Wednesday, February 2, 2011

फ्लेमिंगो गेले उडत!

हे मी उद्वेगाने लिहिलं तेव्हा त्या बिल्डरनं नुकताच आमच्या समोरच्या मीठागारांवर कब्जा केला होता. पूर्णविक्रोळीपर्यंतची जमीनच त्यानेविकत घेतलीय म्हणे. आणि जाता जाता बडीशेप तोंडात टाकल्यासारखा आमच्या सोसायटीला लागून असलेला महापालिकेचा प्लॉटही बळकावलाय. त्यावरत्याने कार्यालय कमकेबिन आणून उभ्या केल्यात, पालिकेच्या नजरेदेखत एक प्लॉट गिळंकृत झालाय तरी कुणाला त्याचीफिकीर नाही.तक्रार करून काहीही फायदा झालेला नाही, एकदा पंचनामा झाला तो तद्दन खोटा,जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करूनत्यांच्या नजरेत हे अतिक्रमण आणलं तर त्यांनीदंडात्मक कारवाई केली. संपलं. जागा पालिकेची आहे तेव्हा अतिक्रमण, अनधिकृतबांधकामाचं त्यांनासांगा म्हणत त्यांनी हात झटकले. माझी एकट्याची लढाई सुरू आहे, तळं नजरेसमोर नाहीसं होत झालंय...याच हताशेतून२० आक्टोबर, २०१० ला हा मजकूर लिहिला होता.
---------------------------------------------
ठाण्यात पूर्वेकडे कोपरीला खाडी किना-याला लागून खारफुटी आणि मिठागरांचा सारा परिसर म्हणजे नानाविध पक्ष्यांचा किलबिलता संसार. खगकुळातल्या कितीएक जाती-प्रजाती, पाहुणे येथे यायचे आणि जायचे. फ्लेमिंगो, मोठ्या चोचींचे शुभ्र बगळे, पाणबदके, मुनिया, दयाळ, खाटिक, भारद्वाज यांचा शेजार घेऊन नांदणारी इथली निसर्गप्रेमी माणसं कौतुकानं या पक्ष्यांना न्याहाळायची, फ्लेमिंगो आणि इतर विदेशी पाहुणे दिसले की प्रारंभी सांगितल्याप्रमाणं अभिमानानं इतरांना सांगायची, कुणी निसर्गवेडा त्यांना कॅमे-यात टिपण्यासाठी तासन् तास समाधी लावायचा, कधीतरी या पाखरांबरोबरच त्यांना पाहायला येणा-या चिमण्या पाखरांचीही गजबज रविवारची सकाळ एकदम लख्ख आनंदाची करून टाकायची...
अगदी यंदाच्या पाऊसकाळापर्यंत अग्निपंखी (फ्लेमिंगो) आमच्या अंगणात यायचे आणि आणखी कितीतरी पक्षी.. 
आता हे सारं संपलंय. इथे पुढच्या वर्षीच नव्हे तर यापुढे कधीही फ्लेमिंगो आणि इतर पाहुणे उतरणार नाहीत. सिमेंटची जंगलं उभी करण्यासाठी पाखरांच्या घरसंसारावर जेसीबीचा नांगर फिरू लागलाय. मीठागारांमधील एक छोटंसं तळं फ्लेमिंगो आणि इतर पक्ष्यांचं आवडतं ठाणं. ट्रक भरभरून मातीचा भराव टाकून ते बुधवारी र्अधअधिक बुजवलं गेलंय, जेसीबी फिरवून इथली हिरवाई माती-राबीटमध्ये दफन केली गेलीय. गुरुवारी इथं तळ्याचा मागमूस राहणार नाही. 
पक्ष्यांच्या इथल्या संसारात माती कालवली जाऊ नये म्हणून माझ्यासारख्यांनी केलेला अल्पस्वल्प विरोध फार काळ टिकणार नाही. वर्षभरापूर्वी इथे माती घेऊन ट्रक घरघरू लागले होते तेव्हा धावपळ करून पालिकेच्या अधिका-यांना, कोपरी प्रभाग मुख्याधिका-याला आणून काम थांबवले होते. ते तेवढ्यापुरतेच. आता थेट विक्रोळीपर्यंतचा हा अख्खा पट्टाच विकला गेलाय म्हणे. पुन्हा भराव सुरू झालाय. खरेदी करणा-या विकासकानं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नावानं एक दबकावणारा बोर्डही लावलाय. त्यावर लिहिलंय, आयटी पार्क वगैरे. कुणासाठी आयटी पार्क, भरणीची अनुमती घेतली का, जागेच्या मालकीची माहिती, सीआरझेडचं काय, असल्या फुटकळ प्रश्नांचं कुणालाच देणंघेणं नाही.
कायदा करणा-या लोकप्रतिनिधींना इथं काय घडतंय याची फिकीर नाही, भरणीसाठी कुठलीही अनुमती न घेता बिनदिक्कत शेकडो ट्रक आणणा-या कंत्राटदारांना ज्यांनी जाब विचारला पाहिजे त्या जिल्हाधिकारी, तहसीलदार या यंत्रणांनांही त्याचं सोयरसुतक नाही आणि पक्ष्यांना कायदा कळत नाही, माणसाची भाषा वाचता येत नाही की आपल्या भाषेत त्यांना त्यांच्या हक्कांसाठी भांडता येत नाही.. भटक्यांचे तांडे पुढल्या गावाला निघतात तशी आता इथल्या पक्ष्यांची पालं उठून जातील. इथला गाता-किलबिलता संसार देशोधडीला लागेल. त्याला जबाबदार असणारी माणसं मात्र काहीच न घडल्यागत, ‘फ्लेमिंगो गेले उडत..’, असे म्हणत नवे कायदे मोडायला उत्साहाने पुढे सरसावतील!  

1 comment:

  1. SHailendra, what will also help in English speaking readers that you add the Google Translator button. When they arrive on your blog, they are not completely lost.

    ReplyDelete