ मंजूर करतात, महापौरबाई लगेचच राष्ट्रगीत सुरू करण्याचा आदेश देऊन महासभा गुंडाळतात, या सगळ्या घडामोडींतून दिसणारी युतीची जनहिताची कळकळ आपण समजून घेतली पाहिजे. जनतेमध्ये लाचखोर जोशीबद्दल आणि त्याची निर्लज्ज वकिली करणा-यांबद्दल किती प्रचंड रोष आहे, हे लक्षात आल्यावर वरिष्ठ नेत्यांनी कानावर हात ठेवून स्थानिक सुभेदारांचे कान उपटण्याचे नाटक रंगविले. अगदी जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेच्या नगरसेवकांची ‘खरडपट्टी’ काढण्याचे आव आणला. खरोखरीच वरिष्ठांना विश्वासात न घेता हा व्यवहार झाला असता, तर आतापर्यंत महापौर, सभागृह नेते, जिल्हाप्रमुख यांचे राजीनामे घेतले गेले असते. ते तसे घेतले गेले नाहीत याचा अर्थ उघड आहे. या एकाच प्रकरणात युतीच्या ‘स्वच्छ’ कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत असे नाही; यापूर्वीही सुरेश पवारांसारख्या भ्रष्ट अधिका-याला याच मंडळींनी ‘पावन’ करून घेतले आहे. निलंबनाची कारवाईही महापौरांनीच रोखली आहे. मनसेनेही शहरात महापौरांचा राजीनामा मागणारे फलक लावून सचोटीचे प्रदर्शन केले आहे. मात्र, भ्रष्टाचाराचा वटवृक्ष रुजवणा-या युतीला पालिकेत सत्तेवर आणण्याचे पातक त्यांच्याच माथी आहे, हे मतदार विसरणार नाहीत.
Labels:
specials
Monday, June 20, 2011
थेंबांचे इवलाले मोती तळहातावर झेलून घ्यावे...
पावसाबद्दल प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूरने लिहिलंय -
बहकीसी बारीशने फिर
यादोंकी गठरी खुलवायी
मीलें चन्द लम्हें घायल
और ढेर सारी रुसवाई...
आणि त्याच्याच एका कवितेत तो म्हणतोय -
झरे मेघ आभाळी तेव्हा
भान हरपुनी चिंब भिजावे
थेंबांचे इवलाले मोती
तळहातावर झेलून घ्यावे...
गुरू लिहितो अगदी आपल्या मनातलं सांगितल्यासारखं पण, तुम्ही खरं सांगा पायाला चाकं लावलेल्या तुम्हा-आम्हा मुंबईकरांना वेळ आहे का हो असं कुणाच्या आठवणींनी घनव्याकूळ व्हायला? सिमेंटच्या जंगलात सरसर उतरणाऱया पाऊसथेंबांचं स्वागत करायला क्षणभर थांबायला? `थांबला तो संपला' ही उक्ती मुंबईच्या पावसात `थांबला तो भिजला' अशी बदलते हे प्रत्येक मुंबईकरासाठी स्वानुभवाचे बोल आहेत. भरधाव वाहनांमुळे रस्त्यांवर नव्हे खड्डय़ांत साचलेल्या चिखलपाण्याच्या पिचकारीने ज्याला वा जिला शर्ट, स्कर्ट, पाटलोण, साडी अशा कुठल्याही वस्त्रावर हुसैनी डिझाइन चितारून घ्यायचंय त्याने असं मध्येच पावसासाठी थांबण्याची हिंमत करावी. मुरब्बी मुंबईकर कुठेच थांबत नाही. सोसाटय़ाचा वारा आणि तुफान पावसाला कसाबसा इवल्याशा छत्रीने सामोरा जाता जाता तो ओलाचिंब झालेला असतोच. पावसाला भेटायला तो थांबला नाही तरी पाऊस त्याला येऊन कडकडून भेटतोच. घाटात, गडकिल्ल्यांकडे जाणाऱया अनवट रानवाटांवर भेटणारा झिम्माड, तुफान, बेफाम, आडवातिडवा झोडपणारा पाऊस याच सगळ्या रूपांमध्ये इथल्या इथे मुंबईतही आपली गाठभेट घेतो. खऱया मुंबईकराला हे माहिती असतं.
