Tuesday, January 11, 2011

एका लेकीचा अस्वस्थ बाप...


आला दिवस आपण कितीही सकारात्मक घालवायचा म्हटला तरी अवतीभवती घडणाऱया घडामोडी, पेप्रातल्या बातम्या नाही लागू देत आपला दिवस सत्कारणी... काहीतरी असं घडतं, काहीतरी असं वाचायला मिळतं, कुठलीतरी बातमी इतकी अस्वस्थ करून जाते की मूडची पार वाट लागते...
आजच्या दोन बातम्यांनी माझ्या मूडची सध्या तरी वाट लावलीय...
इंडियन एक्स्प्रेसमधून साभार
`इंडियन एक्स्प्रेस'मध्ये आज पहिल्या पानावर आलेली बातमी - बातमी आहे मध्य प्रदेशच्या अनुप्पूर जिल्ह्यातील दूधपुलिया गावची. आपल्या देशाची, सर्वसामान्यांची दुर्गती प्रकर्षाने अधोरेखित करणारी. तिथला गोकुळ गोंड नावाचा एक गरीब. सोळा वर्षाच्या लेकीने विष पिऊन आत्महत्या केली म्हणून कोसळलेला. होतं काय, पोलिस येतात, पंचनामा करतात आणि मुलीच्या मृतदेहाची शवचिकित्सा करायला जिल्ह्याला घेऊन जा म्हणून गोकूळलाच सांगून पाठ फिरवून निघून जातात. येता-जाता बिस्किटचा तुकडा मोडावा तसा कायदेभंग करणाऱया शिरजोरांच्या आपल्या देशात गोकूळसारखे कायद्याला घाबरणारे, कायद्याची चाड असणारे अल्पसंख्याक अजून आहेत. पोलिसांनी जबाबदारी झटकली तरी गोकूळ मात्र त्याच्या दुर्गम भागातून 14 किमी वरील जिल्ह्याच्या ठिकाणी निघाला, सायकलच्या कॅरियरवर लेकीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधलेला... (इंडियन एक्स्प्रेसने असे छायाचित्रही छापलेय)
दुसरी बातमी पीटीआयने आज दिलेली.  उत्तर प्रदेशमधील बसपच्या द्विवेदी नामक आमदाराने अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या सीबीआय चौकशी अहवालाची. या आमदाराने या मुलीवर अत्याचार केला आणि वर तिच्यावरच चोरीचा खोटा आळ घेतला, पोलिसांनीही आमदाराला साथ देत तिच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. हा आमदार माझ्यावर अत्याचार करताना त्याचे पित्ते मला चिडवत होते, असे ती मुलगी जबाबात सांगत असताना, आमदार मात्र, मी तर नपुंसक आहे, मी कसा अत्याचार करणार या मुलीवर, असं सांगतोय... अशा घटनांमध्ये थेट शरीयतचा कायदाच (हात के बदले हात, अत्याचारी व्यक्तींचा 'तो' अवयवच छाटून टाकण्याची आदी) अपराध्यांसाठी अमलात यावा असं मला वाटू लागलंय.
आरुषीची हत्या असंच मन विदीर्ण करणारी. मी हे सगळं वाचतो आणि अस्वस्थ होतो, घाबरतोही.
- एका लेकीचा अस्वस्थ बाप

