Friday, September 20, 2013

बाप्पा आम्हालाही आशा आहे..

This is what I felt aftr seeing the visarjan DHINGANA.. But there is still hope..
Please read
http://prahaar.in/shadow/135488


बुधवारचीच गोष्ट.. बाप्पा घरी परत निघाले होते त्या वेळची. कर्णकर्कश्श गोंगाटात घराच्या भिंतीच नव्हे माणसे आणि प्राणी-पक्षीही थरथरत होते.
वेळ रात्री बारा-एकची स्थळ- हिंदुजा रुग्णालयाचा परिसर, तो चौकच. नीरव शांतता वगैरे काही नाही. मुंबई तशीही कधी झोपत नाहीच विसर्जनच्या बुधवारी तर पाहायलाच नको..दणदणाट. कानठळ्या बसवणारे डीजे संगीत. हातगाडय़ा, टेम्पो, ट्रक मिळेल त्या वाहनावर चढवलेली भल्याथोरल्या स्पीकरची दहीहंडी. गणपती मिरवणूक चाललीय. कर्णकर्कश्श गाण्याबजावण्याचा गोंगाट ११० डेसीबल्सच्या वर.. कपाळावर आठय़ा आणण्याची कोणाची हिंमत आहे? कोन रे तो, आमच्या सनाला आडवा येतो, घ्या त्याला.. ए बजाव.. रुग्ण गेले खड्डय़ात, झोपू पाहणारे रहिवासी गेले ढगात.. बजाव ढिंचॅक..
या कानठळी संगीताच्या तालावर ‘धुंद’ कार्यकर्ते हातपाय उडवत होते, रासायनिक गुलाल उधळत होते. आणि याच कर्णकर्कश्श गोंगाटात घराच्या भिंतीच नव्हे माणसे आणि प्राणी-पक्षीही थरथरत होते. या गोंगाटाचा गलका, फटाक्यांच्या माळांचा कडकडाट असह्य झालेल्या इथल्याच एका कुटुंबाने पाळलेल्या लारा नावाच्या कुत्रीने त्याचा धसका घेऊन जीव सोडला.. हीदेखील विसर्जनाच्या बुधवारचीच गोष्ट..
००००
स्थळ पुणे..
वेळ – विसर्जनाची म्हणजे दिवसभरातील कोणतीही
पुण्यातील विसर्जन सोहळा म्हणजे काय शिस्त.. सगळं कसं पद्धतशीर, नियमाने, क्रमानुसार.. किती र्वष ऐकत आलोय पुण्याची कीर्ती. तिथले मानाचे गणपती, तिथली लेझीम पथकं, ढोल पथकं, बँड, रांगोळ्यांचे सडे.. सगळं ऐकून मनात अगदी अप्रूप दाटून आलेलं..
त्यात वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवरून मंगळवारपासून पुण्यातल्या विसर्जन सोहळ्याचं पुराण सुरू होतं. गणपती विसर्जनाचा थाट म्हणजे काय ते पाहायचं असेल तर पुण्यातच यायला हवं, असं एका वाहिनीवरील युवा पत्रकार दिवसभर सांगत होती.
त्याच मुलीची फेसबुकवर पडलेली पोस्ट..
- ‘ढोल ताशे, बँड, रांगोळीच्या पायघडय़ा आणि त्यावरून जाणारा लाडका गणपती बाप्पा.. सगळ्यांनी हमखास बघावा आणि दाखवावा असा, असं मी दिवसभर सांगत होते. पण बुधवारी सकाळी विसर्जनाचा सोहळा लाइव्ह करण्यासाठी अलका चौकात उभी होते.. तर स्पीकरच्या भिंतींमधून हजारो बेभान तरुण मुलांच्या रिमिक्स डान्समधून वाट काढणारा गणपती पाहताना भडभडून आलं.. या बिचा-या गोजिरवाण्या गणपतीचे कान किटवूनच त्याला परत पाठवायचं ठरवलं होतं की काय कुणास ठाऊक? एवढं सगळं सोसून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतो म्हणजे बाप्पाचं मन पण खूपच मोठं असलं पाहिजे..’
०००००
पुण्यात यंदा या स्पीकरच्या गोंगाटामुळे थोडा वाद झाला म्हणतात. मिरवणुकीच्या बदलत्या स्वरूपाला काहींनी आक्षेप घेतला. मुंबईत मात्र एकमत आहे. फुल टू धमाल करायची याबद्दल. डीजे लावून, वाट्टेल ती गाणी कितीही वेळ वाजवून, धांगडधिंगा करून दररोज आवाजी प्रदूषणाचा विक्रम नव्याने प्रस्थापित करायचा याविषयी बहुतेक सगळ्याच मंडळांची ठाम एकी आहे. जे अल्पमतात ते मंडपाबाहेर.. बसा म्हणावं घरात..
