Tuesday, March 8, 2011

ठाणेकर रेल्वेचे नावडते

हे जे काही लिहिले होते ते रेलवे बजेट आधी लिहिले होते. आमच्या ठाण्यातील खासदारानी काहीतरी करणार म्हटले होते म्हणून. आता बजेट मंजूर होताना ठाण्याच्या पदरात काहीही पडलेले नाहीं... ठाणेकरांचे दुर्दैव दुसरे काय!
----------------------------
आमची लटकंती कायमच राहिली
बिच्चारे ठाणेकर गहिवरलेत हो..
कधी कधी ना आपल्याला अगदी भरून येतं, गहिवरून येतं..
 ठाणेकरांच्या आणि विशेषत: ठाणेकर रेल्वे प्रवाशांच्या नशिबात हा सुखद योग लिहिला असावा, याची मला आता खात्री पटलीय. रेल्वे बजेट येत्या शुक्रवारी मांडले जाईल, अनेक नव्या घोषणा होतील, नव्या गाड्या सुरू होतील, जुन्या गाडय़ांच्या फे-या वाढतील, फलाट सुधारणा, रेल्वे स्थानक सुधारणा कार्यक्रम जाहीर होतील, आधीच्या कार्यक्रमांना नवा मुलामा दिला जाईल.. उपनगरी रेल्वे सुधारणांविषयीही थोडेसे बोलले जाईल, इवलुशी तरतूद केली जाईल..
 या बजेटच्या पूर्वसंध्येला ठाण्याचे खासदार डॉ. संजीव नाईक, ठाणेकर खासदार आनंद परांजपे यांनी ‘ठाण्याला ज्या काही वर्ल्ड क्लास सुविधा देण्यात येणार होत्या, त्याचे काय?’ असा प्रश्न उपस्थित केलाय. ठाण्याशी संबंधित असलेल्या लोकप्रतिनिधींपैकी किमान दोघांनी ठाण्याविषयी इतकं कळकळीनं बोलावं यापरते दुसरे सुखावह अधिक काय असणार?
 बरं वाटतं हो, फलाटांच्या अरुंद जिन्यांवरून, चिंचोळ्या फूटओव्हर ब्रिजवरून धक्के खात, गर्दीत घुसमटत कसंबसं बाहेर पडू पाहणा-या सर्वसामान्य जिवांना असं काही वाचल्यावर. दोघेही खासदार ठाण्याचं काय ते बोला?, असं रेल्वेमंत्र्यांना ठणकावून विचारणार असल्याचं वाचल्यापासून दररोजच्या गर्दीने, असह्य चेंगराचेंगरीने कातावलेल्या ठाणेकरांना एकदम गार वा-याची झुळूक घामेजल्या अंगावर यावी तसंच काहीसं वाटायला लागलंय.
 सदोदीत ठाणेकरांच्या कल्याणासाठी धावून येणा-या खासदारांच्या या जागृत जनसेवेबद्दलही आक्षेप घेणारे, नाकं मुरडणारे आहेतच. ‘आता जाग आली का या मंडळींना, गेल्या वर्षभरात ठाणे रेल्वे स्थानकाच्या कायापालटासाठी सल्लागार नेमण्यासाठी साधी सुचनाही निघाली नाही, प्रत्यक्ष सुविधांचे तर बाजूलाच राहिलं, त्याबद्दल काय केलं वर्षभरात, केवळ फलाटांवर फेरफटका मारून वा प्रवाशांशी संवाद साधून अडचणी दूर होत नाहीत..’ लोकाचं हे असं असतं, जरा संधी मिळाली की नुसती टीकाच. टीकाच करायची झाली तर लोक काय एक ना अनेक बाजूंनी बोलतात हो, पण आपले खासदार आता आवाज उठवणार आहेत, हे महत्त्वाचं. आमची विनंती एकच आहे- ते वर्ल्ड क्लास रेल्वे स्थानक, ठाणे स्टेशनचा कायापालट वगैरे जरा लांबलं तरी हरकत नाही, पण तेवढं ठाण्याच्या फलाटांवर नवे जिने होतील, रेल्वे पादचारी पुलांवरील घुसमट कमी होईल एवढं तरी यंदा जमवून आणा. बाकी व्हायला पुढचं बजेट आलं तरी हरकत नाही मग!

No comments:

Post a Comment