Sunday, January 9, 2011

एक नाटकाची आयरनी अर्थात चांगल्याची माती


मला माहिती होतं तेच झालं...
दररोज ब्लॉगवर काहीतरी लिहायचा संकल्प दहा दिवसांच्या आत मोडीत निघाला. शनिवारी दांडी झाली राव... वाईट वाटलं, पण अख्ख्या आठवडय़ात एक सुटी येते आणि ती फक्त कुटुंबासाठी असं कधीचंच ठरवलंय (हा संकल्प मात्र अद्याप मोडीत निघालेला नाही, बायको आणि लेक ते मला करूही देणार नाहीत आणि मीही ते करणार नाही). त्यामुळे कालचा शनिवार ब्लॉगवर येण्याचं, काही नोंदवण्याचं राहून गेलं. अर्थात रोजच काहीतरी लिहावंच असंही बंधन नाही, पण लिहिलं पाहिजे असं मात्र मनापासून वाटतंय...
कालचा शनिवार मस्त मजेत गेला. नव्या वर्षाचा माझा संकल्प वाचला असाल तर दर शनिवारी एकतर मराठी नाटक वा चित्रपट टाकायचाच असं मी ठरवून ठेवल्याचं तुमच्या ध्यानात असेलच. या संकल्पानंतरचा हा पहिलाच शनिवार होता. नाटक आधीच ठरवलं होतं, मी शारुक मांजरसुंभेकर, सिद्धार्थ जाधवचं नवकोरं. गडकरीला प्रयोग हाऊसफुल्ल होता. `गडकरी रंगायतन पूजा समिती' नावानं कुणीतरी प्रयोग घेऊन मनाला वाटेल ते दर लावून तिकिटं खपवली होती. मीच दोनशे रुपयांची तीन तिकिटं घेतली होती. या भ्रष्टाचाराबद्दल वेगळं लिहायला आणि पत्रकार म्हणून खणायला लागणार आहे, ते आता येत्या दोन-तीन दिवसांत करीनच...
हां, तर नाटकाबद्दल सांगतो. प्रमुख भूमिकेत सिद्धार्थ, लिहिलंय मकरंद अनासपुरे, सतीश तारे आणि महेश मांजरेकर यांनी, या नाटकाच्या सुरू असलेल्या जाहिराती यामुळे धम्माल इनोदी वगैरे काहीतरी असणार असा माझ्यासकट सगळ्यांचा समज झाला होता. बॉलीवूडच्या मोहात पडून मुंबई गाठणाऱया, स्टुडिओंमध्ये, निर्माते-दिग्दर्शकांकडे खेटे घालणाऱया एका स्ट्रगलरची कहाणी असा काहीसा नाटकाचा कथाविषय असंही कुठेतरी मनात होतं. झालं वेगळंच. कथाविषयाचा अंदाज खरा ठरला तरी बाकी सारे गैरसमज ठरले...
नाटकात सिद्धार्थ बेफाट सुटलायं, कम्प्लिट ऑथरबॅक भूमिका असं काय म्हणतात ते त्याच्या व्यक्तीरेखेबद्दल म्हणता येईल आणि सिद्धूनेही फूल्ल फुटेज खात रोलचं सोनं केलंय. त्यात तो आयरनी ऑफ लाइफ असं सारखं म्हणतो. नाटक पाहतांना मला सारखं आयरनी ऑफ ड्रामा (या नाटकाचा) वाटत होतं. कारण एकच सवंग, अभिरुचीहीन आणि थेट कमरेखालच्या विनोदांनी नाटकाची, एका संवेदनशील, सिरीयस विषयाची माती केलीय. त्याच्या गंभीर बाजाला उणेपणा आणलाय. विनोदी, हास्यस्फोटक म्हणून खुर्चीत स्थिरावणारा प्रेक्षक पहिल्याच लावणीनं आणि राजा-प्रधानाच्या बतावणीनं खुश होतो, सिद्धुची ये-जा सुरू झाल्यावर हुरळतो, पण नंतर ध्यानी येतं विषय हवापाण्याचा नाही, स्ट्रगलरच्या ससेहोलपटीचा, हेलपाटय़ांचा आहे. दत्तात्रय हरिश्चंद्र मांजरसुभेकर याची निराशा, हताशा आणि तरीही उसळी घेणारी अपराजित उर्मी या सगळ्याचं अफलातून सादरीकरण सिद्धू समोर करत असतो आणि दाताखाली खडा यावा, गवई बेसूर व्हावा, मोबाइल बॅटरी संपून अवचित बंद पडावा तसे अतिशय सवंग, हीन, सरळसरळ अश्लील विनोद नाटकाची वाट लावत रहातात. ही या नाटकाची आयरनी ऑफ ड्रामा आहे.
मकरंदचा, सिद्धार्थचा स्ट्रगल, त्यांच्यासारख्या अनेकांचा स्ट्रगल एका सुंदर संहितेतून रंगमंचावर आणण्याची सुवर्णसंधी या भंगार विनोदांमुळे, काही नकोशा प्रसंगांमुळे वाया गेलीय आणि नाटकंही उभं रहाता-रहाता विस्कटलंय...
या अपराधाला जे कुणी जबाबदार असतील त्यांना सुजाण प्रेक्षक कधीही क्षमा करणार नाहीत!