यामुळेच, अडलेले रस्ते, वाहतुकीची कोंडी, लोकलमधील रखडपट्टी, फलाटांवरची अफाट गर्दी, दुकानांच्या पत्र्यांवरून ओघळणाऱया पागोळ्यांचा अभिषेक, रस्ता, खड्डे व्यापून चारीठाव वाहणारे चिखलपाणी कशाकशाने मुंबईकरांची पावले थांबत नाहीत, अडखळत नाहीत. नेमेची येणाऱया पावसाबरोबर ठरलेल्या अडचणीही दरवर्षी येणारच हे सर्वसामान्य मुंबईकरांनी आता गृहितच धरलंय. यामुळेच कितीही लटकंती झाली तरीही रस्त्याकडेला लागलेल्या गाडीवरील गरमागरम भजी आणि आलं घातलेली झकास कडक कटिंग चाय त्याला क्षणार्धात फ्रेश करते अन् मुंबई मस्त पाऊस अंगावर घेत चालत राहते!
छायाचित्रे - अतुल मळेकर, संदेश घोसाळकर
Thursday, June 16, 2011
‘स्पेशलवाला’
जे. डे गेल्यावर अनेकांनी त्याच्यावर लिहिलं, अगदी त्याच्या बातम्या नाकारणा-या वरिष्ठांनी आणि त्याला माणुसघाणा समजणा-या त्याच्या सहका-यानीही. मला डे आठवतो तो मितभाषी, आमच्या लालबागच्या कँटिनमध्ये एका बाजूला बहुतेकवेळा एकटाच बसून कडक चहाचे घुटके घेणारा. ओळख असूनही त्याला ‘हाय’ केलं तरच तो हात वर करून प्रतिसाद द्यायचा, हलकेच मान हलवायचा.. हे जवळपास दररोज घडायचं. डे ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये दाखल झाला तेव्हा ‘लोकसत्ता’त स्थिरावून मला काही वर्षे उलटली होती. काही अपवाद वगळता ‘एक्सप्रेस’च्या पत्रकारांनी ‘लोकसत्ता’ला गिनतीत धरायचं नाही आणि ‘लोकसत्ता’च्या मंडळींनीही त्यांना नजरेआड करायचं, असं अदृश्य कुंपण आमच्यात असायचं. कारण काहीच नव्हतं, पण असं जाणवत राहायचं. रिपोर्टर मंडळींच्या बाबतीत या कुंपणाला अपवाद करणारी मंडळी दोन्हीकडे होती. एखाद्या बातमीसाठी एक्स्प्रेसच्या रिपोर्टिग डेस्कवरून लोकसत्ताचा फोन वाजायचा, एखादी बातमी आणून दिली जायची, एखादी बातमी कन्फर्म केली जायची, इनपुट घेतले-दिले जायचे.. हेही रोजचंच होतं. डे या मंडळींपैकी एक होता. गुन्हे वार्तांकनाबाबत लोकसत्ता म्हणजे राम पवार आणि एक्स्प्रेसला डे यांच्याशिवाय पर्याय नव्हता. या दोघांमध्ये चांगलं सहकार्य असायचं. लालबाग कार्यालयाच्या आवारात कधीतरी दुपारी गप्पाटप्पा सुरू असताना, उंचापुरा, ब-यापैकी दणकट शरीरयष्टीचा, थोडासा वाकून चालणारा डे छोटय़ाशा गेटमधून आत शिरायचा. मोटारसायकल आणि डे असं एक समीकरण आमच्या मनात फिट्ट होतं. बहुतेकदा नीट इन केलेला बारीक चौकटींचा हाफ शर्ट, कधी जीन्स तर कधी पँट असा डे एखाद्या साध्या वेशातील पोलिसासारखा ‘स्पेशलवाला’ दिसायचा, वावरायचा. सतत बीटवर असल्यासारखंच त्याचं वागणं असायचं. त्या पाच-सहा वर्षाच्या कालखंडात मी कधीच एक्स्प्रेसच्या इतर रिपोर्टर मंडळींच्या कोंडाळ्यात गप्पा हाणतांना, खळखळून हसताना पाहिला नाही. कँटिनमध्येही एका बाजूला बसलेल्या डेला ‘आज कुछ है क्या..’, असं विचारल्यावर तो फार काही सांगायचा नाही. तरीही काही वेळा त्याने ‘लोकसत्ता’ला बातम्यांची कॉपी दिली होती. त्या काळात ‘जे. डे’ ही बायलाइन एक्स्प्रेसच्या पानांचा अविभाज्य भाग असायची. कालांतराने ‘एक्स्प्रेस’ची साथ सोडून तो ‘हिंदुस्तान टाइम्स’कडे गेला. आता तर तो सगळचं सोडून गेलाय..
