Sunday, February 13, 2011

हेच तर खरं प्रेम असतं!

व्हॅलण्टाइन डेच्या निमित्ताने जिकडे-तिकडे लिहून येणार्या त्याच त्या सरधोपट गोड गोड प्रेमळ मुरंब्याएवजी प्रेमाविषयीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न प्रहारच्या 'रविवार विशेष' मध्ये आम्ही केला. त्या पानावरील तीन तर्हांचा मजकूर इथे देतोय... प्रेमात पडलेल्या, प्रेमात असलेल्या, प्रेमात पडत असलेल्या , काय करावं याबद्दल साशंक असलेल्या अशा सगळ्यांनाच हॅप्पी व्हॅलण्टाइन डे!
--------------------------------


र्गात तिच्या नकळत तिला पाहण्यासाठी केलेल्या मानेच्या कसरती, ती पहिली नजरभेट, वह्यांची-नोट्सची देवाणघेवाण, तिच्यासाठी वा त्याच्यासाठी तासन् तास ताटकळणं, काहीही न सांगता परस्परांना उमजलेलं फक्त दोघांचंच कोवळं गुपित, ती अवघ्या देहाची थरथर, जिवाची तगमग, सहज झाल्यागत वाटणा-या स्पर्शामुळे मनावर फिरलेलं मोरपीस, तिचं हसणं, त्याचं बोलणं, कधी तरी दुस-याच कुणाबरोबर दिसल्यावर काळजात खुपसली गेलेली विश्वासघाताची सुरी, ब्रेक-अपनंतर ओघाने येणारी उदासी, विमनस्कता, फकिरी अवतार, दाढीचे वाढलेले खुंट, अवचित भरून येणारे तिचे-त्याचे डोळे, एक ना अनेक हज्जार उपद्व्याप.. काय काय घडत असतं प्रेमात पडल्यावर त्याच्या आणि तिच्या भावविश्वात.. एक वेगळीच हुरहुर लावणाऱ्या नवथर वयातील या प्रेमाचे रंग, अनुभवांचे गंध प्रत्येकासाठी खास त्याचे असतात. खरंच असं होतं का हो? असं विचारून आणि त्यांनी सांगूनही हे सारं समजण्यापलीकडलं आहे. परस्परांमध्ये रमलेल्या या मंडळींना खरं तर उद्याच्या ‘व्हॅलंटाइन डे’चीही मातब्बरी नाही. त्यांच्यात सुंदर असं काहीतरी आधीच उमललं आहे, फुललं आहे. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी परस्परांमध्ये गुंतण्याचा आणखी एक बहाणा आहे.. त्यांचा प्रवास आता तर कुठे सुरू झालाय..
 
तसं पाहिलं तर, प्रेम म्हणजे ती आणि तो यांच्यातील त्यांच्यापुरता बंध. कधी हा बंध हळुवार, अलवार असतो आणि कधी कधी तन-मन घायाळ करणारा दुखरा, विषारी, घातकी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणाराही असतो. आपलं माणूस आपलं असल्याचा विश्वास आणि तसं असल्याचा आभास यात खूप अंतर असतं. जेव्हा या विश्वासाची चौकट विस्कटते तेव्हा हाच बंध रुतू लागतो, जीवघेणा ठरतो, दंश करतो, हे सगळं आपण अवतीभवती घडणा-या घडामोडींमधून पाहतोच. प्रेम म्हणजे केवळ दैहिक, लैंगिक आकर्षण, अंगभर फणा काढून उभी राहिलेली, तटतटून आलेली वासनेची अनावर नागीण म्हणायचं का?, असे प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना जेव्हा समाजात घडत असतात तेव्हा ‘व्हॅलंटाइन डे’भोवतीच्या गुलाबाच्या पाकळ्या आपोआप गळून पडतात.
 
पण, प्रेमासारख्या सुंदर भावनेला आपण फक्त ‘व्हॅलंटाइन डे’च्या कुंपणात का म्हणून अडकवायचं? या कुंपणापलीकडे प्रेमभावनेचे असंख्य आविष्कार आहेत. कुठलेही विकार नसलेली निखळ मैत्री आहे, स्नेह आहे, आपुलकी आहे, निर्मळ सदिच्छा आहेत, आस्था आहे.. या सगळ्यांचं काय? प्रेमात पडल्यापासून सुरू झालेल्या प्रवासात जेव्हा प्रेमभावनेची ही सगळी रुपं उमजायला लागतात तेव्हा परिपक्वतेच्या दिशेने त्या व्यक्तीची पावलं पडायला लागलेली असतात. परस्परांमधील प्रेमही या इथवरच्या प्रवासात मुरलेलं असतं आणि इतर नात्यांमधील पदर जाणवायला लागतात.
 
