Thursday, February 3, 2011

फ्लेमिंगो पाहिलेला माणूस


फ्लेमिंगो पाहायला किती कष्ट पडतात ते माडगूळकर त्यांच्या `वाघाच्या मागावर' पुस्तकातील एका लेखात सांगतात... मुंबईला कंटाळून ते पुण्याला गेले होते. ब्याऐंशी सालची गोष्ट. त्यांचे पस्नेही प्रकाश गोळे, जस्टिस पटवर्धन अशी सारी मंडळी राजस्थानला पाणथळ आणि पक्ष्यांची बिऱहाडं पाहायला निघाले होते. सांभर तलावाजवळचा प्रसंग त्यांनी लेखात दिलाय... तलावाजवळ पोहोचेपर्यंत अंधार झाला होता, हजारो, लाखो पाखरं असावीत एवढं फक्त जाणवत होतं. दुसऱया दिवशी सकाळी ही मंडळी गेली तर खरोखरीच हजारोंनी अग्निपंखी नजरेसमोर होते. पण मधला चिखल, गाळ यामुळं अनेक हात दूर. माडगूळकरांनी कुतुहलानं आजूबाजूला चौकशी केली - पण, या पाखरांची अंडी, पिल्लं असं कुणाला कुठं दिसलं नव्हतं. हे सांगितल्यावर माडगूळकरांनी लेस्ली ब्राऊन या लेखकानं त्याच्या `एन्काऊंटर्स वुईथ नेचर' या आपल्या पुस्तकात फ्लेमिंगोवर काय लिहिलंय ते दिलंय, लेस्ली म्हणतो - त्याने आजवर अभ्यासलेल्या कोणाही प्राण्यानं वा पक्ष्यानं मला फ्लेमिंगो इतकं कष्ट आणि दुःख दिलेले नाही. लेसर फ्लेमिंगो (खालच्या मजकूरात प्रारंभी दिलेले छायाचित्र) कुठं पिल्लं घालतात हे शोधण्यासाठी त्याने दहा वर्षं घालवली. आफ्रिकेतील नॅट्रोन सरोवराभोवती तो मुक्काम ठोकून असायचा.
माडगूळकर राजस्थानात एवढं हिंडले, त्यावर सुंदर पुस्तक लिहायचं, त्यात त्यांनीच चितारलेली चित्रं, स्केचेस असं टाकून सजवायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पण, पुण्यात आल्यावर मराठवाडा साहित्य परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं, एक चांगलं पुस्तक त्यांच्या मनातच राहिलं, काळाच्या ओघात विरून गेलं, अशी खंत त्यांनी प्रकट केली आहे.
माडगूळकरांना फ्लेमिंगोंसाठी राजस्थान गाठलं होतं. जर त्यांनी मुंबई सोडली नसती तर या निसर्गवेडय़ा लेखकाला इथल्या शिवडीच्या दलदलीत, फार तर उरण खाडीपट्टय़ात फ्लेमिंगो पाहायला मिळाले असते, असं मला आता फार वाटतंय.
जाता जाता - राजस्थानला आम्ही गेलो होतो ते केवळ भरतपूरसाठी. योगायोगाने डॉ. सलीम अलींना सायकल रिक्षातून फिरवणाऱया नंबर वन सायकल रिक्षातच बसून दिवसभर पक्षी ऐकले, पाहिले, तृप्त झालो. 2001मध्ये फ्लेमिंगो तर मी ठाण्यात अगदी माझ्या घराच्या अंगणात म्हणावे इतके जवळून पाहिले होते. 2001मध्ये ठाण्यात कोपरीतील मिठागर परिसरात आमची सोसायटी उभी राहिली, कंम्पाउंड वॉल तयार व्हायचीच होती, सर्पकुळ त्यांची वहिवाट सोडायला तयार नव्हतं, समोर तेव्हा मीठ उत्पादन होत होतं, पावसाळ्यात मीठासाठी तयार केलेली खाचरं, तळी भरून जायची आणि फ्लेमिंगोंसह कितीतरी पाहुणे पक्षी आमच्या समोर मुक्कामाला यायचे. अक्षरशः काही हातांवरून मी तेव्हा लागोपाठ दोन वर्षे गुलाबी गळा-मानेचे फ्लेमिंगो पाहिले होते. नंतरच्या वर्षी ते जरा दूर गेले आणि आताशा येतच नाहीत. आता त्यांचं तळंही कुठं राहिलयं म्हणा....

1 comment:

  1. आज पहिल्यांदाच तुमचा ब्लॉग वाचला. डिझाईन छान निवडलय. लेखासोबतचे फोटो, चित्रे उत्तम दर्जाची असल्याने डोळ्यांना छान वाटतं. लेबल्स थोडी वाढवलीत तर वाचकांसाठी आणखी बरं पडेल. शुभेच्छा.. - माधव शिरवळकर

    ReplyDelete