Labels:
specials
पोलिस यंत्रणेमुळेच जे. डेंचा बळी
...गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, ही राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलेली नेहमीची पोपटपंची आणि ‘..जे. डे यांच्या मारेक-यांना पकडले जाईल इतकेच नव्हे तर त्यांच्या हत्येचा कट रचणा-यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल’, हे मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांचे वक्तव्य, या सगळ्याला आता पाच दिवस उलटून गेलेत. पोलिसांनी जारी केलेली मारेक-यांची रेखाचित्रे वगळता अन्य कुठलाही धागादोरा त्यांच्या हाती लागलेला नाही. तपास थांबल्यागत झालाय. थांबलेले नाहीत ते फक्त जेंच्या आईच्या, बहिणीच्या आणि पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू. आता तर डे यांच्या हत्येमागे पोलिस अधिकारीच असल्याचे उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.
पोलिसांवरंच प्रेशर वाढत चाललं तसं कुणातरी तिघांना पकडून हजर केलं गेलं. आणि लगेच रात्री सोडूनही दिलं. पोलिस या करामती नेहमीचकरत असतात. पण यामुळे पोलिस या हत्येबाबत मारेकर्यांचा शोध घ्यायला खरोखरीच कितपत सीरीयस आहेत हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तेल तस्करी, टोळीयुद्ध, मटका, रिअल इस्टेटकडे नजर वळलेल्या बडय़ा डॉन मंडळींची मोठमोठय़ा गृहनिर्माण प्रकल्पांतील भागीदारी आणि एसआरएतील गुंतवणूक, खंडणीखोर गुंड, मुंबईवर राज्य करण्यासाठी अंडरवर्ल्डमध्ये सतत सुरू असलेली चढाओढ, परदेशातील गुंडांच्या संपर्कात, पे रोलवर असणारे भ्रष्ट पोलिस अधिकारी, गुंडपुंडांचे आश्रयदाते राजकारणी यांच्यातील साटेलोटे.. या सगळ्याबद्दल जे बिनधास्त लिहायचा, त्याचं नेटवर्क जबरदस्त होतं, पोलिस खात्यात, अंडरवर्ल्डमध्ये, खब-यांच्या दुनियेत त्याला माहिती उपलब्ध व्हायची. त्याच्या या तपशीलवार पर्दाफाशमुळे पोलिसांना कारवाई करणे, हातपाय हलवणे भाग पडायचे. त्याच्या या लिखाणामुळे अनेकांची मोठी हानी झाली होती, अनेकांच्या काळ्या कारवाया उजेडात आल्या होत्या. त्यात गुंड होते, टोळ्या पोसणारे राजकारणी होते, तेल तस्कर होते आणि दुखावले गेलेले काही भ्रष्ट पोलिस अधिकारीही होते. अनेकांच्या मागावर असलेला जे आणखी काही धक्कादायक भांडाफोड करण्याच्या तयारीत होता. यापैकी कुणीतरी त्याला मार्गातून दूर केला असण्याची शक्यता आहे.