मुरलेलं प्रेम कशा-कशातून व्यक्त होतं बघा.. प्रेमाचा वसंत ऋतू सुरू असतो तेव्हा तिचं किंवा त्याचं काही म्हणजे काही खुपत नाही, आक्षेपार्ह, हास्यास्पद, विचित्र वाटत नाही. लग्न झाल्यावर नव्हाळीचे दिवस संपतात, संसाराचे चटके बसायला लागतात. तेव्हाही प्रेम असतं, परस्परांच्या सवयी, वर्तनविशेषही तेच असतात. पण, आता समीकरणं बदललेली असतात, नव्या जबाबदाऱ्यांमुळे आलेल्या मर्यादा, बंधनं जाचक वाटायला लागतात. इथेच ठिणगी पडते, लग्नाआधी काहीही वावगं न वाटलेल्या सवयी, वागणं फारच खुपायला लागतं. कारणं काहीही असोत, सुटलेल्या शाब्दिक बाणांनी विद्ध आपल्याच माणसाला केलं जातं, घायाळ मनांवर हळुवार फुंकर घालावीशी वाटू नये इतकी कटुता परस्परसंबंधांमध्ये निर्माण होते. तोपर्यंत प्रेमात परिपक्वतेची गोडी मुरली असेल तरच हे अवघड वळण सोपं होतं, तडजोड केली जाते, जोडीदाराशी जुळवून घेतलं जातं. ही तडजोड करणं, जुळवून घेणं, खटकणाऱ्या, डोकं सटकवणाऱ्या सवयींकडे समंजसपणानं दुर्लक्ष करणं, दिवसभराच्या रहाटगाडग्यानं थकल्या-भागल्या जोडीदाराला जवळ घेणं हेही प्रेमच, इथवरच्या प्रवासातील साऱ्या खाचखळग्यांतून खऱ्या अर्थानं तावूनसुलाखून निघालेलं प्रेम.
 याच प्रेमाचा आणखी एक उत्कट आविष्कार म्हणजे परस्परांवरील अथांग विश्वास. याच विश्वासाच्या बळावर परस्परांना पर्सनल स्पेस देता येते, गैरसमजांची वादळं भिरकावून देता येतात.. परस्परांच्या आश्वासक सोबतीने इथवर टाकलेली पावलं हेच तर खरं प्रेम असतं!
- शैलेंद्र शिर्के

बोल ना रे! आठवतंय का?

 