Friday, January 7, 2011

चस्का ब्लॉगिंगचा


मराठी कॉर्नरवर माझ्या ब्लॉगची लिंक अशी पण दिसतेय... झकास ना!
ब्लॉग सुरु केल्याचा एक झकास फायदा झालाय मला... कितीतरी जणं नव्यानं भेटले इथे मला, दोन शब्द कौतुकाचे, काही परखड परिक्षणाचे एकायला मिळाले, काहींनी तर दुर्लक्षच केलेय... आधुनिक युगातील कौन अपना, कौन परायाची लिटमस टेस्टच झाली की ही. सांगायचं म्हणजे ब्लॉगवर लिहिण्यासाठी सतराशे साठ गोष्टी सुचायला लागल्यात, एकदम नवा कोंब फुटतो ना पालवीआधी तसं काहीसं झालंय. उपफायदा असा की यातले बरेचसे विषय पत्रकार म्हणूनही लिहावेसे आहेत. हे बेस्ट झालंय... गेल्या दोन वर्षात कुठेतरी अडखळल्यागत वाटलेलं लिखाण आणि सुचण्याची प्रक्रिया प्रवाही झालयं.
ब्लॉगिंगचा तर चस्काच लागलाय राव. दिसामाजी काही तरी लिहित जावे... हे ब्लॉगच्या निमित्ताने प्रत्यक्षात येतयं.
या ब्लॉगमुळे मराठी नेटकट्ट्यांचा, नेटकरांचा, मराठीतच ब्लॉग लिहिणार्या मंडळींचा माहितीच्या महाजालात किती वावर आहे हेही मी शोधू पाहतोय. तुम्ही पाहिलतं तर माझ्या ब्लॉगवर या मजकूराच्या शेजारीच मराठी क़ॉर्नर, मराठी सूची, मराठी ब्लॉग वर्ल्ड, मराठी ब्लॉगविश्व यांची बोधचिन्हे आहेत. या प्रत्येक कट्ट्यावर मी माझा ब्लॉग जोडला आहे. मराठी ब्लॉग विश्ववरचं माझं जोडकाम माझ्या बाजूने यशस्वी झालं असलं तरी तिथे अजून माझा ब्लॉग दिसत नाही. पण माझं हे खट्टूपण मराठी कॉर्नर, मराठी सूची, मराठी ब्लॉग वर्ल्ड या कट्ट्यांनी दूर केलंय. चोवीस तासांच्या अवधीत माझा ब्लॉग या कट्ट्यांवर दिसायला लागलाय. या प्रत्येक कट्ट्यावर जाण्यासाठी माझ्या ब्लॉगवरील त्या बोधचिन्हावर क्लिक केलंत की झालं, तुम्ही लगेच त्या कट्ट्यावर दाखल व्हाल... ब्लॉगर असाल तर तुम्हीही तिथे तुमचा ब्लॉग जोडू शकता, त्यासाठी सहजसोपे मार्गदर्शन प्रत्येक कट्ट्यावर त्याच्या संचालकांनी केले आहे. मराठी ब्लॉग विश्ववर जरा सुचनांचा गुंताआहे, पण तिथूनच मला इतर दोन ब्लॉगरनी लिहिलेलं वाचून हे इतर कट्टे मिळाले होते.
मराठी कॉर्नरचं वेगळेपण त्याच्या हटकेपणात आहे. त्याच्या डिझाइनपासूनच हे वेगळेपण नजरेत भरतं. इतरांपेक्षा लक्षवेधी म्हणजे इथं चक्क एका विषयाला धरून गप्पा हाणायचा, मतं मांडायचा आणखी एक पार आहे. याला अनेक विषयांच्या पारंब्या लोंबत आहेत, आपल्याला पाहिजे ती पारंबी धरायची आणि मतांचे-मतांतरांचे झोके घ्यायचे. त्यासाठी इथे तुमचा ब्लॉग जोडला असण्याचीही गरज नाही, सदस्य झालात की पुरे... ब्लॉगर असाल तर 
आपला ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडण्यासाठी इथे क्लिक करा: http://www.marathicorner.com/memberblogs/  
राठी कॉर्नरचे संचालक अद्वैत कुलकर्णी यांनी अगत्याने पाठवलेल्या इमेलमध्ये त्यांनी म्हटलंय - केवळ मराठीसाठी म्हणून इतर भाषांचा अपमान करणे वा इतर भाषांचा तिरस्कार करणे या मताचे आम्ही नाही. हे संकेतस्थळ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश असा की आज मराठी ब्लॉगर "ब्लॉगिंग" या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहेत जे खरोखरच खुप चांगले आहे. त्यामुळे अशा सर्वांना कोठेतरी एकत्र आणणे गरजेचे आहे जेणे करून सर्व मराठी लोक एका छताखाली एकत्र येतील, एकत्र विचरांचे आदान-प्रदान करतील, त्यांची मते मांडतील, गप्पा गोष्टी करतील, २ क्षण आनंदात घालवतील. थोडक्यात इंग्रजीत म्हणायचे झालेच तर "virtual online gate to gather" -
तेव्हा या प्रवेशद्वारातून जरूर प्रवेश करा, इतकंच सांगायचंय !
 शुभरात्री!
--------------------------------------------
जाता जाता - ब्लॉगवर फार खेळ केले की काय होतं त्याचं उदाहरण म्हणजे मी आज लिहिलेला मजकूर आहे. मजकूर तयार झाला आणि इमेज पेस्ट करताना घोळ झाला. सगळंच डिलिट झालं. आता मी धसका घेतलाय या खेळा'चा. पुन्हा असं होऊ नये याची फार काळजी घ्यावी लागणार आहे. नवशिक्या ब्लॉगरला मिळालेला हा धडा तुम्हीही ब्लॉगिंग करताना लक्षात ठेवा.
 