या सर्वापेक्षा जे डेंच्या हत्येला जबाबदार आहे, ती निष्क्रिय पोलिस यंत्रणा. डिझेल माफिया, मटका किंग, खंडणीखोर गुंड, परदेशात लपून बसलेल्या गुन्हेगारांच्या सांगण्यानुसार इथे कुणावरही बंदूक रोखणारे, जीव घेणारे छोटे-मोठे शूटर, गुंडांना पोसणारे बिल्डर यापैकी कुणावरही कठोर कारवाई न करणाऱ्या मुंबई पोलिसांना जणू त्यांच्या ब्रीदवाक्याचा विसर पडला आहे. एकेकाळी अवघ्या अंडरवर्ल्डला जरब बसवणारे मुंबई पोलिस अवसान गळाल्यागत थंड पडले आहेत, हेच नेमके जेला खूपत होते. मुंबईला ग्रासणारा हा कॅन्सर पोलिसांना दिसत कसा नाही? या त्वेषात त्याने अनेक गोष्टी उघड केल्या, गुंडांना आणि त्यांना पाठीशी घालणा-या भ्रष्ट अधिका-यांना उघडे पाडले, त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा केले, बातम्या दिल्या. मुंबई शांत आहे, कुठे काय भानगडी सुरू आहेत.. अशा अविर्भावात डोळे मिटून बसलेल्या पोलिसांना त्याच्या तपशीलवार, पुराव्यानिशी दिलेल्या बातम्यांमुळे कारवाई करणे भाग पडले होते. त्याच्या या लिखाणामुळे तेलमाफियांचे प्रचंड नुकसान झाले होते, रियल इस्टेटमध्ये जम बसवू पाहणा-या अनेकांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात आले होते. या सगळ्यांना तो काटय़ासारखा सलू लागला होता. साम, दाम यापैकी कशालाही जे भीक घालत नसल्यामुळे त्याची लेखणी कायमची थांबवणे हाच एक पर्याय या मंडळींसमोर होता. यामुळेच जे मारला गेला. पत्रकार, छायाचित्रकारांवर लाठय़ाकाठय़ा चालवणाऱ्या मुंबई पोलिसांनी आधीच गुंडपुंडांना जरब बसवली असती, संघटित गुन्हेगारीचा, खंडणीखोर टोळ्यांचा बिमोड केला असता, तर जेला या भ्रष्ट यंत्रणेला इतके भिडायची गरज पडली नसती, त्याचा जीव तरी वाचला असता..
पत्रकारांनी लिहायचे आणि मगच पोलिसांनी हलायचे, असे दिवस आले असतील तर कठीण आहे. भ्रष्ट पोलिस, स्वार्थी राजकारणी आणि गुंड टोळ्यांचा ऑक्टोपस मुंबई कणाकणाने गिळतो आहे. छोटय़ा-मोठय़ा गुन्ह्यांतील आरोपींपासून अगदी संघटित टोळ्यांपर्यंत कुणावरही कारवाई करण्याची इच्छाशक्ती न दाखवणारी निष्क्रिय पोलिस यंत्रणा याचीच पुष्टी देत आहे. पोलिस आणि राजकारण्यांपर्यंत सगळेच भ्रष्ट आहेत, असा सरसकट शेरा मारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नसले तरी हे खरे असावे, असे वाटण्याइतकी जखम चिघळली आहे. आणि ‘विरुद्ध’ चित्रपटात अमिताभने साकारलेल्या असहाय्य बापासारखाच सर्वसामान्य मुंबईकरांचा चेहरा केविलवाणा दिसू लागला आहे.
Labels:
specials
Sunday, May 8, 2011
पनवेलची बुभुक्षित `श्वापदे'
पनवेलच्या कल्याणी आश्रमात निराधार, भिन्नमती मुलींच्या आयुष्याशी जे काही अकल्याण चालले होते ते एसीपी रश्मी करंदीकर यांच्या पथकाने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर उघडकीस आणले, दहाजणांना अटक झाली, संभवित विकृतांनी चालवलेले पशूपेक्षाही हीन वर्तन एेकून वाचून मनात संतापाचा लाव्हा खदखदत होता. तेव्हा उमटलेले हे शब्द...