पूर्वी तिनं ‘क्लू’ दिला की, मी चुकत-माकत का होईना, उत्तरापर्यंत तरी पोहोचायचो. पण, नोकरीला लागल्यापासनं अशा गोष्टी आठवायला हल्ली मेंदूवर बराच जोर द्यावा लागतो. तेवढा वेळच मिळत नाही. म्हणून आता गोंधळ आणि वैताग दोन्हीही मनातल्या मनातच दाबून ठेवले. उगीच तेवढय़ावरनं माझी शाळा घ्यायची नाहीतर ही! तसं व्हॅलंटाइन डे भारतात साजरा करण्यामागचं लॉजिक आपल्याला तेव्हा अजिबात पटत नव्हतं. दोस्तांतदेखील मी माझं मत ठामपणे मांडायचो. पण तिच्यासमोर एकदाच
चुकून हे बोललो होतो. ‘आता शेती करायला तुम्ही बैलांऐवजी ट्रॅक्टर वापरता ना. तरीही, बैलपोळ्याला पुरणपोळी खातोस की नाही? तसाच व्हॅलंटाइनपण साजरा करायचा..’ आमच्या मातोश्रींनी हिला एकदा बेंदुराला जेवायला बोलावलं होतं. तीच आठवण तिनं उदाहरणासाठी वापरली असावी, मला बैल म्हणण्यासाठी नाही?! पण माझ्याबाबतच्या तिच्या टोमण्यांबद्दल असा संशयाचा फायदा घेऊन इज्जतीचा कचरा करून न घेतल्याचं समाधान मिळवणं रोज-रोज शक्य नाही व्हायचं.
 आजही तोच बाका प्रसंग उद्भवला होता. तिच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं? घोर विवंचनेत सापडल्यासारखं झालं. ‘बोल ना रे ! आठवतंय का?’ आवाजात असा एकाच वेळी लडीवाळपणा आणि धमकावणी, अशा परस्परविरोधी गोष्टींचं संतुलन तीच साधू शकते. जातिवंत स्टेज आर्टिस्ट. एकदम जयश्री गडकर की दुस-या क्षणाला दुर्गा खोटे. ‘ हो.. अगदी व्यवस्थित आठवतंय. ते लीप इयर होतं..’ माझा ‘पीजे’ तिनं नाकाच्या शेंडय़ानंच उडवून लावला. पण एरवीसारखा माझी रेवडी उडवायचा तिचा मूड नव्हता. कारण तिनं थेट मुद्दय़ालाच हात घातला. ‘काय घेतलंयस माझ्यासाठी?’ गिफ्ट तिच्यासमोर धरलं.
सेकंदसुद्धा न दवडता तिनं कव्हर काढलं. मी आणलेला ड्रेस तिनं निरखला, खूश झाली. आपण आनंदलो आहोत, हे ती कधी बोलून नाही दाखवत. पण अशा वेळी एरवी पीचच्या फळासारखे दिसणारे गोबरट गोरे-तांबूस गाल पिकण्याच्या वाटेवर असलेल्या स्ट्रॉबेरीप्रमाणं हळूहळू लाल होऊ लागतात. अस्फुट स्मित ओठांवर उमटतं. गालावरचा तीळ काही सेकंदांकरता खळीत जाऊन विसावतो. या तिन्ही क्रिया जेव्हा एकाच वेळी होतात, तेव्हा मॅडम तुफान खूश झाल्यात, हे लक्षात येतं.
 
आता तिच्याकडून गिफ्ट घेण्याची पाळी माझी होती. तिनं हातात एकापाठोपाठ एक असे बोर्नव्हिटाचे तीन मोठे डबे टेकवले नि माझा चेहरा न्याहाळण्यास सुरुवात केली. तसाही तो तिचा आवडता छंदच आहे. ‘पाहतोस काय असा डब्यांकडं? त्यापेक्षा स्वत:कडे पाहा. नोकरी सुरू केल्यापासनं केवढा वाळलायस. आता तुझी हाडंसुद्धा कातडीला हाड हाड करत असतील. जरा जिवाला खात-पीत जा.’ हाताच्या दोन्ही मुठी डोक्याशी नेत काडकन बोटं मोडून तिनं माझी दृष्ट उतरवली. टॉप-जीन्सवाली पोरगी असं काय करतेय, या उत्सुकतेनं आजूबाजूच्या भोचक नजरा आमच्याकडे वळल्या. पण, तिची ही नेहमीची सवय आहे.
 
माझ्या नोकरीला ती स्वत:ची सवत समजते. ही नोकरी मी का करू नये, याची किमान एकशे पंधरा कारणं पटवून देणं, हा तिचा आवडता छंद. एरवी रोज भेटणारे आम्ही आता आठवडय़ातून एकदाच एकमेकांना पाहू शकायचो, हे तिच्या माझ्या नोकरीवरच्या रागाचं मुख्य कारण आहे. ‘जन्मल्यानंतर तू पंधरा दिवस डोळे उघडले नव्हतेस. आंधळेपणाचा हा वारसा तू अजून चालवतो आहेस, हे तुझ्या नोकरीवरून सिद्ध होतं. आणि असं माझंच नाही, हे भावी सासूबाईंचंही म्हणणं आहे.’ ‘तूही ज्या ब्रह्ममुहूर्तावर जन्माला आलीस, तेव्हा दगडूशेठ गणपतीवर कुणीतरी शेण फेकलं होतं आणि पुण्यात दंगल झाली होती. हे मी नाही, माझ्या भावी सासूबाई सांगतात.’
 