 

Thursday, January 6, 2011

ख-या 'श्रमिक पत्रकारांना' पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!


'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाच्या माझ्या सर्व पत्रकार मित्रांना शुभेच्छा !
आज सकाळपासून एसएमएसची रांग लागली आहे. 'पत्रकार दिनाच्या शुभेच्छा, सर्व श्रमिक पत्रकारांना शुभेच्छा' इ. प्रमोद चुंचुवार, संजय जाधव, संदीप प्रधान, शामसुंदर सोन्नर, जयंत धुळप अशा माझ्या कितीतरी मित्रांचा, सहका-यां
चा आज पत्रकारतेतील कामगिरीबद्दल पुरस्कारांनी गौरव होणार आहे.
आय अ‍ॅम व्हेरी हॅपी फॉर देम, त्यांचे पुन्हा एकदा जाहीर अभिनंदन.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने
दिल्या जाणा-या पुरस्कारांना आणि आजच्या पत्रकार दिन सोहळ्याला पत्रकार विश्वात एक खास मानाचे स्थान आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माझा सहकारी मित्र प्रसाद मोकाशी आणि कार्यकारिणीने त्याचे भान ठेऊनच कार्यक्रमांची आखणी केली आहे. प्रसादच्याच पाठपुराव्याने पत्रकार संघासमोरील महापालिका चौकात आज दर्पणकारांच्या नावाची पाटी महापौरांच्या उपस्थितीत संध्याकाळी लावण्यात येणार आहे. त्याबद्दलही धन्यवाद!
पण मला सांगायचे आहे ते जरा वेगळे आहे. ती माझ्या मनात उमटलेली, अजूनही अनुत्तरीत अशी भिरभिरणारी वावटळ आहे...
 या सगळ्या गोंधळगुंत्याला सुरूवात झाली ती गेल्या आठवड्यात. मुंबईनजीकच्या एका शहरातील पत्रकार संघाच्या अध्यक्षांचा मला फोन आला होता. यंदा पत्रकार दिनाला अध्यक्ष म्हणून या अशी त्यांची विनंती होती. आपल्याच मनाचा तळ ढवळून काढणारी एखादी घटना अनेक दिवस आपल्याला अस्वस्थ करून सोडते. तसं या फोनमुळे झालं.
त्या फोनपासून या सगळ्याची सुरुवात झाली... दर्पणकारांच्या परंपरेची, वारशाची पालखी खांद्यावर घेण्याइतके, समोर अपेक्षेने जमलेल्या पत्रकारांना पत्रकारितेच्या रितीभाती, नितीमूल्ये, तत्त्वे अशा हक्कानं सांगण्याचं धैर्य मला दाखवता येईल का, पत्रकार म्हणून मी तितका 'स्वच्छ' आहे का, उपदेशाच्या चार गोष्टींचे डोस पाजण्याइतके आपण निर्ढावलेलो आहोत का अशा प्रश्नांचा कल्लोळ सुरू झाला आणि मी अस्वस्थ झालो.
माझे दोन-तीन-चार फ्लॅट नाहीत, मी कुणा आमदार-मंत्री यांच्या मेहरबानी लिस्टमध्ये नाही किंवा बदल्यांसाठी वा फायली सरकवण्यासाठी शब्द खर्ची घालून केले
ली वरकमाईही माझ्याकडे जमा झालेली नाही. पुस्तकांना पुरस्कार वा सरकारी समित्यांवर वर्णी यापैकी कशासाठीही मी धडपडलेलो नाही, असं काहीही मी पदरात पाडून घेतलेलं नाही, एस्‌इओ च्या यादीतील लाभार्थीही नाही, मला दिवाळीला वा सणासुदिला महागड्या भेटवस्तू येत नाहीत की माझ्यासाठी कुणी विमानांची तिकिटे आजवर पाठवलेली नाहीत...
तरीही मी 'स्वच्छ पत्रकार' या व्याख्येत बसणार नाही. कारण, पत्रकार असण्याचा कळत-नकळत मला लाभ झालेलाच आहे. रेशन, गॅस, टेलिफोन, आरटीओ अशा अऩेक ठिकाणी मी माझं पत्रकारपण वापरलं आहेच की.
अ‍ॅक्रिडीटेशन असताना मिळणा-या  रेल्वे, बस सवलतींचा उपयोग केला नसला तरी रेल्वे रीझर्व्हेशन हमखास मिळण्यासाठी पीआरओला पत्र मी देतोच, अवतीभवती घडणा-या  गोष्टींवर कितीही निर्भिडपणे लिहायचं म्हटलं तरी मनात कुठेतरी डाव-उजवं होतंच असतं, समीकरणं मांडली जातातच...
पैशांची पाकिटं नाकारली असली तरी पत्रकार परिषदांना मिळणारी गिफ्ट्स कधीकाळी खुणावत होतीच. मी विकला गेलो नाही असं कितीही म्हटलं तरी मोहाचे क्षण आले होतेच...
मनात असं काय काय उमटत होतं, मन एकाचवेळी खरवडून निघत होतं, स्वच्छ होत होतं...
असं सगळं मनात भिरभिरल्यावर आपली ती योग्यता नव्हे हे मनाच्या आरशात स्वच्छपणे दिसल्यावर मी, त्या फोनवरील आग्रहाला नकार देणे मला क्रमप्राप्त होते, तो दिला.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने मला आज हे आत्मपरिक्षण करावसं वाटलं. 