०००००००००
स्थळ – ठाणे पूर्व. कोपरी अष्टविनायक चौकातील विसर्जन घाट..
चौक संपूर्ण गर्दीने फुललेला.. आकाशात रोषणाईच्या फटाक्यांमधून सप्तरंगी प्रकाशफुलांची उधळण. मुलींची लेझीम, बँडपथकांचं तालबद्ध संगीत. विसर्जन घाटावर निर्माल्य कलश. स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून येणारे भाविक, बंदोबस्तासाठी असलेले पोलिस आणि इतर यंत्रणांचे कर्मचारी यांना नाश्ता, जेवण याची व्यवस्था. दृष्ट लागेल असं कोपरीच्या घाटावरील व्यवस्थापन पाहून चौकाकडे वळलो तर हात कानावर गेले.
नेहमीच एकमेकांशी स्पर्धा करणा-या मनसे आणि शिवसेनेने शेजारी-शेजारी उभारलेल्या मंचावरून गणेशभक्तांना शुभेच्छा देण्याचा कानठळी गोंगाट भल्याथोरल्या स्पीकरची दहीहंडी रचून सुरू ठेवला होता. ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादांचं उल्लंघन करून बोंबलणं सुरू होतं. लाज, खंत, खेद सारं सारं मनात अनिवार झाले..
०००००
‘व्हॉट्स अ‍ॅप’वर एक विनोद फिरतोय..
विसर्जन झालं आणि गणपती कैलास पर्वतावर घरी पोहोचले.. पार्वती मातेने मायेने विचारलं, काय कशी झाली ट्रीप.. पृथ्वीवर दहा दिवस धमाल केली ना, मोदक लाडू जोरात ना.
बाप्पा बोलले – मुझपे एक एहसान करना, की मुझपे कुछ भी एहसान न करना.
पार्वती – अरे हे काय बोलतो आहेस??
गणपती – लुंगी डान्स लुंगी डान्स..
रिद्धी-सिद्धी – देवा, अरे काय हे???
गणपती – १२ महिनेमे १२ तरीकेसे
ढिंका चिका ढिंका चिका रे एएए
महादेव – आईशप्पथ.. हल्ली मुलांना कुठे पाठवायची सोयच नाही राहिली..
००००००००
याला विनोद कशाला म्हणायचं, हे भीषण वास्तव आहे. महादेवा, काय चुकलं रे बाप्पांचं? पृथ्वीवर दिवसरात्र हीच गाणी, हाच धिंगाणा ऐकलाय त्यांनी. आणखी काही दिवस तरी हाच इफेक्ट राहील त्यांच्यावर.
गणपतीबाप्पांचे हात मोदकलाडू, परशू, आशीर्वाद देण्यात गुंतलेले असतात म्हणून बरे, नाही तर बाप्पांनी या गाण्यांपासून सुटका मिळावी म्हणून खचितच त्यांचे कान या हातांनी झाकून घेतले असते.
त्याचं मन खूपच मोठं आहे.. म्हणूनच तो ही सगळी थेरं खपवून घेतो.. ठाकूरद्वारला मिरवणूकीत तृतीयपथीयांच्या जोडीने बिभत्स हावभाव करत नाचणारी उन्मादी टोळकी, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन् तास ताटकळणा-या महिलांच्या अंगचटीला जाणा-या, भाविकांची मानगूट पकडून त्यांना हिसडणा-या मुजोर कार्यकर्त्यांचं त्यामुळेच तर फावतं.
पर्यावरणाची नासाडी, तलावांची, खाडय़ांची, समुद्राची, जलचर सृष्टीची वाताहात दरवर्षी नित्यनेमाने होत राहते आणि तरीही बाप्पा सगळे अपराध पोटात घालतात.. आज नाही उद्या, पुढच्या वर्षी तरी माणूस नावाचा प्राणी सुधारेल अशी त्याला आशा आहे.
आपल्या परीने पर्यावरणाचा तोल सांभाळू पाहणा-या, शाडू मातीची मूर्ती आणणा-या, ध्वनिप्रदूषणाला हातभार न लावणा-या, घरच्या घरी पाण्याच्या टाकीत विसर्जन करण्याचा आगळा पायंडा पाडणा-या अल्पमतातील काहीशेंनाही तीच आशा आहे देवा!

No comments:

Post a Comment