Monday, September 12, 2011

रिक्षाचालकांचे राज्य

ठाण्यातील मुजोर, उद्दाम रिक्षाचालकांनी बुधवारी एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली. ठाण्यातील रिक्षावाले म्हटल्यावर ते मुजोर, उद्दाम असणारच हे आता वेगळे सांगण्याची गरज राहिलेली नाही. ठाण्यात कोणत्याही रिक्षा-स्टॅण्डवर वा रस्त्यात अध्येमध्ये वाट अडवून, कोप-यावर दात कोरत, विडी फुंकत, गुटख्याच्या पिचका-या मारत टवाळकी करत उभ्या असलेल्या रिक्षाचालकांना एखाद्या ठिकाणी नेणार का, असे विचारण्याचा अविचार ज्यांनी केला आहे त्या सगळ्यांना या उर्मटपणाची शाब्दिक चपराक केव्हा ना केव्हा तरी बसलेली आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांनी भाडे नाकारणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. पण, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील रिक्षावाल्यांना कायद्यापासून, कारवाईपासून जणू अभय मिळाले आहे. ठाण्यात तर कायद्याचे नव्हे, रिक्षाचालकांचे राज्य आहे. ते म्हणतील तोच कायदा अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच समोरचा प्रवासी ज्येष्ठ नागरिक आहे की एखादी अवघडलेली महिला आहे की बाहेगावाहून मुलाबाळांसह आलेले नवखे कुटुंब आहे, याची दखल घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. रिक्षा स्टॅण्डवर रांगेत लावलेली असो वा रस्त्यात उभी असो, ‘नही जाने का’, असे झटकून टाकण्याची मुजोरी ही मंडळी सर्रास दाखवतात. भाडे नाकारणे हा त्यांना मुळी गुन्हा वाटतच नाही. जिवाचा संताप झाला तरी अपमान गिळून प्रवाशांना नाईलाजाने दुस-या रिक्षाचालकाची मनधरणी करावी लागते. अशावेळी वाहतूक पोलिस नेमके बेपत्ताअसतात. इंदिरानगरच्या नाक्यावर रिक्षाचालकांच्या याच उर्मटपणामुळे संतप्त झालेल्या दुर्योधन कदम यांनी या रिक्षाचालकांना दोन शब्द सुनावले आणि उर्मटपणा हा जन्मसिद्ध अधिकार मानणा-या रिक्षाचालकांनी कदम यांच्या वयाचेही भान न ठेवता त्यांना मारहाण केली. या मारहाणीत कदम यांनी जीव गमावला असला तरी राज्य रिक्षाचालकांचेच असल्यामुळे या संतापजनक घटनेबद्दल, राजकारणी चमकेश मंडळी वा रिक्षा संघटनांचे आश्रयदाते राजकीय पक्ष यांच्यापैकी कुणीही निषेधाचा चकार शब्दही उच्चारलेला नाही. गणेशोत्सवातील कर्णकटू गदारोळ, वाटमारी आणि वीजचोरी करून केलेला लखलखाट मिरवण्यात मग्न पुढा-यांना रिक्षाचालकांच्या या झुंडशाहीला फटकारण्यासाठी वेळ नाही. वाहतूक पोलिसही प्रवाशांनी आमच्याकडे तक्रार करावी, तक्रार आल्यावर आम्ही कारवाई करतोच’, हे नेहमीचे पालुपद आळवत आहेत. एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेल्याबद्दल ठाण्यातील रिक्षा संघटनांना आत्मक्लेश होणे याची अपेक्षा करणे हाही कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणा-या सर्वसामान्यांच्या भाबडेपणाचा कळस ठरावा असेच हे भीषण चित्र आहे.