पनवेलच्या कल्याणी महिला आणि बालक सेवा संस्थेत भिन्नमती, अपंग, असहाय्य मुलींचा जो लैंगिक छळ सुरू होता तो पाहता या मुलींशी असे घृणास्पद दुर्वर्तन करणा-या संस्थाचालकांची आणि अशा कथित संभवितांची संभावना मानवी कातडे पांघरलेली बुभुक्षित श्वापदे म्हणूनच करावी लागेल. नीटसे बोलूही न शकणा-या, वाढते वय, वासनांध नजरा या कशाचीही जाण नसणा-या 19 अश्राप मुलींबरोबर गेली अनेक वर्षे या वासनासक्त मंडळींनी चालवलेल्या विकृत चाळ्यांचे पाढे एसीपी रश्मी करंदीकर यांच्या पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाचण्यात आले आहेत. लैंगिक छळाला विरोध करणा-या मुलींच्या हाता-पायांवर, नाजूक भागाजवळ सिगारेटचे चटके, तापत्या पळीचे, सळईचे डाग, शय्यासोबतीस नकार देणा-या मुलींना मारहाण, गळा दाबून मारण्याचे प्रयत्न, दोर रुतून जखमा होतील इतके घट्ट बांधून ठेवणे अशा भयानक यातना या मुली सहन करत होत्या. संस्थेत यायचे, पाहिजे ती मुलगी निवडून गच्चीवर न्यायची आणि तिचा उपभोग घ्यायचा, विरोध करणा-या मुलींना चटके द्यायचे, मारहाण करायची, बेल्टने झोडपून काढायचे, त्यांचा दुबळा प्रतिकार मोडून काढण्यासाठी त्यांना जबरदस्तीने दारू पाजायची, असे उन्मादी थैमान संस्थेत सुरू होते आणि संस्थाचालक रामचंद्र करंजुले याचीही त्यांना साथ होती. रामचंद्र, त्याची पत्नी सुरेखा, मुलगी कल्याणी, स्थानिक वार्ताहर असलेला त्याचा पुतण्या नानाभाऊ करंजुले, संस्थेतील दोन आया यांच्यासह एकूण दहाजणांवर हे आरोपपत्र दाखल केले गेले आहे. समाजातील जागल्या म्हणून ज्याने खरे तर अशा गुन्हेगारांचे बुरखे ‘लोकमता’समोर टराटर फाडायला हवे होते अशा या नानाचाही या अत्याचारांमध्ये सहभाग होता. राज्याच्या अनेक भागांतील आश्रमशाळा, महिला आश्रम येथील निराधार मुले-मुली याच प्रकारच्या शोषणाला सामोरे जात असतात. शहापूर तालुक्यातील कवडास येथील आश्रमशाळेतील मुलामुलींवर असेच अत्याचार झाल्याचे यापूर्वी उजेडात आले होते. आश्रमशाळा, बालकल्याण व महिला संस्थांमधील या गैरप्रकारांकडे काणाडोळा करणा-या संबंधित यंत्रणांच्या धृतराष्ट्रीय पवित्र्यामुळे अशा मुखंडांचे आजवर फावत आले आहे. यापैकी अनेक प्रकरणांमधील आरोपी उजळ माथ्याने फिरत असताना या शोषितांच्या बाजूने लढण्यासाठी कुणीही नाही ही शोकांतिका आहे. बलात्कारी व्यक्तींचे खच्चीकरण करण्याची सूचना मध्यंतरी दिल्लीतील एका महिला न्यायाधीशांनी केली होती. असहाय्य मुलामुलींवर लैंगिक अत्याचार करून उजळ माथ्याने फिरू धजावणा-या अशा मानवी श्वापदांसाठी खरे तर यापेक्षाही कठोर शिक्षेची गरज आहे!
Labels:
specials
Tuesday, May 3, 2011
ओसामा संपला, आपल्यातील दहशतवादी कधी संपणार?
ओसामा बिन लादेन मारला गेल्यामुळे दहशतवाद आणि दहाशतवादी कमकुवत झाले असतील, असे समजणारे भोळेभाबडे काही बिचारे भ्रमात आहेत असे म्हणावे लागेल. ओसामा ही अमेरिकसाठी पर्सनल स्कोर सेटलमेंट होती. अमेरिकेला दणका देणार्या दहशतवादी संघटनेचा तो म्होरक्या होता, त्याला मारून अमेरिकेने हिशेब चुकता केलाय. त्यामुळे दहशतवाद संपलेला नाही आणि संपणारही नाही. ओसामाला अमेरिकेने संपवले असले तरी दहशतवाद त्याच्यापुरता मर्यादीत नाही. आपल्या मनामध्ये दडलेल्या अतिरेकी विकारांचे काय? एखाद्या दहशतवादी घटनेनंतर उफाळून येणार्या विखारी भावनांचे प्रदर्शन होते तेव्हा नेमके काय घडत असते? आपल्यातील दहशतवादी कधी संपणार? अशा अनेक प्रश्नांची वावटळ माझ्या मनात भिरभिरत आहे. मला तर वाटतं, जोपर्यंत आपल्या अवतीभवती धर्मांधतेच्या भिंती आहेत, जातीयतेच्या घुसमटवणार्या विषवल्ली घुसमट करत आहेत, मनामनांवर याच द्वेषमूलक विचारांचा पगडा आहे, वेगळ्या जातीच्या, वेगळ्या धर्माच्या, वेगळ्या आर्थिक-सामाजिक स्तरांवरील लोकांविषयी काहीही कारण नसताना द्वेषभावना आहे तोपर्यंत आपल्यातही एक दहशतवादी दडलेला आहे.
