Tuesday, February 1, 2011

पुन्हा प्रेमात (व्यंकटेश माडगूळकरांच्या)

पुन्हा प्रेमात असं मी मुद्दाम म्हणतोय!
पण माझं प्रेमात पडणं जरा वेगळ्या वाटेवरचं आहे. ही नोंद वाचलीत तर तुम्हाला त्याचा नीटच उलगडा होत जाईल. म्हणजे बघा - व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, शंकर पाटील असे अस्सल मातीतलं लिहिणारे लेखक अलीकडे लायब्ररीत पुस्तकरुपात समोर आले तरी ते उचलले जात नाहीत. त्यांच्या लिखाणातील मज्जा, खुमारी अनेकांना माहितीच नसते, अनुभवलेली नसते. काहीजणांच्या बाबतीत जरा वेगळं असतं, त्यांनी आधीच या लेखकांच्या पुस्तकाचा फडशा पाडलेला असतो, ही सगळी आदरणीय लेखकमंडळी मनात अढळपदावर विराजमान असली तरी वाचनाला नवीन दिशा मिळत राहिल्याने, आणखी वेगळे, नवीन लेखक समोर आल्यामुळे ही मंडळी जरा बाजूला पडतात. या जुन्याजाणत्यांची मोहिनी कायम असली, गाभुळलेल्या चिंचेची चव कशी नाव निघताच जिभेवर उमटते तसंच या मान्यवरांच्या नावासरशी मनात सय जागी होत असली तरी यांनी काही नवीन लिहिलयं वा त्यांच्या पुस्तकांचं पुनर्मुद्रण झालंय याचा मागोवा घ्यायचं राहून गेलेलं असत... 

माझं तसंच काहीसं झालं होतं. या फर्मास मंडळींपासून मीच जरा दूर गेलोय, काही दिवसांपूर्वी द.मा. कथाकथनासाठी माझ्या गावात, माझ्या भागात, कोपरीत ठाण्यात येऊन गेले. त्यांच्या कार्यक्रमाचा फलक वाचला तेव्हा मला हे प्रकर्षानं जाणवलं. अरे ही गप्पीष्ट, गोष्टीवेल्हाळ माणसं, त्यांची पुस्तकं आपण एकदम बाजूला केल्यासारखी केली त्यात नुकसान आपलंच झालंय. मनाचा एक कोपरा कपारीसारखा, दगडासारखा घट्ट झालाय, निष्ठुर झालायं..
एरव्हीही मी पुस्तकांसाठी हावरा आहे. पण, विशाखानं, माझ्या बहिणीनं 'वाघाच्या मागावर' हे माडगूळकरांचं पुस्तक मला दाखवलं तेव्हा तर मी एकदम हललोच. तगमग झाली माझी. माडगूळकर माझे आवडते लेखक, शिकारकथा आवडीचा सा साहित्यप्रकार आणि हे पुस्तकचं मी विसरून गेलो होतो. त्यातील काही लेख मी आधीच वाचले असले तरी पुस्तक पुन्हा प्रसिद्ध झाल्याचं मला कळलंच नव्हतं. शिकारकथा, जंगल,  रानवाटांविषयी आत्मीयतेने लिहिणारी मराठीत तरी दोन-तीनच. माडगूळकर, चितमपल्ली, लालू दुर्वे असे मोजकेच. तर, एकदाचं हे पुस्तक माझ्या हातात आलंय आणि ३१ जानेवारीच्या मध्यरात्री मी बैठक मारून सुरूही केलंय...
 असं बर्याचदा होतं, एखादी आवडती गोष्ट दीर्घ काळानंतर अवचित समोर येते आणि आपण पुन्हा प्रेमात पडतो, वेडे होतो. पुस्तकांच्या, लेखकांच्या बाबतीत माझं असं नेहमीच होत असंतं. आणि माडगूळकरांची ती सहजशैली, गोष्ट सांगितल्यागत प्रवाही लिहिणं तसंच आहे, पुन्हा त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडावं असं... तुम्हीही एकदा अनुभव घ्या! 

संकल्पात आणखी भर - काही वर्षांपूर्वी माझे चिंतेचे दिवस, टेन्शनयात्रा याच मंडळींमुळे सुसह्य झाली होती. आता पुन्हा एकदा याच मंडळींची सोबत होणार आहे.

No comments:

Post a Comment