आज सगळं बदललं आहे. दोन-तीन फ्लॅट घेणारे पत्रकार, राजकीय नेतेमंडळी, विरोधी पक्ष यांच्यात उत्तम संतुलन आहे. भ्रष्टाचार 'आदर्श' झालाय, त्याचवेळी पत्रकारितेच्या सुरूवातीच्या पायरीवर असलेले माझे काही तरुण पत्रकार मित्र भाड्याचं घर, डिपॉझिट परवडत नाही म्हणून पत्नीला गावाकडे ठेवून या महानगरीत विकले न जाण्याची पराकाष्ठा करतहेत. त्यांचया डोक्यावर हक्काचं छप्पर नाही. ज्यांना कष्टांची चाड आहे, ज्यांचे हक्क डावलले जाताहेत, आवाज दाबले जाताहेत त्यांच्याबद्दल कणव आहे, अशी ही पत्रकार मंडळी आहेत. पत्रकारितेची ज्योत त्यांनी सांभाळून धरली आहे. अवतीभवतीचा बाजार पाहूनही स्वतची बोली न लावणा-या  त्या ख-या  'श्रमिक पत्रकारांना'  पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!
तर, हेच मला सांगावसं वाटलं आज...

Wednesday, January 5, 2011

संकल्प एक सोडणे-धरणे

हे तुम्ही कदाचित आधी कुठेतरी वाचलं असण्याची शक्यता आहे. पण खरंच जगण्याच्या इतक्या धावपळीत संकल्प करायचा आणि पाळायचा हे विस्कळीत माणसासाठी फारच अवघड आव्हान आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर, संकल्प करायचाच नाही हे मी अनेक वर्षांपूर्वीच शिकलोय.अनेक संकल्परवर्षी जानेवारीलाच वाटेला लागल्यावर ये अपने बस की बात नही हा अनुभवाचा धडा मी पक्का गिरवला. एक मजा सांगतो... नेमाडेंची हिंदू प्रसिद्ध झाल्यावर ती वाचायलाच हवी अशी टूम आली होती. घेतलीय, वाचतोय, वाचणारेय, संपत आली, दुसरा अध्याय सुरू आहे, आता शेवटाजवळ आलोय..., असं काय काय मी कौतुकाने इतरांकडून कायचो. हिंदू वाचून झालेल्यांची, तसं सांगणा-rची चर्चा कुंपणावरून कायचो.मनात मी सुद्धा आता आपल्यालाही हिंदू वाचायलाच हवी असं कुठेतरी ठरवत होतो.  तेव्हाच एक गंमत झाली. माझा मित्र आणि चोखंदळ वाचक विवेक कांबळे याच्या वाढदिवसाला त्याला कुणीतरी हिंदू भेट दिली. त्याने बिचा-rने मला प्रेमाने दाखवली. मी ती वाचायला मागितली आणि अजूनही मी वाचतोय, म्हणजे वाचत नाहीये. सांगायची गोष्ट म्हणजे हिंदू वाचण्याचं ठरवलेलं जवळपास बारगळल्यात जमा आहे. (जाताजाता - लोकसत्तात जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या एका वाचकपत्रानं