तुम्ही लक्षात घ्या - एखादी घटना घडली की आपल्यापैकी बहुतेकजण कळत-नकळत आरोपी व्यक्तीची जात, धर्म विचारात घेतात आणि त्यानुसार, ज्याच्या-त्याच्या मनातील पूर्वग्रहानुसार मग त्यापुढील प्रतिक्रिया उमटते... अन्यधर्मीय व्यक्ती असेल तर मनात उगाचच त्या धर्माच्या सर्वांविषयी अनुदार, खरं तर तिरस्करणीय अशी खुन्नस दाटून येते. आपल्याच धर्माचा, कुंपणातील कुणी असेल तर है शाब्बाश, चांगला धडा मिळेल आता *त्यांना* असंही वाटून जातं. पुढे हीच भावना वेळोवेळी डोकं वर काढते, आपल्यातला दहशतवादी मातू लागतो. स्वानुभव सांगतो, दंगलींच्या नंतर, बॉम्बस्फोटांनंतर रात्री उशिरा गाडी पकडायचो तेव्हाचा अनुभव सांगतो. डब्यात अवतीभवती असलेल्या सगळ्यांवर परस्परांची संशयाची नजर फिरायची. एखाद्याला दाढी असेल , पेहरावावरून धर्म अळखता येत असेल तर पाहणार्याच्या नजरेत विखार, खुन्नस दाटून यायची. माझीही भावना फार वेगळी नसायची, पण मी त्यातून बाहेर पडलो. आजही माझा रात्री उशिरानेच प्रवास सुरू असतो. अन्य धर्मीय सोबतीला असतात, मी आजही सगळ्यांकडे निरखून पाहतो. माझ्या लक्षात येतं की कुणाचा जप सुरू आहे, कुणी लॅपटॉपवर काम करतोय तर, कुणी मोबाइल संभाषणात मग्न आहे. सगळी आपल्यासारखीच माणसं आहेत, त्यांना त्यांचे रागलोभ-विकार आहेत. मग आपल्या मनात द्वेष कशासाठी? थोडा अधिक विचार केल्यावर लक्षात आलं - आपण द्वेष दाखवला, खुन्नस दाखवली की मनातला दहशतवादी जागा होतो, आपल्या बुद्धीचा, भावनांचा, विवेकाचा ताबा घेतो. धर्मांधता वा दहशतवादी प्रवृत्ती याच खतपाण्यावर तर वाढते. ती सुरूवात आपल्यापासून होऊ नये, इतरांनाही त्याची बाधा होऊ नये म्हणून आपापल्या परीने, वकुबानुसार जागं रहायला हवं, प्रयत्न करायला हवेत. हे असं होऊ नये म्हणून जमेल तितके सौहार्दाने वागायला काय हरकत आहे? ओसामा मारला गेल्यावर मनात कालपासून भिरभिरणारे हे विचारांचे भोवरे तुमच्याशी शेअर करावेसे वाटले म्हणून लिहिलं...
मी फारच वेगळ सांगतोय असं नाही, मनात कालपासून जे उमटत होतं तेच इथे प्रकट केलंय. मी विचार केलाय, तूम्ही पण करा इतकेच!
