Tuesday, February 8, 2011

14 फेब्रुवारी... नो पेट्रोल, ओन्ली लव्ह!


पाकिस्तानात पेट्रोल 17 रुपये लिटर
मलेशियात 17 रुपये लिटर
आणि आपल्याकडे... आज 63 असेल तर उद्या ते 65, 66 किंवा 70 रुपये लिटरही होऊ शकतं...
आपल्याकडेच हे असं कसं? जागतिक तेल बाजारपेठेतील वाढत्या किंमतींचा परिणाम फक्त भारतातील पेट्रोल-डिझेल दरांवर होतो आणि इतरत्र नाही, हे कसं काय?
सगळीकडून महागाईचे विळखे पडत असताना आपण, सर्वसामान्यांनीच संघटीत होऊन आवाज उठवण्याची, संघटीतपणे काहीतरी कृती करून नफेखोरांची नाकेबंदी करण्याची गरज आहे... चला, 14 फेब्रुवारीला फक्त प्रेमाची, स्नेहभावाची, ममत्वाची देवाण-घेवाण करू, या दिवशी पेट्रोल अजिबात घ्यायचे नाही, खरेदीच करायचे नाही, एक दिवस पेट्रोल खरेदीवर बहिष्कार टाकूया...
माझ्या एका जागरुक मित्राने पाठवलेल्या इ-मेलचा हा आशय आहे. आता पाकिस्तानात वा मलेशियात पेट्रोलचे भाव खरोखरीच किती आहेत याची खातरजमा लगे हाथ करणे जरा किचकट आहे. पण, पेट्रोलच्या दरवाढीने आपल्या खिशाला फार म्हणजे फारच झळ पोहोचतेय हेही खरं आहे. तेल कंपन्यांना सरकारी नियंत्रणातून मुक्त केल्यापासून फक्त दरवाढच सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेव्हापासून तेलाच्या दरांत चढउतार झालीच नाही की काय? मग भाव कमी झाल्याचे कसे काय या कंपन्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले नाही, आज पेट्रोल 2 रुपयांनी कमी झालेय अशी खुशखबर अलिकडच्या काही वर्षांत तरी मिळालेली नाही. तेव्हा, खरंच बहिष्कार म्हणून नाही पण ग्राहक म्हणून एक दिवस संघटीतपणे पेट्रोल खरेदीच करायची नाही असं ठरवायला काय हरकत आहे. माझ्या मित्राने शेकडोंना हा मेल पाठवलाय, त्या सगळ्यांनी (माझ्यासकट) हा मेल आणखी पुढे फॉरवर्ड केलाय...
त्याच्या म्हणण्यानुसार, सदोदीत आपल्याच खिशात हात घालून आपल्याला गाळात घालणाऱया तेल कंपन्यांना या एक दिवसाच्या बहिष्काराने फार मोठा फटका बसू शकतो. सरकार जर महागाईने होरपळणाऱया ग्राहकांबद्दल काहीही करत नसेल तर आपणच संघटीत व्हायला हवे. आता खूप झालं, आम्हीही एकत्र येऊ शकतो, हे नफेखोर यंत्रणांना दाखवून द्यायलाच हवं!
पण, फक्त पेट्रोलसाठीच कशाला, नफेखोरांनी कृत्रिमरित्या भाववाढ केलेल्या प्रत्येक वस्तूसाठी ग्राहकांनी हेच संघटीत बहिष्काराचं अस्त्र वापरायला हवं, असं मला वाटतंय. 14 फेब्रुवारीला जोर का झटका सगळ्यांनाच देऊया की! मध्यंतरी कांद्याच्या दलालांनी आपल्याला इतकं रडवलं, त्याच मंडळींनी तिकडे कांदा, भाज्या उत्पादक शेतकऱयांनाही वेठीस धरलं होतं. आता कांदा वीस रुपयांनी विकला जातोय, तेव्हा नाशिकला पार 1 ते 9 रुपये दराने खरेदी केला जातोय, फ्लॉवर, कोंथींबीर रस्त्यावर ओतून टाकायची, शेतात सडवायची पाळी शेतकऱयावर आलीय. आपल्याकडचा कांदेवाला, भाजीवाला मात्र अजूनही चढय़ा दरानेच कांदा विकतोय, भाजी विकतोय. हे चित्र आपणच बदलू शकतो. कांदा खरेदी करणार नाही, महाग वाटणाऱया भाज्या घेणारच नाही, तूरडाळ नव्वदच्या घरात गेली असेल तर दुसऱया डाळी वापरू, पण व्यापाऱयांचे खिसे भरणार नाही, असं आपणच ठरवायला हवं.
एक दिवस, दोन दिवस, चार दिवस हे करून पाहूया. जाणवण्याइतपत फरक आढळून येईल. तेव्हा `14 फेब्रुवारी' हा `नो पेट्रोल, ओन्ली लव्ह' म्हणून लक्षात ठेवा. जोर का झटका देनाच पडेगा!

No comments:

Post a Comment