आता पुढचं सारं ऐकून घेण्यासाठी मी मनाला तयार केलं. कारण, व्हॅलंटाइन डे हा प्रेमाचा वार्षिक ताळेबंद मांडण्याचा दिवस असतो, अशी तिची धारणा आहे. त्यामुळं ती दारुगोळा डोक्यात भरूनच येते. हल्ली असंच होतं. नोकरी करता-करता दिवस कसा उडून जातो, समजतच नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत नुसतं राबणं. सकाळी थोडी सवड असते, तेव्हा तिची मेडिकलची लेक्चर्स असतात. दुपारी जेवायला येतेस का, हे विचारण्यासाठी फोन करावा, तर तिची नाटकाची प्रॅक्टिस असते. त्यानंतर तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट तपासायचे असतात. तिथून पुढं ती मोकळी होते, तेव्हा माझा दिवस पॅक झालेला असतो. हॅलेचा धूमकेतू ७६ वर्षानी पाहायला मिळतो ना, तसंच आमच्याही भेटीगाठींचं होतं. मग, दोघांच्याही सवडीप्रमाणं ‘फोन अ फ्रेंड’ करत समाधान मानायचं. 
तिचा त्रागा ऐकून आपण पृथ्वीऐवजी प्लुटोवर राहायला असतो, तर बरं झालं असतं, असं वाटतं कधीमधी. आपला एक दिवस तिथं साडेसहा दिवसांचा असतो म्हणे. ‘होईल सगळं व्यवस्थित..’, तिची पाठ थोपटत आश्वस्त केलं. मिनिटभर आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेलो. ‘सुंदर दिसतेयस.. सुरुवातीलाच द्यायची होती कॉम्प्लिमेंट. पण आता संधी मिळाली. ‘परत बोल..’ स्वत:चं कौतुक तिला दुस-यांदा ऐकायचं होतं. ‘लय भारी.. जगात भारी..’ शब्दांची कंजुषी करायला आपल्याला नाही जमत. ती हसली. तुफान गोड हसली. गालावर बक्षीस टेकवून बाजूला होताना कुजबुजली, ‘पुढल्या वेळी भेटू तेव्हा कामातनं वेळ काढून शेव्हिंग करून ये. पैसे नसतील, तर तेही खिशात ठेवलेत.’
- अजिंक्य गुंजाळ

आय हेट लव्हस्टोरी

तुझ्या आठवणीचं एक पान उलगडताना..
मीच विचारलं तिला..
Hi dear! कशी आहेस?

का कुणा ठाऊक

आज बोलावंसं वाटतंय..

सध्या तू कुठे आहेस

मला नाही ठाऊक

फिर भी दोस्त जिंदगी खुबसुरत है

नशिबानं पाठ फिरवली

पण जगलो ना तुझ्या आठवणीत

असो. का कुणास ठाऊक

आज काहीतरी मागावंसं वाटतंय तुझ्याकडून..

आयुष्याची संध्याकाळ सुरू झालीय

म्हणूनच लाडके एक गोष्ट मागतोय,

देशील का?

तुला आठवत असतील त्या कॅम्पसमधल्या पाय-या
आपण बसायचो त्याच त्या..

पाठीमागे काळाकुट्ट दरवाजा

बंद कायमचा

जणू काही आपल्या आधारासाठी

वर्षानुर्वष उभा द्वारपालासारखा.

पायाखालून जाणारी सुरावटीसारखी 

मुग्यांची रेष संथपणे सरकणारी 

आपल्या भोवतालचा तो हिरवा दरवळ

लाडके आजही माझ्या डोळय़ात साठवून राहिलेला 

अन् तुझ्या डोळय़ात 

दाटून राहिलेले माझं प्रेम.
लाडके, ते प्रेम मला परत देशील का?
आजही तुला आठवत असेल 

पार्कातला तो रस्ता.. 

हिरव्या कागदावरची एक 

वेडीवाकडी निळी रेषा 

तोच रस्ता तुझ्या पदस्पर्शाने सुखावलेला 

कडेवरच्या धुळीत तुझ्या-माझ्या पावलांचे ठसे 

लगट करणारे.. 

एकमेकांत मिसळणारे.. 

आजही हृदयात न पुसली गेलेली ती 

आपल्या प्रेमाची पायवाट.. 

लाडके तेच.. तेच प्रेम 

मला परत देशील का? 

आज आहे मी एकाकी 

आयुष्याच्या अखेरच्या 

पुलावरून चालतोय.. 

तुझ्या आठवणी सोबत घेऊन.. 

सगळे पाश मला 

कधीच सोडून गेलेत.. 

आता होईल हे शरीर मातीचं वारूळ.. 

मला लावायचंय त्यासमोर एक रोपटं 

तुझ्या आठवणींचं..

म्हणून तर मागतोय.. 

पुन: पुन्हा विनवतोय..