तुम्ही लक्षात घ्या - एखादी घटना घडली की आपल्यापैकी बहुतेकजण कळत-नकळत आरोपी व्यक्तीची जात, धर्म विचारात घेतात आणि त्यानुसार, ज्याच्या-त्याच्या मनातील पूर्वग्रहानुसार मग त्यापुढील प्रतिक्रिया उमटते... अन्यधर्मीय व्यक्ती असेल तर मनात उगाचच त्या धर्माच्या सर्वांविषयी अनुदार, खरं तर तिरस्करणीय अशी खुन्नस दाटून येते. आपल्याच धर्माचा, कुंपणातील कुणी असेल तर है शाब्बाश, चांगला धडा मिळेल आता *त्यांना* असंही वाटून जातं. पुढे हीच भावना वेळोवेळी डोकं वर काढते, आपल्यातला दहशतवादी मातू लागतो. स्वानुभव सांगतो, दंगलींच्या नंतर, बॉम्बस्फोटांनंतर रात्री उशिरा गाडी पकडायचो तेव्हाचा अनुभव सांगतो. डब्यात अवतीभवती असलेल्या सगळ्यांवर परस्परांची संशयाची नजर फिरायची. एखाद्याला दाढी असेल , पेहरावावरून धर्म अळखता येत असेल तर पाहणार्याच्या नजरेत विखार, खुन्नस दाटून यायची. माझीही भावना फार वेगळी नसायची, पण मी त्यातून बाहेर पडलो. आजही माझा रात्री उशिरानेच प्रवास सुरू असतो. अन्य धर्मीय सोबतीला असतात, मी आजही सगळ्यांकडे निरखून पाहतो. माझ्या लक्षात येतं की कुणाचा जप सुरू आहे, कुणी लॅपटॉपवर काम करतोय तर, कुणी मोबाइल संभाषणात मग्न आहे. सगळी आपल्यासारखीच माणसं आहेत, त्यांना त्यांचे रागलोभ-विकार आहेत. मग आपल्या मनात द्वेष कशासाठी? थोडा अधिक विचार केल्यावर लक्षात आलं - आपण द्वेष दाखवला, खुन्नस दाखवली की मनातला दहशतवादी जागा होतो, आपल्या बुद्धीचा, भावनांचा, विवेकाचा ताबा घेतो. धर्मांधता वा दहशतवादी प्रवृत्ती याच खतपाण्यावर तर वाढते. ती सुरूवात आपल्यापासून होऊ नये, इतरांनाही त्याची बाधा होऊ नये म्हणून आपापल्या परीने, वकुबानुसार जागं रहायला हवं, प्रयत्न करायला हवेत. हे असं होऊ नये म्हणून जमेल तितके सौहार्दाने वागायला काय हरकत आहे? ओसामा मारला गेल्यावर मनात कालपासून भिरभिरणारे हे विचारांचे भोवरे तुमच्याशी शेअर करावेसे वाटले म्हणून लिहिलं...
मी फारच वेगळ सांगतोय असं नाही, मनात कालपासून जे उमटत होतं तेच इथे प्रकट केलंय. मी विचार केलाय, तूम्ही पण करा इतकेच!
Thursday, April 28, 2011
वाट लावतोय रिक्षावाला...