हिंदू तील टाइमलाइनचा गोंधळ दाखवला आहे. अर्थात त्यामुळे हिंदूचं साहित्यिक मूल्य उणावतं का हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे.) पण कुणाचंही पुस्तक घेतलं तर ते परत करायचंच असा एक नेम मी पाळत आलोय. त्यामुळे हिंदू विवेकला परत करायचीय म्हणून तरी मला वाचणं भाग आहे.जाम गोंधळ वाटतोय ना वाक्यरचनेत, असू दे!
 हॅरि पॉटर मालिकेतील अखेरचा भाग अनेकांनी उत्सुकतेने रांगा लावून विकत घेतला होता. मलाही तो कुणीतरी भेट दिला. तो भागही मी पूर्ण वाचू शकलेलो नाही. हॅरि पॉटरचं शेवटी काय होतं ते मी पडद्यावरच पाहायचं ठरवलं आहे. पण मी संकल्पांविषयी सांगत होतो. कुठलाच संकल्प करायचा नाही असा एक संकल्प मात्र मी मोठ्या निष्ठेने पाळत आलोय. तो मात्र या नव्या वर्षात मी मोठ्या हौसेने मोडणार आहे.
माझा संकल्प आहे दर आठवड्याला शनिवारी एक तरी नाटक किंवा चित्रपट पाहायचाच. शक्यतो मराठी चित्रपट मी पहाणार आहे. ठाण्यात एकच नाट्यगृह असल्यामुळे नाटकांवर मर्यादा येईल, पण चित्रपट तरी नक्की पाहीनच असं मी ठरवलंय. या आठवड्यातील शनिवारी मी पहिलं नाटक पाहणार आहे. नाटकाचं नाव आहे - मी शारूक मांजरसुंभेकर. फुल्ली चार्जड् सिद्धु तथा सिद्धार्थ जाधवचा अफलातून परफॉर्मन्स.  

सिद्धार्थला मी तो महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गाजवत असल्यापासून पाहतोय. अशोक हांडे २५ जानेवारीच्या रात्री जो एकांकिका महोत्सव आयोजित करतात तो सहसा मी चुकवत नाही. आता बरीच वर्षे उलटली असली तरी सिद्धुनं आणि अद्वैत दादरकरनं एका एकांकिकेत स्टेजवर घातलेला धुमाकूळ विसरणे अशक्य आहे. तोच सिद्धू आज मराठी नाट्य-चित्रपट क्षेत्रातला एक ताकदीचा अभिनेता आहे. भरत जाधवसारखं त्याने विनोदी भूमिकांच्या चौकटीत अडकून पडू नये इतकचं. भरतचे अभिनयगुण यामुळे तसे कसाला लागलेलेच नाहीत, सिद्धार्थचं तसे होऊ नये असं वाटतं...
माझा दुसरा संकल्प, खरा तर पहिला संकल्प आधीच प्रत्यक्षात आलाय, तुमच्यासमोरच आहे. हा ब्लॉग तयार करायचा आणि दररोज अपडेट करायचा... मजा वाटतेय. तुमच्यासारख्या सन्मित्रांकडून मिळालेला प्रतिसादही माझ्यासारख्या नवशिक्या ब्लॉगरचा उत्साह वाढवणारा आहे.थँक्स दोस्तांनो !!