किती तरी दिवस उलटलेत..
कितीतरी महिने पसार झालेत..
तिची आठवण काढताक्षणी 

कुणीतरी हजारो सुया 

टोचतोय माझ्या अंगाला 

दात विचकून पुन: पुन्हा 

मी मात्र तिच्या गोड संवेदना 

पुन: पुन्हा झेलतोय.. 

एखादी पावसाची सर 

अंगावर घ्यावी तशी 

पण कधी संपणार हा वर्तमान काळ.. 

परमेश्वरा तू खरंच आहेस का? 

का सुटलाय मनाला कंप? 

कुठल्या वादळाची ही चाहूल आहे?
तिच्या आठवणीचं  
शेवटचं पान उलटताना.. 
भरदिवसा हा चंद्र कुठून आला? 

नियती मी तुला विचारतोय..? 

ती.. ती येणार आहे काय? 

तिचा गंध मला जाणवतोय.. 

वेदनेची चादर मी भिरकावून दिलीय.. 

त्या क्षणी ती म्हणाली.. 

Hi dear! कसा आहेस? 

इतक्या वर्षानी? 

म्हटलं लाडके खूप उशीर झालाय.. 

म्हणाली म्हणूनच मी आलेय. 

तुला मुक्त करायला.. 

फुंकर मारून तिनं विझवून टाकला 

माझा वर्तमान काळ 

आणि डांबून टाकलं 

भुतकाळाच्या काळय़ाकुट्ट कोठडीत 

डोळे उघडे असोत वा बंद 

दिसतेय फक्त तीच.. 

एकदा विचारलं तिला 

म्हटलं, का केलंस असं? 

म्हणाली संपलंय तुझं आयुष्य 

वर्तमानातली तुझी थरथर 

मला नाही पाहवणार 

तुझं कणाकणानं मरणं.. 

मी नाही सहन करणार.. 

त्यापेक्षा तू भूतकाळातच पडून राहा शांत.. 

मी वळवळतो.. किंचाळतो.. 

का..? का मला ही शिक्षा? 

असं काय पाप केलं मी..? 

म्हणाली, विचार तुझ्या मनाला 

विचार तुझ्या आत्म्याला.. 

आठव तो आपला कॅम्पस, 

तो स्पर्श हळुवार.. आठवतोय?
आठवतोय.. माझ्या मनाचा दरवळणारा गंध? 
म्हणूनच आज गडद संध्याकाळी

मी आलेय तुझ्याकडे..
युवर टाइम इज ओव्हर!
तीच म्हणाली, 

पुन्हा
चल निघायची तयारी कर
ठिकाय.. तू म्हणतेस तर.. 

गुंडाळतो माझा वर्तमान काळ.. 

मी तरी दुसरं काय करणार 

त्यावेळी तुझी प्रत्येक इच्छा.. 

तुझा प्रत्येक शब्द

माझं कर्म होतं 

अन् आता विरोध कशासाठी? 

पण एक विचारू का? 

तुझा इतका जीव होता माझ्यावर 

तर का चिनून घेतलंस माझ्यात? 

का गाढून घेतलंस माझ्या मेंदूत?
मग.. मग.. आज इतक्या वर्षानी का केलंस बंड..?
 माझं शरीर तुला कब्रस्थान वाटलं की काय
 असो.. दोष तुझा एकटीचा नाहीच 
मीसुद्धा केलं होतं ते पाप तुझ्यात एकरूप होण्याचं..
अन् तू गेलीस!नियतीनं ओढून नेलं तुला..
 काळाने फसवलं मला.. 
मग मीच करून घेतला माझ्या मनाचा नरक
 नंतर मीच खोदला खड्डा माझ्या हृदयात खोलवर.. 
गाढून टाकलं कायमचं तुला अन्
आता नाही पाहवत तुला माझं कणकणनं मरणं.. 
येस.. मी तयार आहे लाडके पण दारावर गिधाडं का फडफडतायत? 
मुर्खानो जरा धीर धरा..मीच येतोय बाहेर.. 
तुमचं खाद्य तुमच्याकडेच येतंय स्वत:च्या पायाने चालत..
 पण एक अट आहे हवं तर शेवटची इच्छा म्हणा 
हृदयावर नका हो चोच मारू
ती शांत झोपलीय.. 
गिधाडांनो एवढं कराल ना माझ्यासाठी
प्लीज इतकं कराच..!
                                         - सागर किनारे

 

No comments:

Post a Comment