`कामावर जायला उशीर झायला, बगतोय रिक्षावाला गं वाट माझी बगतोय रिक्षावाला...' संपूर्ण ठाणे जिल्ह्यात गेले वर्ष-दीड वर्ष धुमाकूळ घालणाऱया या गाण्यात कल्याण-डोंबिवलीतील सहनशील प्रवाशांनी सध्या थोडासा बदल केला आहे. आरटीओ, वाहतूक शाखा आणि क्वचितप्रसंगी हुज्जत घालणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके खमके प्रवासी यांच्यातील कुणालाच न जुमानणाऱया उद्दाम, मुजोर रिक्षावाल्यांसाठी कल्याण-डोंबिवलीतील चाकरमान्यांनी `वाट माझी लावतोय रिक्षावाला' असे नवे गाणे उद्वेगाने म्हणायला सुरुवात केली आहे. भाडे नाकारणे, हुज्जत घालणे, मनाला येईल तेवढे पैसे मागणे अशा स्वरूपातील रिक्षाचालकांची मग्रुरी मुंबई-ठाण्याचे अडले-नडले प्रवासी रोजच अनुभवत असतात. पण, कल्याण-डोंबिवलीतील परिस्थिती त्यापेक्षाही भीषण टोकाला पोहोचली आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा न मानणारी अशी येथील रिक्षाचालकांची जमात आहे. त्यांना मीटर लावण्याचा कायदा ही सक्ती वाटते, मात्र, शेअरभाडय़ाचे दर आरटीओने ठरवून देण्याआधीच परस्पर भाडेवाढ करणे हा त्यांचा `न्याय' आहे. कल्याण, डोंबिवली या शहरांना मराठमोळी नगरे म्हणून सुसंस्कृत चेहरा आहे. अनेक राज्यांतून पोटापाण्यासाठी मुंबई गाठणाऱयांनीही कल्याण-डोंबिवलीला आपलेसे केले आहे. या शहरांच्या सीमेबाहेर वसलेल्या मूळच्या गावा-पाडय़ांमध्ये विस्तारत गेलेल्या सिमेंटच्या जंगलांमध्ये या सगळ्यांचे संसार नांदत आहेत. महापालिकेची सार्वजनिक वाहतूकव्यवस्था पुरेशी सक्षम नसल्यामुळे सकाळच्या धावपळीच्या वेळी कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली यापैकी कोणतेही रेल्वे स्थानक गाठायचे तर रिक्षाशिवाय तरणोपाय नाही. मीटरने भाडे ही संकल्पनाच रिक्षाचालकांना मान्य नसल्यामुळे शेअर रिक्षा म्हणजे हम करे सो कायदा अशी त्यांची मनमानी अनेक वर्षे सुरू आहे. आरटीओच्या `डोळे'वटारणीलाही भीक न घालणाऱया या रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांनांही `पुडी'त गुंडाळून खिशात ठेवले आहे. मनाला येईल तेव्हा शेअरभाडे वाढवून प्रवाशांची लुबाडणूक करणाऱया या रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांची बाजू घेऊन ज्या राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी उभे राहायला हवे, त्याच पक्षांनी आश्रय दिल्यामुळे रिक्षा संघटनांचेही फावले आहे. ही लुबाडणूक आणि प्रवाशांना वाऱयावर सोडणाऱया यंत्रणांबद्दल आम्ही सातत्याने आवाज उठवल्यानंतर आरटीओने शेअररिक्षाचे दरपत्रक जाहीर केले खरे, पण हे दरपत्रक न जुमानता आजही रिक्षाचालकांनी वाटमारी सुरू ठेवली आहे. अनेकांना तर दरपत्रक असल्याचेच माहिती नाही. सरकारी यंत्रणांचा या संघटित लुबाडणुकीला आशीर्वाद आहे, यात शंकाच नाही. आता प्रवाशांनीच बहिष्काराचे अस्त्र उपसून `वाट बगतोय रिक्षावाला' असे म्हणण्याची वेळ रिक्षाचालकांवर आणायला हवी.
Labels:
specials
Wednesday, April 27, 2011
लिहायचं की वाचायचं...
माझ्या मनात पुन्हा तोच सनातन संघर्ष सुरू झालाय... लिहायचं की वाचायचं... मोठ्या उत्साहात ब्लॉग लिहायचा संकल्प सोडला होता आणि आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ब्लॉग लिहिणचं सोडल्यागत झालंय. आपल्या परिचयातील दोन-पाच लोक कौतुकानं वाचतात ब्लॉग, त्यापुढे काय असाही एक प्रश्न मीच मला विचरात असतो. तीही सबबच लिहायचं नाही म्हणून... लिहायचं नाही म्हणजे कंटाळा येतो किंवा काही सुचत नाही म्हणून थांबलोय असंही नाही. पण वाटतं की कितीजणांनी इतकं उत्कृष्ट लिहून ठेवलंय तेच वाचायला वेळ पुरत नाही तर लिहिण्यात आणखी वेळ घालवणं कसं काय बुवा योग्य आहे.. मग लिहायचं असलं तरी टाळलं जातं. पण मी थांबलोय हे काहींच्या लक्षात आलं आणि त्यांनी आस्थेनं विचारलं म्हणून पुन्हा हे इतकं लिहिलं... आता कदाचित लिहिन वा थांबेनही... पाहू !!
Subscribe to:
Posts (Atom)








